Next
‘हे काम बसू देत नाही...’
BOI
Sunday, July 08, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story


‘हे काम म्हणजे चाक आहे. ते तुम्हाला बसू देत नाही. माझ्या मागनं येणारा जो कार्यकर्ता आहे, तो इथून तयार झालेला आहे. आपण किती काळ करणार? त्यामुळे नवे कार्यकर्ते पुढे यायला हवेत...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या दीर्घ मुलाखतीचा हा आठवा भाग...
........
देवदासी प्रथा आणि महिलांसाठीच्या स्वयम् केंद्राची संकल्पना याबद्दल सांगा..
गिरीश प्रभुणे : आम्ही आता देवदासी प्रथेवर काम करत आहोत. २००७च्या विवेकच्या दिवाळी अंकात मी त्याबद्दल लिहिले आहे. भीमराव गस्तींवर मी लेख लिहिला असून, तो देवदासींच्या संदर्भातला आहे. ते गेली १५-२० वर्षे देवदासींच्या कार्याशी संबंधित आहेत; पण ती प्रथा बंद कशी करायची, हे अजून नाही समजलं. दलित किंवा पददलित, भटक्या-विमुक्त, बेरड, रामोशी याच समाजातल्या मुली देवाला सोडल्या जातात आणि त्या पुढे वेश्या व्यवसायाला लागतात. या विषयाला अधिक प्राधान्य देण्यासंदर्भात भीमराव गस्तींबरोबर बोलणं चाललं आहे. शासनानं देवदासी निर्मूलन कायदा केला आणि देवदासींना पेन्शन सुरू केली. पेन्शनचा गैरलाभ घेतला गेला आणि देवदासींची संख्या वाढली. का, तर देवदासी झालं तर पेन्शन मिळते. आणि त्यामुळे सोडणाऱ्यांची संख्या वाढली. आई-वडिलांनी मुलीला देवाला सोडायचं आणि तिचे पैसे घ्यायचे आई-वडिलांनीच. या देवदासी पुन्हा आई-वडिलांनाच पैसे पाठवतात. त्यामुळे एकीकडे धंदा मार्गी लागणार, दुसरीकडे पेन्शन मिळणार. ‘निर्मूलना’चा नेमका उलटा परिणाम झाला. 

‘पारधी’ हे पुस्तक लिहिलं तसं ‘पालावरचं जिणं’ हे पुस्तकही लिहिलं. कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग व्हावा, हा उद्देश होता. इथे चिंचवडला गुरुकुल सुरू केल्यानंतर, ते आणखी सक्षम कार्यकर्ते बनवण्याचं केंद्र व्हावं, म्हणून आता आम्ही इथे महिलांचं एक स्वतंत्र युनिट सुरू करतोय... ‘स्वयम्’ नावाचं.. म्हणजे तिने स्वतःहून उभं राहावं आणि या सगळ्या समस्या सोडवायला हातभार लावावा. कारण मलाही काही मर्यादा आहेत. मी त्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करतो. 

आम्ही समितीचीही शाखा सुरू केली. कमलाताईंना सहा वर्षांपूर्वी भेटलो होतो नागपूरमध्ये. त्यांना म्हटलं, की प्रत्यक्षात तुम्ही आलात तर समितीचा सगळा वर्ग येईल. त्यांना हे काम कळेल. चिंचवडमध्ये आता एक वर्ष झालं, तर यमगरवाडीला बारा वर्षं समितीची शाखा झाली. आता-आता समितीचे कार्यकर्ते यायला लागले. शेवटी २००७ला त्या आल्या आणि मग या सगळ्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. त्यांना सांगितलं, या शाखेला इथल्या समितीचे कार्यकर्ते भेट देत नाहीत. अभ्यास, योग्य उपचार झाले पाहिजेत. शाखेचे वर्ग होतात ते बरोबर सुरू झाले; पण समितीचा होत नाही. का, तर त्यांची भाषा वेगळी आहे. तोंडात शिवीगाळ आहे. काही दिवस जावे लागतात, चांगलं होण्याकरिता. चांगले आले तर चांगलं होणार. चांगले कोणी आलेच नाहीत, तर म्हणजे दुधात पाणी घालायचं का पाण्यात दूध घालायचं? इथे दूधच घातलं पाहिजे. हे सगळं पाणीच आहे नुसतं. आणि हे पाणीसुद्धा इतकं खराब आहे. मग चांगलं करायचं असेल, तर आलं पाहिजे. त्यांनी मग इथल्या शाखेला भेट दिली. त्यांनी एक-दोघींना सांगितलं. अजून कोणीही परत आलं नाही. कारण समस्या ऐकल्या, की सगळे थरथरून जातात. त्यांचा दोष नाही आहे तो. 

