Next
मुलांना हवा तुमचा सहवास...
BOI
Saturday, September 01, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


दोघांनीही नोकरी करून भरपूर पैसा कमवायचा, म्हणजे मग मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करता येतील, असा विचार आजकाल सर्व पालक करतात आणि इथंच ते चुकतात. एक वेळ मुलांना चार सुखसोयी कमी मिळाल्या तरी चालतील मात्र त्यांना पालकांचा किमान काही वेळ मिळणं, त्यांचा सहवास मिळणं ही त्यांच्या भावविश्वाची सर्वांत महत्त्वाची गरज आहे.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या पालक-मुलांच्या नात्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल...
..................................
केजीमध्ये शिकणाऱ्या छोट्या समीक्षाला घेऊन तिची आजी भेटायला आली. त्या दोघी आल्या तेव्हा समीक्षा हुंदके देत होती. रडून रडून तिचे डोळे आणि छोटंस नाक लाल लाल झालं होतं. आजीनं येताना तिला चॉकलेट देऊन कसं बसं शांत केलं होतं, पण समीक्षाकडे पाहून असं वाटत होतं, की ती आता शांत झाली असली, तरी तिचं रडणं परत कधीही सुरू होऊ शकेल. आजी येऊन बसल्यावर समीक्षा आजीच्या मांडीवर बसली आणि चॉकलेट खाऊ लागली. आजीचा दम गेल्यावर आजीने स्वत:हूनच बोलायला सुरुवात केली. 

समीक्षाला तिची आजी पाळणाघरातून घेऊन आली होती. पाळणाघरात असताना ती इतकी रडली, की शेवटी पाळणाघरातल्या मॅडमनी फोन करून तिला घेऊन जायला सांगितलं. खरं तर या पाळणाघरात तिला घालून चार महिने झाले होते, पण ती त्या वातावरणात अजून रुळली नव्हती. पूर्वी ती शाळेत आनंदानं जायची पण आता तिथल्या शिक्षिकाही तक्रार करू लागल्या आहेत, की समीक्षा शाळेत रोज छोट्या- छोट्या कारणांवरून रडते. तिच्या मनाविरुद्ध घडलं की वर्गाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसते आणि मग कितीही समजावलं, जवळ घेतलं, खेळायला बोलावलं तरी अजिबात येत नाही. पाळणाघरात तिच्या आवडत्या एक मावशी आहेत. त्यांच्याच जवळ ती बसते. त्या थोड्या वेळासाठी जरी उठल्या तरी खूप रडते. काही खात नाही, खेळत नाही. सुरुवातीला वाटलं नवीन वातावरणात रुळायला जरा वेळ लागेल. पाळणाघरातल्या मॅडमनीही सांगितलं होतं, की महिन्याभरात होईल ती शांत. म्हणून वाट पाहिली. पण आता चार महिने झाले तरी तिचं रडणं काही थांबेना. त्या मॅडमनी सुचवलं म्हणूनच आजी तिला समुपदेशनासाठी घेऊन आली. खरं तर हे काम तिच्या आई-वडिलांनी करणं अपेक्षित होतं. पण त्यांना अजिबात वेळ नाही म्हणून आजी तिला घेऊन आली. 

आजीच्या या एका वाक्यातून त्यांच्या समस्येचा खरा अंदाज आला. त्यामुळे समीक्षाच्या आई-वडिलांबद्दल आजीकडून आणखी माहिती घेतली. तेव्हा असं लक्षात आलं, की समीक्षाचे आई-वडील नोकरीमुळे अनेक तास घराबाहेर असतात. सकाळी समीक्षाला आवरून देणं, तिचं खाणं-पिणं, शाळा, पाळणाघर यासाठी ने-आण करणं हे सगळं काही आजी आजोबाच पाहतात. रात्री आठनंतर तिचे आई-वडील घरी येतात. घरी आल्यावरही ते त्यांचं आवरतात आणि झोपी जातात. 

आणखी एक विशेष लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आई-बाबांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांवरून सतत वाद होत असतात. दोघं एकमेकांशी मोठ-मोठ्याने भांडत असतात. समीक्षाची आई तर कारण नसतानाही बऱ्याचदा चिमुकल्या समीक्षावर जोरजोरात ओरडते. आई-बाबा समीक्षाला वेळ देतात का? या प्रश्नावर आजीची मान अर्थातच नकारार्थी हलली. ते ऑफिसला जातात तेव्हा समीक्षा झोपेतच असते. आणि रात्री येतात तेव्हा तर वाद घालण्यातच जातो. हीच समीक्षाच्या समस्येची खरी कारणं होती. 

त्यामुळे पुढच्या सत्राला तिच्या आई-बाबांना बोलावून घेतलं. समीक्षाच्या समस्येबाबत त्या दोघांशी चर्चा केली. या चर्चेतूनच त्यांचं वर्तन आणि त्याचे समीक्षाच्या भावविश्वावर होणारे गंभीर परिणाम यांची त्यांना जाणीव करून देण्यात आली. सुरुवातीला त्यांना मान्य नव्हतं. त्यांच्या मते ते समीक्षाला पुरेसा वेळ देत होते. पण याबाबत पुढील ३-४ सत्रांत चर्चा करून त्यांना समस्येच्या गांभीर्याची जाणीव करून दिल्यावर मात्र त्यांना आपल्या वर्तनाची जाणीव झाली आणि त्यांनी समुपदेशनाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. सांगितलेले बदल त्यांनी प्रयत्नपूर्वक केले. समीक्षाला दोघांचा पुरेसा सहवास आणि प्रेम मिळालं आणि मग समीक्षाच्या समस्या आपोआपच कमी होत गेल्या. 

(केसमधील नाव बदलले आहे.)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search