Next
अनुराधा ताटके यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
BOI
Tuesday, February 05, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : येथील कै. केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा माधव ताटके या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. दी न्यू एज्युकेशन सोसायटी आणि शाळेतर्फे त्यांचा हृद्य सत्कार सोहळा एक फेब्रुवारी २०१९ रोजी झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, संस्थेच्या सीईओ सुमित्रा बोडस, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, कार्यकारिणी सदस्य अर्चना जोशी, निवृत्त शिक्षिका सुधा भावे उपस्थित होत्या.



या प्रसंगी बोलताना अ‍ॅड. भावे म्हणाल्या, ‘मूकबधिर शाळेचे अभ्यासक्रम, शिक्षक, कर्मचारी भरतीचे दोन प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचले आहेत; तसेच मुलांना सोडण्यासाठी येणार्‍या पालकांच्या हाताला काम द्यावे, विद्यार्थ्यांचे पुनर्वसन याबाबत चांगले निर्णय संस्था घेत आहे. मुलगा कर्णबधिर असल्याने जयंवत भिडे यांनी कर्णबधिरांसाठी शाळा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांना दी न्यू एज्युकेशन सोसायटीने बळ दिले व १९८१मध्ये के. प. अभ्यंकर मूकबधिर शाळा सुरू झाली. भिडे यांच्या मोठ्या मुलीने भावाला सांभाळताना प्रशिक्षण घेतले व याच शाळेत त्या शिक्षिका झाल्या व मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त होईंपर्यंत मोठे योगदान दिले.’
 
सत्काराला उत्तर देताना ताटके यांनी शाळेचा ओझरता इतिहास मांडला. माजी मुख्याध्यापिका फाटक व माजी मुख्याध्यापक अरुण फाटक यांच्याकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले, शिकायला मिळाले, त्यामुळेच येथे चांगले काम करता आल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.



या वेळी रत्नागिरी जिल्हा कर्णबधिर विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक अरुण फाटक, शिक्षक रमेश घवाळी, विद्यार्थी, पालकांनी मनोगतामध्ये ताटके यांनी विद्यार्थी व शाळेसाठी घेतलेली मेहनत, संघटना स्थापनेसाठी मदत केल्याचे सांगितले. शाळा व संस्थेतर्फे अनुराधा ताटके व पती माधव ताटके यांचा सत्कार करण्यात आला.

शाळेचे नूतन मुख्याध्यापक गजानन रजपूत, सीमा मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले. नूतन मुख्याध्यापकांचेही या वेळी संस्थेतर्फे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link