Next
कन्याकुमारी ते लेह सायकलयात्रा; स्त्री-शक्तीचा प्रेरक संदेश
माधुरी सरवणकर
Monday, May 21, 2018 | 12:51 PM
15 0 0
Share this article:

प्रत्येक मनुष्याची काही स्वप्ने असतात; मग महिला तरी त्यासाठी अपवाद का बरे असतील? पण महिलांची अनेक स्वप्ने अप्राप्य बनल्याचे दिसून येते. त्यांच्यावर असलेली विविध प्रकारची बंधने आणि त्यातून निर्माण होणारी भीती ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. म्हणूनच, पुण्यातील ‘एसएनडीटी’तील सहयोगी प्राध्यापिका वासंती जोशी (वय ५६ वर्षे) यांनी ‘कन्याकुमारी ते लेह’ ही दक्षिणोत्तर सायकलयात्रा आयोजित केली आहे. अप्राप्य वाटणारी स्वप्नेही, भीतीवर मात केल्यास महिला सहज पूर्ण करू शकतात, हे दाखविणे (कॉन्करिंग फीअर) हा या मोहिमेचा हेतू आहे. येत्या २८ मेपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर वासंती जोशी यांची ही मुलाखत...
......
- सर्वप्रथम आपल्याला या मोहिमेसाठी शुभेच्छा. ही मोहीम नेमकी कशी असेल, याबद्दल थोडे सांगा.
-  भारताचे दक्षिण टोक ते उत्तरेकडील टोक असा संपूर्ण प्रवास मी सायकलवरून एकटीने करणार आहे. एखाद्या महिलेने वयाच्या ५६व्या वर्षी सायकलीने ४२७५ किलोमीटरचा प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. मी दिवसाला १० तासांत १५० किलोमीटर याप्रमाणे सायकलिंग करणार आहे. हा संपूर्ण प्रवास सुमारे ४० दिवसांचा असेल. माझ्यासोबत माझ्या मेंटॉर शुभदा जोशी (वय ६२ वर्षे) आणि मुलगी केतकी जोशी (वय २६ वर्षे) यादेखील असतील; मात्र त्या गाडीतून प्रवास करणार आहेत. सामानाची वाहतूक, तसेच तांत्रिक सहकार्य यासाठी त्या माझ्यासोबत असतील. कन्याकुमारी सोडल्यानंतर मदुराई, बेंगळुरूमधून महाराष्ट्रात येऊन पुण्यातून पुढे नाशिक मार्गे अहमदाबाद महामार्गावर जाऊ. पुढे दिल्ली, उदयपूरमार्गे मनालीला पोहोचू. कन्याकुमारी ते मनालीपर्यंतचे ३६०० किलोमीटरचे अंतर समुद्रसपाटीपासून आठ हजार फुटांची उंची गाठून देणार आहे. लेह जिल्हा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. मनालीनंतर आम्ही दररोज कधी १५ हजार फूट उंचीवर जाऊ, तर कधी खाली येऊन १० हजार फुटांवर येऊ. हा आव्हानात्मक प्रदेश आहे. तिथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी असतो. कारण समुद्रसपाटीपासून आठ हजार फुटांवर झाडांचे अस्तित्व (ट्रीलाइन) संपते. तिथून ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते. या प्रवासात आम्ही तिन्ही ऋतू अनुभवणार आहोत. कन्याकुमारीपासून पुण्याला येईपर्यंत आम्हाला पाऊस लागेल. पावसाचा अंदाज घेत सायकलिंग करावे लागेल. पुढे चंडीगडच्या पट्ट्यात उन्हाळा लागेल. तिथे तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअस असेल. मनालीच्या पुढे हाडांना बोचणाऱ्या थंडीतून आम्ही लक्ष्य गाठू.

