Next
सिंड्रेला मॅन...
BOI
Thursday, October 12, 2017 | 03:19 PM
15 0 0
Share this article:

अमिताभ बच्चन

तळागाळात जाऊनही जोरदार पुनरागमन करणाऱ्या माणसाला ‘सिंड्रेला मॅन’ असे संबोधण्यात येते. बच्चन हा आपला असाच एक सिंड्रेला मॅन आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी काल (११ ऑक्टोबर) वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. त्या निमित्ताने विशेष लेख...
...............
देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूरएखाद्या अभिनेत्याबद्दलच्या प्रत्येक पिढीच्या आठवणी या वेगवेगळ्या असू शकतात. अमिताभ बच्चनबद्दल तीन पिढ्यांच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. जेव्हा बच्चन चित्रपटसृष्टीत हातपाय मारण्याचे प्रयत्न करत होता, तेव्हा राज कपूर, देव आनंद, दिलीप कुमार यांच्या प्रभावातून बाहेर न आलेला आणि राजेश खन्नाच्या प्रेमात पडलेला एक मोठा प्रेक्षकांचा वर्ग होता. त्याच्यासाठी हा काटकुळा आणि घोड्यासारखं तोंड असणारा पोरगा अभिनेता म्हणून जबरदस्त तर होता पण तो काही फारसा पुढे जाईल असं वाटत नव्हतं. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांसाठी बच्चन हा महानायकाच्या इमेजमध्ये आहे. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारा अँग्री यंग मॅन म्हणजे बच्चन अशी प्रतिमा त्यांच्या मनात आहे. नव्वद आणि त्यापुढच्या दशकांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या पिढ्यांचं बच्चनबद्दलचं आकलन थोडं वेगळं आहे. त्यांच्यासाठी बच्चन हा एक अप्रतिम अभिनेता आहे. त्यांनी बच्चनच्या सुपरस्टारडमचे किस्से आपल्या वाडवडिलांकडून ऐकले आहेत; पण तो जो बच्चन बघत आले आहेत, तो एक प्रयोगशील चांगला अभिनेता आहे. मला व्यक्तिशः बच्चनची ही अभिनयातली सेकंड इनिंग त्याच्या सुपरस्टार इनिंगपेक्षा जास्त भावते. कारण या सेकंड इनिंगने बच्चनमधल्या अभिनेत्याला खऱ्या अर्थाने आव्हान केलं. त्याच्या कारकिर्दीतल्या काही सर्वोत्कृष्ट भूमिका बच्चनने या त्याच्या सेकंड इनिंगमध्येच केल्या आहेत; पण दुर्दैवाने, जितकं ‘शोले’ आणि ‘दीवार’मधल्या बच्चनबद्दल बोललं आणि लिहिलं जात तितकं ‘सरकार’ आणि ‘पिकू’मधल्या बच्चनबद्दल लिहिलं-बोललं जात नाही. 

