Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ८ (वाई)
BOI
Wednesday, May 01, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील वाईमधील पर्यटनस्थळांची....
...........
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी! वाई हे माझे जन्मगाव. त्यामुळे या भागात फक्त वाईमहात्म्य असणार, हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. महाबळेश्वरहून जाता-येता वाईमध्ये गणपती, काशीविश्वेश्वराचे दर्शन घेण्याव्यतिरिक्त बघण्यासारखे भरपूर काही आहे. हा लेख वाचल्यावर वाईमध्ये मुक्काम करण्याची इच्छा नक्की होईल.

बहिरोबा मंदिर, गंगापुरी

स्कंदपुराणांतर्गत कृष्णमहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षत्र’ असा उल्लेख आढळतो. कै. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाई शब्दाची उकल करताना ‘वाय देश म्हणजे कोष्ट्यांचा विणकारांचा देश’ असा अर्थ सांगितला आहे. वाईचा संदर्भ सन ११००च्या सुमारास शिलाहार राजांपासून असला, तरी वाईच्या आसपास बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत. साधारण इ. स. २०० ते ३००च्या दरम्यान सातवाहन काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी. इ. स. ११००च्या सुमारास केंजळगड व पांडवगड शिलाहारांनी बांधले आहेत. सह्याद्री पर्वताची एक शाखा जांभळी, रायरेश्वरापासून शिखर शिंगणापूरपर्यंत आहे. हाच महादेवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. याच डोंगरावर रायरेश्वर, केंजळगड, पांडवगड, मांढरदेवी, शिलाहारांनी बांधलेले वारुगड, संतोषगड व शेवटी यादवराजे सिंधणदेव याने वसविलेले शिखर शिंगणापूर आहे. याच डोंगराच्या दक्षिणेस कृष्णेच्या तीरावर टुमदार, सांस्कृतिक परंपरेचे वाई हे गाव वसले आहे. 

श्री कृष्णाबाईज्ञात इतिहासाप्रमाणे, सन १४२९मध्ये बहामनी सुलतानाचा सुभेदार मलिक उलतुजा याने वाईवर कब्जा केला. बहामनी राज्याचे अस्तित्व संपल्यावर सन १६४८ ते सन १६५९च्या अफझलवधापर्यंत विजापूरच्या आदिलशहाकडे याचा ताबा राहिला. प्रतापगडावर जाण्यापूर्वी अफझलखानाचा मुक्काम वाई येथे होता. अफझलखानाच्या वधापासूनच वाईमध्ये कृष्णाबाई उत्सवाची परंपरा आहे, असे मानले जाते. सन १६८७मध्ये विजापूरच्या शिरजेखान याने वाईवर हल्ला केला; पण हंबीरराव मोहित्यांनी तो परतवून लावला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर वाईवर मुघलांनी हल्ला केला; पण संताजी घोरपडे यांनी तो परतवून लावला व रामचंद्रपंतांचा कारकून शंकर नारायण यांच्या ताब्यात वाईचा कारभार दिला. सन १७०८मध्ये छत्रपती शाहू महाराज सुटून आल्यावर वाई येथील शेखमिरे यांनी त्यांना मदत केली. हे लक्षात ठेवून शाहू महाराजांनी शेखमिरे यांना पसरणी गाव इनाम दिला. याच वेळी रामजी दामोदर गाडगीळ व भिकाजी शामजी रास्ते हे शाहू महाराजांच्या विश्वासातील सरदार वाईत आले. भिकाजी रास्ते यांची मुलगी म्हणजेच गोपिकाबाई हिचा नानासाहेब पेशवे यांच्याबरोबर विवाह झाला त्यामुळे रास्ते यांचे महत्त्व अधिक वाढले. वाईमध्ये रास्ते यांच्यामुळे आमूलाग्र बदल झाले. 