दक्षिणोत्तर प्रवास- तुमच्यासमोर आव्हाने काय असतील?
- आमच्यासमोर अनेक आव्हाने आहेत; पण मनात भीती नाही. वातावरणातील बदल व उंचीत होणारा फरक ही दोन प्रमुख आव्हाने आहेत. एका दिवसात १५० किलोमीटर सायकलिंग करणे सोपे असते; मात्र ४० दिवस सतत बदलत्या परिस्थितीत सायकलिंग करत राहणे खूप कठीण असते. दर दिवशी सायकल चालवण्यासाठी स्वयंप्रेरणा लागते. दररोज पहाटे साडेतीन वाजता उठण्याचा उत्साह वाटला पाहिजे.

- या ४० दिवसांच्या प्रवासाकडे तुम्ही कसे बघता? 
- हा फक्त ४० दिवसांचा प्रवास नसून, हा आमचा जीवनानुभव असेल. त्या माध्यमातून वेगळे जग पाहता येणार आहे. एरवी धकाधकीचे जीवन जगत असताना आपल्याला स्वतःशी संवाद साधता येत नाही. या प्रवासाच्या निमित्ताने मला माझ्यासोबत संवाद साधता येईल.

- तुम्ही या मोहिमेची कशा प्रकारे तयारी केली आहे?
मी यासाठी मानसिक व शारीरिक तयारी केली आहे. ‘सोलो सायकलिंग’ करायचे असल्याने जानेवारी महिन्यापासूनच सरावाला सुरुवात केली. सरावासाठी पहाटे चार वाजता घरातून निघायचे. काही मिनिटांमध्ये शेकडो सूर्यनमस्कार घालण्याचा व्यायामही मी नियमितपणे करते. माझ्या सपोर्ट टीमनेदेखील सराव केला आहे. 

वासंती जोशी- या मोहिमेचा शेवट कुठे होणार आहे?
- लेहमध्ये समुद्रसपाटीपासून १९ हजार ३५० फुटांवर उमलिंग ला नावाची खिंड आहे. सेना दलाने या खिंडीमार्गे नुकताच ८४ किलोमीटरचा रस्ता बनवला आहे. जगातील सर्वांत उंच वाहतूकयोग्य रस्ता (हायेस्ट मोटरेबल रोड) ही या रस्त्याची ओळख आहे. या ठिकाणी सायकलवरून पोहोचणारी मी पहिलीच महिला असणार आहे. मी पुण्यात ‘एसएनडीटी’त सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. या विद्यापीठाचा स्थापना दिवस पाच जुलै रोजी असतो. महर्षी कर्वे यांनी विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे पाच जुलै रोजी सर्व महिलांच्या वतीने त्यांना उमलिंग ला येथे आदरांजली वाहण्याचा आमचा मानस आहे. येथेच या प्रवासाचा शेवट होणार आहे.

- ही संकल्पना कशी सुचली?
लहानपणापासून आपण विविध गोष्टींतून प्रगल्भ होत जातो, त्याचा हा परिपाक आहे. मी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आहे. तसेच मी ट्रेकिंग करते. ‘एसएनडीटी’मध्ये मी १० वर्षे एनसीसी ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. त्या माध्यमातून मी मुलींना ट्रेकिंग, रायफल शूटिंगला घेऊन जायचे. मुलींसाठी काम करताना मी स्वतः हळूहळू घडत होते. काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने मी एव्हरेस्ट बेस कॅम्प व अन्नपूर्णा सर्किट या मोहिमा पूर्ण केल्या आहेत. मी सायकलवरून नर्मदा परिक्रमाही केली आहे. तसेच सियाचीन बेसपर्यंत सायकलिंग केले आहे. २००७मध्ये लेहमधील १८ हाजर ५० फूट उंच असलेली खारदुंग ला सर करणारी मी पहिली महिला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून अजून काहीतरी धाडसी पाऊल उचलण्याची इच्छा मनात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये उमलिंग लाबद्दल वृत्तपत्रात वाचले. त्यानंतर मी या ठिकाणी जायचे ठरावले. मला माझी नव्याने ओळख करून घ्यायची होती. म्हणून कन्याकुमारी ते उमलिंग लापर्यंतचा प्रवास सायकलद्वारे करण्याचा निर्णय घेतला.

