Next
आणि अंगणवाड्या खुलल्या...
BOI
Thursday, August 02, 2018 | 04:36 PM
15 1 0
Share this story


पुणे : अंगणवाडीत पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर त्या दिवशी आश्चर्याचे भाव आणि हसू फुलले होते. का माहितीय? कारण त्यांच्या अंगणवाडीच्या वर्गात जादूच झाली होती. त्यांच्या वर्गाच्या भिंतीवर रंगीत फुले फुलली होती, त्यांचे आवडते प्राणी, पक्षी त्यांच्या भेटीला आले होते. त्यांचा वर्ग एकदम सुंदरच होऊन गेला होता. मुले आपली अंगणवाडी बघून आनंदाने बागडत होती, हसत होती. सगळे वातावरणच बदलून गेले होते. ही किमया घडवली होती ‘दी एक्स्टसी हब’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी. 

आर्थिक दुर्बल गटातील बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारच्या बालविकास विभागातर्फे अंगणवाड्या चालवल्या जातात. पुण्यात कोथरूड परिसरात १३६ अंगणवाड्या आहेत; मात्र त्यांची स्थिती फार उत्तम नाही. सायली पोंक्षे यांनी काही अंगणवाड्यांना भेट दिली, तेव्हा तिथली स्थिती फार चांगली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रंग उडालेल्या भिंती, तुटलेली दारे अशा स्थितीत अंगणवाड्या दिसून आल्या. लहान मुलांना अशा ठिकाणी शिकावं लागतं, दिवस काढावा लागतो, हे बघून त्यांना खूप वाईट वाटले. ही जागा मुलांना शिकण्याची गोडी वाटेल, अशी केली पाहिजे असे त्यांना वाटले. या वर्गांच्या भिंती रंगीबेरंगी, संवाद साधणाऱ्या केल्या तर मुलांना इथं बसायला आवडेल, शिकण्याची गोडी निर्माण होईल, असे लक्षात आल्याने सायली पोंक्षे यांनी अंगणवाड्यांचा कायापालट करण्याचा विडा उचलला. सायली पोंक्षे यांनी मे २०१७ मध्ये ही सामाजिक संस्था स्थापन केली आहे. 

पोंक्षे यांच्यासह ३५ ते ४० स्वयंसेवक या मोहिमेसाठी सज्ज झाले. त्यात सायलीची आई सुरेखा पोंक्षे यांच्यासह गौतमी भोर, इशान चिंचोरकर, भूषण देशपांडे, अदित्य आठवले, राजेंद्र जगताप, निखील आकुत, खुशमित सिंग, लीनता राव आदी सगळी तरुण मित्रमंडळींची फौज अगदी उत्साहाने सहभागी झाली होती. १४ जुलैला त्यांनी राऊतवाडी अंगणवाडीपासून या कामाचा शुभारंभ केला. रंग, ब्रश आणि अन्य साहित्याचा सगळा खर्च त्यांनीच उचलला. अवघ्या चार -आठ दिवसांतच या अंगणवाडीचे रूपडे पालटून गेले. भिंती रंगीबेरंगी चित्रांनी सजल्या. आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला. अर्थातच हे काम करण्यासाठी त्यांना प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला. अंगणवाड्या देखभाल, सुधारणेसाठी कोणत्याही निधीची सोय नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या स्वयंसेवकांनी स्वतःच पुढाकार घ्यायचे ठरवले. या कामासाठी लागणारा पैसा त्यांनी स्वतःच्या खिशातून आणि काही देणग्यांमधून उभा केला. 

त्यांच्या या कामामुळे मुले तर खूश झालीच; पण मोठ्या लोकांनीही खूप कौतुक केले. संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाड्यांचे रंगरूप बदलून टाकायचे त्यांचे उद्दिष्ट आहे, मात्र त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्याकरिता दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठी सायली पोक्षे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. 

सायली पोंक्षे
मुळात आयटी इंजिनिअर असलेल्या सायलीने एक वर्ष नामांकित आयटी कंपनीत काम केल्यानंतर नोकरी सोडून, उद्योजक रवींद्र गद्रे यांच्या समवेत पर्यावरणपूरक उत्पादने करणारी ‘ग्रीन अर्थ इक्विपमेंट’ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे निर्माण करते. सध्या त्यांनी  सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावणारे ‘दाहिनी’ नावाचे उपकरण विकसित केले आहे. त्यांच्या ‘दी एक्स्टसी क्लब’तर्फेही पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी दर महिन्याला विविध उपक्रम राबवले जातात. सध्या ८० स्वयंसेवक या संस्थेशी जोडलेले आहेत. 


(अंगणवाडीच्या कायापालटाबद्दल सायली पोंक्षे यांनी व्यक्त केलेले मनोगत सोबतच्या व्हिडिओत... )
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Harshawardhan Borhade About 203 Days ago
very nice. zakaas....
1
0
Rekha Shende About 203 Days ago
Very good! Keep it up! U r the pillers of the next generation!
1
0

Select Language
Share Link