सन १८१८मध्ये ब्रिटिश आले. पाच डिसेंबर १८५५ रोजी वाई नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. सन १८७४मध्ये नगरपालिकेची हद्द ठरविण्यात आली. नगरपालिकेचे पदसिद्ध अध्यक्ष कलेक्टर असत. सन १८८५पासून निवडणूक होऊन आठ सदस्य घेतले जात व आठ सदस्य नियुक्त असत. अध्यक्ष कलेक्टर असत; मात्र मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन निवडून आलेल्या सदस्यातून होत असत. त्याप्रमाणे पहिले चेअरमन महादेव अप्पाजी साठे झाले. सन १९१०मध्ये निवडून आलेल्या सदस्यांतून अध्यक्ष निवडून देण्याचा अधिकार मिळाला व शंकर महादेव पाटणकर पहिले नगराध्यक्ष झाले. 

वाईच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा होता व ज्यांनी वाईचे नाव उंचावले ते म्हणजे प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांची ही कर्मभूमी. स्वामी केवलानंद उर्फ नारायणशास्त्री मराठे, विचारवंत रा. ना. चव्हाण, पद्मश्री यमुनाबाई वाईकर, कविवर्य द. वि. केसकर (घरात हसरे तारे), कविवर्य रवींद्र भट, शाहीर साबळे, उद्योगपती बी. जी. शिर्के, व्ही. एम जोग, पहिलवान गणपतसिंग डाळवाले (परदेशी), पहिलवान शंकरराव घाडगे, वाईनगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब भावे, डॉ. प्र. श. मराठे, रामभाऊ मेरुरकर, शंकरराव जेजुरीकर, भाऊ धोंगडे, मैनाताई नित्सुरे (कलावृंद संस्था), काशीताई नातू, आत्माराम नाईकवडी अशा अनेक दिग्गजांची नावे घेता येतील. योगीराज अरविंद वाई येथील लेलेशास्त्री च्याकडे योगाभ्यास शिकण्यासाठी येत असत. लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय व्यवसाय सोडून कीर्तनाद्वारे राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचे कार्य करणारे व सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देणारे डॉ. पटवर्धनबुवा आता कोणालाच माहीत नाहीत. महात्मा गांधींनी बेळगाव येथे त्यांचे ‘वंदे मातरम्’ ऐकले आणि पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाऊशास्त्री लेले हे विद्वान पंडित होऊन गेले. ते शास्त्र लेखक होते. अत्यंत फटकळ असलेल्या लेलेशास्त्रींबद्दल आचार्य अत्रे म्हणायचे, की त्यांच्याकडूनच ते आक्रमक भाषण करण्याची पद्धत शिकले. 

मेणवली वेस

नदीवर बांधलेल्या घाटामुळे वाईचे सौंदर्य वाढले. त्यावर असलेल्या देवालयांमुळे वाईला ‘दक्षिण काशी’ असे संबोधले जाऊ लागले. रास्त्यांनी गंगापुरी ही नवी पेठ वसविली. विशेष म्हणजे या पेठेतील दक्षिणोत्तर समांतर असलेले रस्ते चार ठिकाणी काटकोनात छेदतात. जणू काही ते नगररचनाकाराने प्लॅन केल्याप्रमाणे वाटतात. गंगापुरीमध्ये येण्यासाठी नदीच्या बाजूने तीन वेशी आहेत. पश्चिमेला धोमकडे जाणारी मेणवली वेस, उत्तर-पश्चिम बाजूची खांबोळा वेस, बेलबाग वेस आणि मधल्या आळीमधील धर्मशाळेजवळील (कृष्णेश्वर कार्यालय) वेस अशा वेशी रास्त्यांनी बांधल्या. 