- तुम्ही याआधी सायकलवरून केलेल्या मोहिमांबद्दल सांगा...
लहानपणापासूनच मला सायकलिंगची आवड होती. १९८४-८५नंतर पुण्यात दुचाकीचे पेव फुटले आणि आमच्या हातातली सायकल गेली. जवळजवळ १८ वर्षे सायकलला हात लावला नव्हता. २००६मध्ये पुन्हा माझा सायकलशी संबंध आला. त्या वेळी माझ्या मित्राला एंड्युरो स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सहकाऱ्याची गरज होती. त्या वेळी आम्ही दोघांनी ही शर्यत पूर्ण केली. पुढे पुणे सायकल प्रतिष्ठानसोबत सायकलीवरून लेहला पहिल्यांदा जाण्याचा योग आला. या प्रवासात १९ मुलांच्या समूहात मी एकटी मुलगी होते. सायकलवरून मी केलेला लांब टप्प्याचा हा पहिला प्रवास होता. मी महिला असल्याने सायकलने हे सगळे अंतर पूर्ण करीन का, असा प्रश्न सर्वांना पडला होता; मात्र जिद्द आणि चिकाटीने मी हा प्रवास व्यवस्थित पूर्ण केला. 

- समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर गेल्यावर कशा प्रकारे काळजी घ्यावी लागते?
उंच ठिकाणी गेल्यावर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विचार करण्याची शक्ती कमी होते. त्यामुळे अगदी ‘ग्लास उजवीकडे न ठेवता डावीकडे का ठेवला’ अशा किरकोळ विषयांवरदेखील भांडणे होऊ शकतात. अशा वेळी आत्मचिंतन कामी येते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने छातीत पाणी होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी उबदार कपडे परिधान करून, भरपूर पाणी पिऊन स्वतःची काळजी घ्यावी लागते.

- सायकल रॅलीच्या माध्यमातून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे? आणि मोहिमेदरम्यान आणखी काही उपक्रम राबविला जाणार आहे का?
एखादी गोष्ट जमणार नाही असा नकारात्मक विचार आपण अनेकदा करतो; पण मनातून तीच नकारात्मक भीती काढून टाकल्यावर ध्येयापर्यंत सहज पोहोचता येते. आज मी माझ्या मनातल्या भीतीवर मात करून हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करू शकते, ते वयाकडे दुर्लक्ष करून. ‘मनातली भीती काढून, भीतीवर मात करून तुम्हीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा,’ असा संदेश आम्हाला इतर महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मोहिमेचे नाव ‘कॉन्करिंग फीअर’ असे ठेवले आहे. ४० दिवसांचा प्रवास करताना आम्ही विविध लोकांना भेटणार असून, आम्ही किमान ५०० जणांचा सर्व्हे करणार आहोत. यामध्ये मुख्यत्वे महिलांची परिस्थिती, स्वप्ने, समस्या व त्यांचे घरातील स्थान, त्याचबरोबर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत का, याबद्दलची निरीक्षणे नोंदवणार आहोत. या सर्व्हेच्या माध्यमातून पुरुषांच्या समस्येवरदेखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायकल रॅली पूर्ण झाल्यानंतर आम्ही महिलांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी एका संस्थेची निर्मिती करणार आहोत. बाइक व सायकलने काही हजार किलोमीटर प्रवास करण्याचे प्रमाण महिलांमध्ये कमी असते; पण महिलांनी स्वतःला कमी समजू नये. मनातली भीती काढून टाकावी, हा संदेश देणे हाही या मोहिमेचा उद्देश आहे. कोण काय बोलेल याची चिंता बाळगू नये. जग खूप सुंदर आहे. या सुंदर जगाचा आस्वाद घेण्यासाठी, तसेच स्वतःला नव्याने शोधण्यासाठी असे प्रवास केले पाहिजेत, असे मला वाटते.
........
(डावीकडून) केतकी जोशी, वासंती जोशी, शुभदा जोशी, आभा मानकर

या मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये : 

