Next
‘लोकराज्य’चा निवडणूक विशेषांक प्रकाशित
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 04:06 PM
15 0 0
Share this article:मुंबई : निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या तसेच मतदार व उमेदवारांसोबतच अभ्यासक, विश्लेषकांना मार्गदर्शक ठरणाऱ्या लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते चार एप्रिल २०१९ रोजी येथे झाले. अश्वनी कुमार हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

लोकसभा निवडणुकीत सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारा हा ‘निवडणूक विशेषांक’ उत्कृष्ट व संग्रहणीय झाला असल्याचे गौरवोद्गार कुमार यांनी काढले. या वेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, अपर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, पोलीस अधीक्षक (महाराष्ट्र सायबर) बाळसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ‘स्वीप’ मोहीम राबवली गेली. त्याद्वारे आखण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती या अंकात देण्यात आली आहे. या शिवाय महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग,  मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले गेले. मतदार जनजागृती, व्हीव्हीपॅट यंत्र, सी-व्हिजिल ॲप हे त्याचाच एक भाग आहे. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदाराला आपण केलेल्या मतदानाची खात्री पटणार आहे. या यंत्राची रचना व कार्य या बाबत माहिती देण्यात आली आहे. निवडणूक काळात तिसरा डोळा म्हणून भूमिका बजाणाऱ्या ‘सी-व्हिजिल’ ॲपचा वापर कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे कसे होईल याबाबतदेखील निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी ‘पीडब्लूडी’ ॲप व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याबाबत आढावा या अंकात घेण्यात आला आहे.

मतदारांना ऑनलाइन ओळखपत्र, मतदार यादीतील बदल आदींबाबत अर्ज कसा करता येईल, रंगीत ओळखपत्र, मतदानासाठी कुठले ओळखपत्र ग्राह्य धरता येईल, आपले नाव मतदार यादीत कसे शोधायचे आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी २००९, २०१७च्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रे, एकूण मतदार नोंदणी, पुरुष व महिला मतदारांची संख्या, एकूण मतदार व एकूण झालेले मतदान, पहिल्या पाच उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आदी माहितीचा यात समावेश करण्यात आला आहे.

आदर्श आचार संहितेबाबात नेहमी विचारल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या अंकात देण्यात आली आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांसाठी ही प्रश्नोत्तरे मार्गदर्शक ठरणारी आहेत. याची सविस्तर माहिती अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मतदार आणि एक मूल्य’ हे तत्त्व स्वीकारून भारतीयांना प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवून दिला. याबाबतच्या लेखाचाही अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत १० रुपये असून, हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search