गंगापुरी घाट

गंगापुरी घाट हा सर्वांत मोठा घाट आहे. त्याची लांबी ३७५ फूट असून, रुंदी ५० फूट आहे. हा घाट संपूर्ण दगडी आहे. पुढे नदीचे विस्तीर्ण पात्र, दक्षिणेला सुंदर झाडी. या घाटाच्या पश्चिमेला दुसरे बाजीराव यांचा ८० फूट रुंदीचा घाट असून, येथे छोटासा डोह होता. वरच्या चौथऱ्यावर वडाचे नदीवर ओणवे झालेले एक मोठे झाड होते. मी येथे पोहण्यास शिकलो. या घाटाच्या वरच्या बाजूला गंगाधर रास्ते यांनी बांधलेला गढीसारखा वाडा असून, त्याला बुरुजही आहेत. या वाड्यात कोर्ट होते. १९४२मध्ये हा वाडा भस्मसात झाला. तेथे आता शासकीय मुद्रणालय आहे. वाड्याच्या दक्षिणेस नदीच्या काठावरच राम मंदिर आहे. मोठ्या घाटाच्या पूर्वेस जेथे उत्सव होतो, तो भानू घाट असून, नदीच्या काठावर दोन बुरुजही बांधले आहेत. येथे केवलानंद सरस्वती राहायचे. 

भानू घाटाच्या उत्तरेस ८२ फूट लांब व ५३ फूट रुंद बांधीव पटांगण असून, येथेच कृष्णाबाईचा उत्सव होतो. त्याच्या पलीकडे भाऊ जोशी यांचा घाट आणि त्याला लागूनच अनगळ वेस आहे. पलीकडे प्राज्ञ पाठशाळेची इमारत दिसते. भानू घाटाला लागूनच उमामहेश्वराचे पंचायतन मंदिर आहे. त्याच्या पूर्वेस भानू वाडा आहे. हे भानू नाना फडणवीसांचे भाऊबंध होते. लहानपणी भानू वाड्यात आम्ही जात असू. त्या वेळी भाऊ भानू नावाचे गृहस्थ होते. आता त्यांच्यापैकी कोणी दिसत नाही.
गंगापुरीत मेणवली वेशीच्या उजवीकडे द्वारका मंदिर आहे. येथे वेदमूर्ती गद्रे यांनी द्वारकेहून आणलेली श्रीकृष्णाची सुरेख मूर्ती आहे. म्हणून याचे नाव ‘द्वारका’ पडले. जवळच गंगाधर रास्ते यांनी बांधलेले ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर असून, आता ते संपूर्णपणे लोकसहभागातून नव्याने आकर्षक पद्धतीने बांधले आहे. मधल्या आळीमध्ये (सत्यपुरी) नदीच्या काठावर पाडळीच्या गाडगीळांनी सुमारे ४० फूट रुंद व १०० लांबीचा कटिंजन घाट बांधला. येथे काही मंदिरे व स्नानसंध्येसाठी इमारत आहे. घाटाकडून वर आल्यावर पट्टाधीश रामाचे मंदिर असून, फक्त गाभारा शिल्लक आहे; मात्र या मंदिरातील राममूर्ती अतिशय देखणी आहे. मधल्या आळीमध्ये हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेची कन्याशाळा आहे. हा मूळचा द्रविड वाडा. येथील कार्यालयातील तख्तपोशी अतिशय सुंदर आहे. 

गणपती मंदिर घाट

वाईचा महागणपती

पुराने वेढलेले गणपतीचे मंदिरमधल्या आळीनंतर येते गणपती आळी. सुप्रसिद्ध गणपती मंदिर व घाट याच पेठेत आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या वाईच्या महागणपती मंदिरास २५७ वर्षे पूर्ण होत आहेत. गणपतराव भिकाजी रास्ते यांनी हे देऊळ १७६२ साली बांधले. कृष्णा नदीच्या पात्रात हे मंदिर गेली २५७ वर्षे महापुराला तोंड देत उभे आहे. याचे बांधकाम पुराच्या धोक्याचा विचार करूनच केले आहे. पश्चिम बाजूकडून येणारे पाणी देवळाच्या दोन्ही बाजूंना प्रवाहित करण्याची किमया येथे साकारली आहे. देवळाच्या सभामंडपावर घडीव दगडाचे छत असून, शिखर ७५ फूट उंच आहे. १२ फूट आठ इंच X ११ फूट ११ इंच चौथऱ्यावर श्री महागणपतीची सात फूट सहा इंच उंचीची मूर्ती विराजमान आहे. 