आता मी असं म्हटलं, की स्वयम् केंद्र असं उभं करू. मग एक फ्लॅट घेऊ, तिथे त्या मुली/स्त्रिया राहतील. अत्याचार झालाय, नवऱ्यानं सोडलयं, बारा-पंधरा वर्षांच्या मुलींची लग्न झाली आहेत नि दोन मुलं झाल्यावर नवऱ्यानं सोडून दिलं आहे, अशा मुली/स्त्रिया काय करणार? जगण्याचा दुसरा मार्ग नाही. मग मुलांना सोडणार आणि जाणार कुठेतरी धाब्यावर. मग ठरवलं, की अशा मुलींना इथे आणू. तीन-चार महिने राहील. तिच्या आरोग्याची काळजी घेऊ. लहान मूल असेल, तर त्याचा सांभाळ कसा करायचा ते बघून तिला खादी ग्रामोद्योग किंवा कुठलं तरी प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करता येईल. कुणीतरी पाच-१० हजार रुपये दिले, तर तिचा व्यवसाय सुरू करू. आत्ता अशा पंधरा मुली आहेत, की ज्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. लहान मुलं आहेत त्यांना आणि १८ वर्षांच्या आतल्या आहेत सगळ्या. लग्न झालंय, नवऱ्यानं सोडून दिलंय. काहीही काम करू शकतात त्या. धुणी-भांडी का होईना, करतील; पण राहायचं ठिकाण, सुरक्षा दिली पाहिजे. त्यांना थोडी आध्यात्मिक साधनाही द्यावी लागेल. त्यांना खादीग्रामोद्योगच्या मदतीने शिलाईचं काम देऊ शकू. त्या मुलांचे कपडे शिवतील. हॉस्पिटलचे कपडे शिवतील. जिथे वारंवार कपडे लागतात, अशी सुमारे १५ हॉस्पिटल्स मी निवडली आहेत. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, की तुम्ही आम्हाला वेळेवर दिलंत, तर आम्ही बेडशीटचं काम देऊ. बेडशीटला काय लागतं? दोन टिपा मारायच्या असतात कडेने. सहा महिने झाले, की ते खराब होतं. त्यांनी म्हटलं आहे, ‘तुम्ही द्या, आम्ही घेऊ तुमच्याकडून.’ या महिलांना काम मिळेल. त्या गुंतून राहणं महत्त्वाचं. गुंतून राहिल्या तर रमतील. दोन वेळच्या जेवणासाठी एक मेस करू. इथे आहेच आता. मेसमध्ये जेवण कमी खर्चात बसवू. त्या राहतील. बरं या अशा महिलांनी महिलांचंच केलं पाहिजे. नाही तर आणखी समस्या होतील. तारुण्यात यायला लागलेल्या मुलींचं योग्य मुलगा पाहून लग्न लावून टाकू. अशी ती स्वयम् ही कल्पना आहे. बरं, हे असं केंद्र नाही, की त्यांनी जाऊन लढा द्यावा. लढा कुणाशी देणार? किती जणांशी देणार? इथे यांना उभं करणं, शिक्षण देणं, त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहणं, दुसरं लग्न करताना योग्य मुलगा बघून लग्न करणं, हे आम्ही आता सुरू करतोय. 

मध्यंतरी माझ्याकडे पुण्यातलीच एक महिला आली होती. त्या गोव्यामध्ये लमाणांमध्ये काम करतात. त्या म्हणाल्या, ‘गोव्यामध्ये लमाण स्त्रिया पुरुषांची मसाज केंद्रं चालवतात.’ म्हटलं हे कसं काय? लमाणांच्यात अत्यंत कडक कायदे आहेत; पण घरातले पुरुष, नवरा आरामात राहतो आणि बाई जाऊन हे करते. म्हणजे हा सेक्स वर्करचाच एक प्रकार झाला. तिथे अशी किमान शे-पाचशे केंद्रं आहेत, जी लमाण स्त्रियांनी चालवली आहेत. त्यांच्यात एड्सची लागण सुरू झाली आहे. त्या महिलांना दुसरा व्यवसाय कसा द्यावा, काय द्यावा याचा शोध घेण्याचा प्रश्न घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. अशा अनेक समस्या आहेत.

