Next
लोकनेते बटेसिंहभैया रघुवंशी जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन
शशिकांत घासकडबी
Wednesday, August 14, 2019 | 09:21 PM
15 0 0
Share this article:

नंदुरबार : ‘रुग्णसेवा हे महान कार्य असून यासाठी प्रत्येक घटकाने घेतलेल्या मेहनतीचे फळ निश्चितच मिळेल,’ असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. स्वर्गीय बटेसिंहभैया रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच झालेल्या आरोग्य शिबिरात ते बोलत होते. या वेळी शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील अनेक रुग्णांवर एसएनबीटी रुग्णालयात पुढील उपचारदेखील करण्यात येणार आहेत. लोकनेते स्वर्गीय बटेसिंहभैया यांच्या जयंतीनिमित्त आमदार चंद्रकात रघुवंशी मित्रमंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात गरजू रुग्णांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळी साडेनऊपासूनच यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा दिसून आल्या. या आरोग्य शिबिरासाठी एसएनबीटी रुग्णालयाचे २० डॉक्टरांचे पथक दाखल झाले होते. ४०हून अधिक नामवंत डॉक्टरांनी शिबिरात रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात ३० जणांचा नर्सिंग स्टाफ आणि ३० जणांचा पॅरामेडिकल स्टाफ कार्यरत होता.

शिबिरात विविध विभागांमध्ये २४८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील शंभरहून अधिक रुग्णांची टू-डी-इको चाचणी करण्यात आली. ५० रुग्णांची तात्काळ सोनोग्राफी आणि शंभरहून अधिक रुग्णांचे डिजिटल एक्स-रेदेखील काढण्यात आले. २५० जणांचा ईसीजी काढण्यात आला. शिबिरातील ७०हून अधिक रुग्णांना हृदयविकाराच्या तपासणीसाठी एसनबीटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

विविध प्रकारच्या ३५०हून अधिक रुग्णांवर एसएनबीटी रुग्णालयात पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. रुग्णांना कमीत कमी त्रास होण्याच्या अनुषंगाने उत्तम नियोजन करण्यात आले होते. शिबिरातील सर्व रुग्णांना मोफत औषधेदेखील वितरित करण्यात आली. या निःशुल्क शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनेदेखील विशेष मदत करण्यात आली. शिबिराच्या यशस्वितेसाठी नंदुरबार आयएमए संघटनेसोबतच, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब - नंदुरबार, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन व तालुका विधायक समितीचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारीवृंदाने विशेष मेहनत घेतली.

या शिबिराच्या ठिकाणी नंदुरबार नगरपरिषदेचे नगरसेवक, ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि आमदार चंद्रकात रघुवंशी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरस्थळी आयोजित रक्तदान शिबिरालादेखील उत्तम प्रतिसाद लाभला.

लोकनेते स्वर्गीय बटेसिंहभैय्या यांची ही ९०वी जयंती असल्याने ९० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजवंत रुग्णांना या रक्तपिशव्या दिल्या जाणार आहेत.

रुग्णांना शिबिरस्थळी नाश्ता आणि फळांचेदेखील वाटप करण्यात आले. सायंकाळी शिबिर संपल्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. ‘रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने मानवसेवा असून, या पुण्याच्या कामात सर्वांनी घेतलेली मेहनत निश्चितच अमूल्य आहे,’ असे त्यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search