गणपती घाटावर श्री गंगारामेश्वर मंदिर व भावेश्वर मंदिरही आहे. गणपतीमंदिरासमोरच वसंत व्याख्यानमाला भरत असते. योगायोगाने आत्ताच वसंत व्याख्यानमालेचे १०३वे सत्र सुरू आहे. प्रा. सदाशिव फडणीस व लक्ष्मीकांत रांजणे आणि मंडळी व्याख्यानमालेची धुरा सांभाळत आहेत. गणपती मंदिरासमोरच काशी-विश्वेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराला संपूर्ण १४ फूट सहा इंच उंचीची तटबंदी असून, देवळाचे प्रांगण ९४ फूट रुंद व १६१ फूट लांब आहे. बाजूने धर्मशाळा आणि मधोमध पूर्वाभिमुख घडीव दगडाचे मंदिर असून, देवळाच्या गाभाऱ्याची दगडी चौकट व नक्षीकाम सुरेख आहे. एक मोठी घंटा येथे आहे. एक जाळीदार नक्षी असून, त्यावर नागाचे कोडे आहे. समोर सुबक असा ग्रॅनाइटमधील नंदी, त्याच्या पुढे यज्ञशाळा व २३ फूट उंचीच्या दीपमाळा आहेत. 

काशीविश्वेश्वर दीपमाळ आणि यज्ञमंडप

काशीविश्वेश्वर मंदिरासमोर गोविंद रामेश्वराचे मंदिर आहे. याच पेठेत वाई नगरपालिकेचे कार्यालय आहे. येथे पूर्वी रास्ते यांचा भव्य वाडा होता. तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. येथून पुढे सरळ उत्तरेस गेल्यावर गावाच्या बाहेरच्या बाजूला मोतीबाग हा रास्ते यांचा पेशवेकालीन वाडा आहे. 

मोतीबाग रास्तेवाडा

गणपती घाटाच्या पुढे धर्मपुरी घाट आहे. या घाटाला ‘रवीधुंडीघाट’ म्हणतात. येथेही श्री कृष्णाबाई उत्सव साजरा होतो. या घाटाला लागूनच १०० वर्षांपूर्वीचा पूल आहे. येथे रामेश्वराचे मंदिर असून, त्याच्या बाजूने कुंडे आहेत. उत्तर बाजूला धर्मशाळेला लागून श्री हरिहरेश्वर मंदिर असून, यालाही तटबंदी आहे. समोर त्रिमुखी दत्तमंदिर व बाजूला मारुती असून, खालील बाजूस नागोबाचा चौथरा आहे. या नागोबाला कृष्णेच्या पुराचे पाण्याने वेढा पडला, की आम्हाला शाळेला सुट्टी मिळत असे. 

विष्णु-लक्ष्मी

व्यंकटेश्वर मंदिर

हरिहरेश्वर मंदिरासमोरील रस्ता किसन वीर चौकात जातो. किसन वीर हे यशवंतराव चव्हाण यांचे स्नेही व क्रांतिकारक होते. त्यांच्या स्मरणार्थ या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्याहून वरच्या बाजूस बाजारपेठ असून येथे व्यंकटेश्वराचे (व्यंकोबा) मंदिर आहे. श्रीमती नरगुंदे यांनी बांधलेले हे मंदिर छोटे असले, तरी जुन्या वळणाचे आणि सुंदर आहे व्यंकटेशाची सुंदर मूर्ती येथे आहे. व्यंकटेश मंदिराच्या थोड्या वरच्या बाजूस श्रीराम मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर विष्णुलक्ष्मी व श्री लक्ष्मी मंदिर आहे. 

विष्णूचे मंदिर

विष्णूच्या मंदिरातील गरुडविष्णूचे मंदिर : हे वाईमधील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. संपूर्ण मंदिर मोठ्या घडीव दगडात असून, ११ सुरेख कमानींचा सभामंडप आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी बांधले. यात श्री विष्णू व श्री लक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेला गरूड आकर्षक आहे. त्याच्या पायामध्ये सर्पही दिसतो. गणपती मंदिरासमोरील सभामंडपाला आहे, तसे याचे छत दगडी होते. साधारण ५०च्या दशकात एका दुपारी ते कोसळले. प्रचंड आवाज झाला; पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही. 