मोहिमेचे नाव : कॉन्करिंग फीअर 
- समुद्रसपाटीपासून ते १९ हजार ३०० फूट उंचीपर्यंत सायकलिंग करत जाण्याचा उपक्रम म्हणून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यास पात्र
- २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनी कन्याकुमारीहून मोहिमेची सुरुवात
- उमलिंग ला खिंडीतून जाणाऱ्या आणि जगातील सर्वांत उंचीवरच्या  (समुद्रसपाटीपासून सुमारे १९ हजार ३५० फूट) वाहतूकयोग्य रस्त्याचे (मोटरेबल रोड) नोव्हेंबर २०१७मध्ये उद्घाटन करण्यात आले. त्या रस्त्यावरून प्रवास करून मोहिमेची सांगता.
- पाच जुलै १९१६ रोजी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठ स्थापन केले होते. त्यांना आदरांजली वाहून सायकलयात्रेची सांगता. 
- १०० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या ‘एसएनडीटी’चा ध्वज एका महिलेकडून एवढ्या उंचीवर झळकवला जाणार.
- ५५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलेने अशा प्रकारची सायकल मोहीम एकटीने पार पाडण्याचा हा पहिलाच प्रयत्न.
- प्रवासाचा आठ हजार फूट उंचीपर्यंतचा टप्पा म्हणजेच कन्याकुमारी ते मनाली हे ३७०० किलोमीटरचे अंतर २५ दिवसांत कापण्याचे नियोजन
- आठ हजार फूट ते १९ हजार ३५० फूट उंचीपर्यंतचे म्हणजेच मनाली ते उमलिंग ला, लेह हे ५७५ किलोमीटरचे अंतर १० ते १२ दिवसांत पार करण्याचे नियोजन
- प्रवासादरम्यान रस्त्यांची स्थिती, नद्यांची स्वच्छता, झाडांची घनता, जंगलांची स्थिती आदी अनेक मुद्द्यांवर निरीक्षण नोंदवली जाणार असून, विविध मूलभूत सोयींसंदर्भात विविध वयोगटातील महिलांशी चर्चा करून सद्यस्थितीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  
- स्त्री-शक्तीचा आविष्कार - ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’च्या संस्थापक संचालिका शुभदा जोशी (६२) या वासंती जोशी यांच्या मेंटॉर आहेत. त्यांच्यासह कन्या केतकी जोशी (२६) हीदेखील वासंती जोशी यांच्या टीमचा भाग असणार आहे. एकंदरीत, ही संपूर्ण मोहीम केवळ स्त्री-शक्तीचाच एक आविष्कार असणार आहे. 

(या मोहिमेसंदर्भात कोणाला काही सूचना करायच्या असतील किंवा आर्थिक मदत करायची असेल, तर वासंती जोशी (९७६६६ ३६०११) किंवा शुभदा जोशी (९८२२० ३४५९७) यांच्याशी संपर्क साधता येईल.)

(वासंती जोशी आणि शुभदा जोशी यांचे मनोगत सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Supriya Damle,pune About
Best of Luck Vasant tai.We definitely meet after your Successful record.
1
0
DR. REKHA SHERBET About
खूपच छान वाटले. पुण्यात भेटायची ईच्छा होती, पण वेळेअभावी नाही जमले. एक दिवसासाठी चुकामूक झाली. अभिनंदन व पुढील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा डाॅ. रेखा शेरबेट
1
0
Sunita Patwardhan About
All the best to all of you, take every care, you all will certainly do that👍
1
0
Manasi Atitkar About
Very motivational and inspirational journey of women power . All the best 👍👍👍
1
0
चंद्रशेखर बापट About
छान मुलाखत, आम्हा सर्व बापट कुटुंबियांना तुझा अभिमान आहे
1
0
अरुण गोगटे About
Very nice interview. Quite thrilling . Wish you all the best .
1
0
Vidya Gupta About
You are simply great and idol to not only women but to men also. Wish you successful adventure, Conquering fear!
1
0

Select Language
Share Link
 
Search