Next
संरक्षक ओझोन थर वाचवू या!
प्रशांत सिनकर
Sunday, September 16, 2018 | 06:19 PM
15 1 0
Share this article:

पृथ्वीभोवतीच्या वातावरणात असलेला ओझोन वायूचा थर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून (अल्ट्रा व्हायोलेट रेज) पृथ्वीचे संरक्षण करतो; मात्र मानवाच्या बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांत त्या थराचेच संरक्षण करण्याची वेळ आली आहे. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी दर वर्षी १६ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन थर जतन दिन साजरा केला जातो. ऊर्जेचा जपून वापर करणे, जास्तीत जास्त झाडे लावून पृथ्वीचे हरित कवच राखणे, ऊर्जेचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करणारी उपकरणे निवडणे अशा गोष्टींतून सामान्य माणूसही ओझोन थराच्या संरक्षणाला हातभार लावू शकतो.

वातावरणातील कार्बन मोनॉक्साइड, मिथेन, स‌ल्फर डाय ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड यांसारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचा जीवनरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझोन वायूला धोका निर्माण झाला आहे, पृथ्वीच्या वातावरणात १५ ते ४० किलोमीटर अंतरावर ओझोन वायूचा थर असतो. उत्तर ध्रुवावर ओझोन वायूचा थर विरळ झाला आहे. त्यासाठी कारणीभूत ठरते आहे ती मानवाची जीवनशैली. फ्रीज, एसी, विमानातील एअरोसोल, कीटकनाशक फवारणी यामधून बाहेर पडणारा क्लोरोफ्लोरो कार्बन (सीएफसी) हा वायू ओझोनचा थर विरळ करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याचे दिसून येते. या बदलाचे प्रमुख कारण हवामानातील प्रदूषणाची वाढती मात्रा आहे. पृथ्वीचे तापमान वाढते आहे, याचाच अर्थ सूर्याच्या अतिनील किरणांचा वातावरणात प्रवेश होण्यास सुरुवात झाली आहे. हे अतिनील किरण पृथ्वीच्या कक्षेत शिरू नयेत, म्हणून ओझोन वायू कार्य करतो; मात्र त्याच्या थरालाच छिद्र पडल्यामुळे त्या किरणांचा धोका वाढतो आहे. ओझोन वायू ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेला असतो. हा वायू अस्थिर असून, जेवढ्या वेगाने तयार होतो, तसाच वेगाने तो नष्टही होतो. तो उत्तम ऑक्सिडाइझिंग वायू असून, उच्च तापमानाला त्याचे एकदम विघटन होते. हवेत कार्बन मोनॉक्साइड, मिथेन, स‌ल्फर डाय ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, सीएफसी, सीटीसी, कार्बन टेट्राक्लोराइड या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. या वायूंमुळे ओझोन वायूचा थर कमकुवत होतो आणि थराला ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यातून सूर्याची अतिनील किरणे वातावरणात प्रवेश करतात. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतिबिंदू, बहिरेपण या व्याधी माणसाला होऊ शकतात, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांनी दिली. 

मुंबई-ठाणे शहरात पूर्वी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत असायचे. आता ते ४३ अंशांपर्यंत पोहोचले आहे. जगाचे तापमान वाढले, तर जीवसृष्टी पृथ्वीवर टिकू शकणार नाही. ओझोन वायूचा थर आणखी कमी झाला, तर शेतीवर विपरीत परिणाम होऊन, जंगलांचा भागही कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक लहान जीव नष्ट झाले असून, एकंदरीत जैवसाखळीच धोक्यात येत आहे. उत्तर ध्रुवावरील अंटार्क्टिका भागात ओझोन वायूचा थर कमी झाल्याचे आढळून येत असल्याचे डॉ. टेकाळे यांनी सांगितले.

ऊर्जेचा कार्यक्षम वापर म्हणजेच बचत करणे, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करणे, प्रदूषण कमी करणे आणि वृक्षारोपण करणे या मानवाच्या हातात असलेल्या गोष्टी आहेत. त्यातून पर्यावरणाच्या आणि ओझोन थराच्या संरक्षणाला हातभार लागू शकतो. फ्रीज, एसी वगैरे उपकरणे निवडताना ‘फाइव्ह स्टार रेटिंग’ असलेली उपकरणे निवडल्यास ती ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणारी असतात. 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search