लक्ष्मी मंदिर : पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर घडीव पाषाणात बांधले आहे. हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८मध्ये बांधले. कलशाच्या आकाराचे याचे शिखर ५० फूट उंच आहे, तर मंदिराभोवती तटबंदी आहे. याचे खांब घोटीव व कोरलेले आहेत. मंदिराच्या सभामंडपाला पाच स्तंभ असून, निमुळत्या असलेल्या छतामुळे त्याला गुहेसारखा आकार आलेला आहे. मराठा स्थापत्यशैलीतील मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवर नक्षीकाम दिसून येते. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर केलेला दिसून येतो. लक्ष्मी यंत्रासारखी शिखराची रचना करण्यात आली आहे. गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीची ढाल, तलवार आदी आयुधे धारण केलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

देवीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडविते. देवीची पूजा, उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्या दृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे आवाज ध्वनिक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत पोहोचू शकतो. 

सिद्धेश्वर मंदिरपुढे सरळ रस्त्याने धर्मपुरी पेठेतून उत्तरेला गेले, की पागा आहे. आता येथे मैदान व प्राथमिक शाळा आहे. येथे रास्त्यांची घोडे ठेवायची पागा होती. येथे मंडळाची तालीमही आहे. धर्मपुरीची १५ एकर जागा आनंदराव रास्ते यांनी शाहसुल हसन शहामीर शहा, कासमशाह व इतर भाऊ यांच्याकडून पाच हजार रुपयांना घेतली व तसा दस्तही करून दिला. या जागेवरच रास्त्यांनी ४८ घरे दान म्हणून ब्राह्मणांना दिली. म्हणून या पेठेस धर्मपुरी हे नाव पडले. धर्मपुरीच्या पलीकडील पेठ म्हणजे ब्राह्मणशाही. हे मूळ वाईचे गावठाण होय. ब्राह्मणशाहीच्या घाटावर चक्रेश्वराचे, चिमणेश्वराचे, मारुतीचे, काळेश्वराचे व कौंतेश्वराचे मंदिर आहे. घाटाला लागूनच पंतसचिव यांचे विठ्ठल मंदिर आहे. याच्या पुढे रामडोह आळीचा घाट असून, येथे रामेश्वराचे मंदिर आहे. येथे कन्यागतामध्ये १२ वर्षांनी गंगा येते, अशी श्रद्धा आहे. याच्या पुढे भीमकुंड घाट आहे. येथे जवळ स्मशान असल्याने उत्सव येथे न होता कोठावळे यांच्या घरात होतो. अश्या तऱ्हेने सात घाटांवर कृष्णाबाईचे उत्सव साजरे होतात. 

रोकडोबा मारुतीकृष्णा नदीच्या दक्षिण तीरावर सोनगीरवाडी व सिद्धनाथवाडी हे दोन भाग आहेत. सिद्धेश्वराच्या देवळावरून सिद्धनाथवाडी हे नाव पडले. कृष्णा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे हेमाडपंती शैलीतील ३०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. त्याच्या पलीकडे श्री रामदास स्वामी यांनी स्थापना केलेले मारुतीचे मंदिर (रोकडोबा) आहे. सिद्धनाथवाडीतून पुढे एस. टी. स्टँडच्या पलीकडे महाबळेश्वर रस्त्यावर श्री दत्त मंदिर आहे. येथे वाईतील जुन्या पिढीतील काँग्रेस कार्यकर्ते काका देवधर यांचे निवासस्थान आहे. त्याला लागूनच चौंडे महाराज यांनी स्थापन केलेली गोशाळा आहे. 