हे काम म्हणजे चाक आहे. ते तुम्हाला बसू देत नाही. माझ्या मागनं येणारा जो कार्यकर्ता आहे, तो इथून तयार झालेला आहे. मग असं लक्षात आलं, की आपण किती काळ करणार? एक दिवस काहीतरी होणार आणि आपण जाणार. त्यामुळे नवे कार्यकर्ते पुढे यायला हवेत. या कामातनंच एखादा कोणी तयार होईल तो होईल. मग लक्षात आलं, की जोपर्यंत आपण जागा सोडत नाही, तोपर्यंत दुसरा कोणी येणार नाही. मग एका वर्षाची मुदत घेतली आणि मुकुंदराव पणशीकरांना सांगितलं, की पुढच्या वर्षाच्या जूनपासून मी थांबणार. ते आजारी पडले होते. गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे झालं होतं. मी ठरवलं होतंच, की इथं काम करणं सुरू राहील; पण पद नाही घेणार. का? तर मागणी असते त्या पदाची, ते करावं लागतं. हिंडावं लागतं. फिरावं लागतं. ज्या काही समस्या तयार झाल्या आहेत, त्याच्यापुढचं काम, संशोधन कोणीतरी करायला पाहिजे. जाती-जातींच्या समस्या आहेत, त्यांच्यावर लिखाण करून ते मांडलं पाहिजे. सगळं एका वेळेला, एकच माणूस कसा करत राहील? पुन्हा ते बरोबर करतोय हे कोण ठरवणार, मी पुस्तकात लिहिलंय मोकळेपणाने. मी जे करतोय ते तपासायचं कुठल्या निकषावर? मी सांगतोय म्हणजे बरोबर आहे. मी बोलतोय म्हणजे बरोबर आहे. लोकं टाळ्या वाजवायचे. डोळ्यातनं पाणी काढतात आणि नंतर निघून जातात. बौद्धिक आनंद होता. मी म्हटलं, हे काही खरं नाही. तरीसुद्धा हे काम करावं लागणार आहे. 

या बारा-तेरा पोरी माझ्या घरी आल्या. त्यांच्या आई-वडिलांनी सोडलं त्यांना. ते जेलमध्येच आहेत. काय करणार? मग मी हे सगळं आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना सांगितलं, की असं-असं आहे. चला माझ्या घरी, बघा. माझी बायको जाते कामाला. मुली जातात कामाला. माझी मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं. कोणीतरी घरात असायचं. आता सगळेच बाहेर जाणारे. यांना जेवण-खाण घालणं, सगळं करणं, कोण करणार? मला थांबावं लागतं. मी थांबलोय इथे. ‘पारधी’ पुस्तकाचं माझं लिखाण चालू होतं त्या वेळेला. ते कार्यालय, घर अजूनही आहे. म्हटलं, हे आता करायचं असेल, तर पुन्हा एकदा सुरू करू. मी त्यात लिहिलंय, की मी यमगरवाडीची वाट चालवली. यमगरवाडीची वाट याचा अर्थ तो मार्ग चालवला, आणि तो हा.

मला अत्यंत वाईट सवय आहे, एखादी समस्या आली की त्या समस्येचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय मी ती सोडतच नाही. कारण अर्धवट सोडणार म्हणजे कुठे सोडणार? ती बाई राहणार कुठे? ती मुलगी राहणार कुठे? करणार काय? आमचं पूर्ण घर त्याच्या कामात लागायचं. बायको विचारायची, मग स्वयंपाक कसा-कसा, किती करायचा. आम्ही पाच जण घरातले. माझे वडील होते, ते वारले आता. पन्नास-साठ चपात्या रोज करून घ्याव्या लागायच्या. मग बाई ठेवावी लागे. कारण रोज कोणीतरी दोघं-चौघं जण तरी येणारच. नंतर घरात असेल ते संपून जायचं. ते म्हणायचे, ‘बाबा हे काय?’ मी म्हणायचो, ‘आता घ्या करून तुम्हीच काहीतरी.’ यमगरवाडीतला एक मुलगा शिक्षक रागावले म्हणून चालत आला तिथून साडेतीनशे किलोमीटर. सहा दिवस लागले त्याला चालत यायला. ते तिकडे शोधत बसले. इथे आला, घरी आला. पोलिस आले, ते म्हणाले, ‘हा मुलगा सांगतोय प्रभुणे काका, प्रभुणे काका.’ मी इथं सगळ्यांना माहिती होतो. चाफेकर चौकातले पोलिस घेऊन आले. तीन दिवस, गरम पाण्याने आंघोळ घातल्यानंतर पुढचे चार-एक दिवस झोप काढली त्याने. जेवायचा, झोपायचा. पाय असे सुजलेले होते, सहावी-सातवीतला मुलगा... बरा झाला, परत यमगरवाडीला पाठवून दिला. आता दहावी झाला. इथे टिळक स्मारक मंदिरात त्याला नोकरीला लावलं. टिळक स्मारक मंदिरात जे कार्यक्रम असतात, त्याची तयारी करणं, वगैरे असं काय काय करतो. दीपक टिळक म्हणाले, ‘तुमच्याकडे काही मुलं असतील, तर आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना कामाला लावू.’ गेल्या वर्षी त्यांनी ‘पारधी’ला पुरस्कार दिला. मी समस्या मांडल्या. सगळे म्हणाले, ‘काही चिंता करू नका. तुम्ही मुलं द्या, फक्त मुलं प्रामाणिक असली पाहिजेत.’

...पण समस्या सुरू राहतात आणि कामही अव्याहतपणे सुरू राहतं...
......
(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link