गोवर्धन संस्था

मुरलीधर मंदिर, गोशाळा

गोवर्धन संस्था :
सन १९०५मध्ये चौंडे महाराज यांनी या संस्थेची स्थापना केली. गोवर्धन संस्था पूर्वी मथुरापुरी येथे होती. या ठिकाणी महात्मा गांधी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मदनमोहन मालवीय, वल्लभभाई पटेल, सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बापूजी अणे अशा अनेक विभूतींनी भेट दिली आहे. मंदिराचा परिसर चौंडे यांच्या वारसदारांनी स्वच्छ ठेवला आहे. ग्रंथालयामध्ये गोपालन/संवर्धन या बाबतीतील ग्रंथ आहेत. मंदिरात श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती आहे. मागील बाजूस गाईंचे गोठे व गोबरगॅस निर्मिती वगैरे प्रकल्प आहेत. 

वाकेश्वर भुयारी विहीरवाकेश्वर : वाई-सातारा रस्त्यावर बावधन हद्दीमध्ये साधारण दोन-तीन किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर वाकेश्वराचे सुंदर मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरातील हे मंदिर हेमाडपंती शैलीतील आहे. मंदिराला संपूर्ण तटबंदी आहे. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यावर याची शोभा अधिकच वाढते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे गाभाऱ्याचे बाहेर असलेला गणपती खूप वेगळा आहे. बारकाईने पाहिले असता लक्षात येते, की या मूर्तीचा शिरोभाग हा इतर मूर्तींप्रमाणे नसून, त्याचा शिरोभाग कथेप्रमाणे हत्तीचे मस्तकारोपण केल्यावर दिसेल तसा दाखविले आहे. येथे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण चालू असते. 

प्राज्ञ पाठशाळा : विजयादशमीस (सहा ऑक्टोबर १९१६) केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांनी, तसेच दिनकरशास्त्री कानडे, गंगाधरशास्त्री सोहोनी, महादेवशास्त्री दिवेकर व भालचंद्रशास्त्री नेने यांनी प्राज्ञ पाठशाळा स्थापन केली. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास व वेदशास्त्रसंपन्न पंडित तयार करणे हा त्यामागचा हेतू होता. केवलानंद स्वामींच्या निवृत्तीनंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संस्थेची धुरा सांभाळली. पाठशाळेच्या पुढील भागात स्वामींची समाधी होती. तेथेच भव्य वास्तू उभारण्यात आली. सध्या तेथे मराठी विश्वकोशाचे कार्यालय आहे. तळघरात स्वामींची समाधी आहे. 

कसे जाल? कोठे राहाल?
वाई हे गाव पुण्यापासून ९० किलोमीटरवर महाबळेश्वर रस्त्यावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन वाठार व सातारा. जवळचा विमानतळ पुणे. वाईमध्ये राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे. जवळच धोम, मेणवली, पांडवगड, मांढरदेव, पाचगणी, महाबळेश्वर ही पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटक येत असतात. 

(मी वाईवर लेख लिहीत असल्याचे समजताच मूळचे वाईचेच असलेले आणि साताऱ्याला राहणारे निवृत्त अभियंता सुहास पिटके यांनी वाईला जाऊन अनेक ठिकाणचे फोटो काढून मला आणून दिले. याबद्दल त्यांचे आभार.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 16 Days ago
So , the Minipality in Wai was established in 1855 , TWO years before 1857 ! Interesting !
0
0
Laxmi Sawant About 169 Days ago
सुंदर
1
0
Sameer About 169 Days ago
छान
1
0
जयश्री चारेकर About 170 Days ago
फारच छान विस्तृत माहिती. आता जायलाच पाहिजे असा लेख
2
0
Bhal patankar About 170 Days ago
Excellent, writing creates such lively image, well drafted, Actually cannot sufficiently thank you for Wai, my birthplace
2
0
Mrs sugandha Deshpande About 170 Days ago
खुप छान वाटले वाईची माहिती वाचुन ,लहानपणीची आठवण झाली, माझे वडिल वाईचे आमचे घर रामडोह आळीत होते.
2
0

Select Language
Share Link
 
Search