अमिताभ बच्चनमाझे लहानपणातला बाळबोध उत्साह सरून खऱ्या अर्थाने सिनेमा पाहण्याचे दिवस सुरू झाले, तेव्हा बच्चनचं फार काही बरं चालू नव्हतं. काही वर्षांपासून निवृत्ती घेतल्यानंतर बच्चन कमबॅक करण्यासाठी धडपडत होता. आपण निवृत्ती घेतल्यावर इंडस्ट्री थांबून राहील असं त्याला कदाचित वाटत होतं; पण जग देवासाठी पण थांबत नाही तर अभिनयाच्या देवासाठी कशाला थांबेल. दरम्यानच्या काळात खान मंडळींनी बस्तान बसवलं. गोविंदा आणि नाना पाटेकर पण फॉर्मात होते. आपल्या ‘एबीसीएल’मार्फत सिनेमे काढून बच्चन जे सिनेमे बनवत होते त्यात बच्चनना बघणं हा प्रामाणिकपणे सांगायचं तर वाईट अनुभव होता. ‘मृत्युदाता’,  ‘कोहराम’,  ‘मेजरसाब’ आणि ‘लाल बादशाह’सारख्या चित्रपटांमध्ये बच्चनला अर्ध्या वयाच्या नायिकांसोबत नाचताना पाहणं आणि आउटडेटेड कथानकांमध्ये पाहणं हा असह्य अनुभव होता. जणू त्या काळात खऱ्याखुऱ्या बच्चनचं कुणीतरी अपहरण करून त्याच्या जागी कुणीतरी दुसराच आणून उभा केला आहे की काय अशी शंका येण्याइतपत बच्चन त्यावेळेस पडद्यावर हरवलेला दिसायचा. ‘कोहराम’मध्ये नाना पाटेकर समोर आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये गोविंदासमोर बच्चनला दुय्यम भूमिकांमध्ये बघून हा एकेकाळचा सुपरस्टार आहे हे आम्हाला पटतंच नव्हतं. त्याच काळात बच्चनने मिरिंडा नावाच्या कोल्डड्रिंकसाठी अॅड केली होती. त्याच्या त्यावेळेस लागणाऱ्या कुठल्याही चित्रपटापेक्षा ती अॅड जास्त चांगली होती. त्या अॅडची टॅगलाइन बच्चनच्या चाहत्यांना चपखल लागू पडत होती, - जोर का झटका धीरे से लगे. बच्चनचं आमच्या पिढीवरचं पहिलं इम्प्रेशन हे असं होत. बदलत्या काळाशी जुळवून न घेता अस्तंगत होत चाललेला अजून एक नायक असं आणि एवढंच बच्चनबद्दल मला आणि माझ्यासारख्या कित्येकांना वाटत होतं. 

अमिताभ बच्चनलोक निवृत्तीनंतरचं आयुष्य कस जगावं या चिंतेत असतात, अशा वेळेस आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघालेला आणि अभिनयाच्या क्षेत्रात बाजूला पडलेला बच्चन मात्र फिनिक्स पक्षासारखं उड्डाण घेण्याच्या तयारीत होता. इतक्या वाईट परिस्थितीतून बच्चनने कमबॅक तर केलंच, शिवाय आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग ही काही अजरामर रोल्स करून अविस्मरणीय बनवली. स्वतःसाठीही आणि प्रेक्षकांसाठीही. हा सेकंड इनिंग मधला बच्चन माझ्यासारख्या अनेकांना मनापासून भावतो. 

अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी बच्चनने स्वतःचा ‘इगो’ बाजूला ठेवून यश चोप्रा यांना कामासाठी फोन केला. यश चोप्रांनीही या आपल्या मित्राच्या यशाचा मान राखण्यासाठी बच्चनला ‘मोहब्बतें’मध्ये संधी दिली. ‘मोहब्बतें’ बॉक्स ऑफिसवर हिट झाला आणि बच्चन नावाच्या फिनिक्सच्या उड्डाणाची सुरूवात झाली. ‘मोहब्बते’मधल्या बच्चनच्या भूमिकेला ग्रे शेड्स होत्या, तरीही बच्चन त्या वेळेस फॉर्मात असणाऱ्या शाहरुखसमोर ठामपणे उभा राहिला आणि बच्चनच्या पुनरागमनाची नांदी झाल्याचं कळू लागलं; पण ‘मोहब्बतें’ हा काही महान वगैरे असा सिनेमा नव्हता. सिनेमा म्हणून तो अतिशय सामान्य होता. तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला आणि बच्चनच्या करियरला त्याने संजीवनी मिळवून दिली एवढाच त्याचा अर्थ. 

अमिताभ बच्चनबच्चनला लोकांच्या मनात पुन्हा स्थापित केलं ते ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शो ने. त्या काळात टीव्हीला सिनेमाच्या तुलनेत दुय्यम स्थान होतं. टीव्हीवर काम करण्यात फिल्मस्टार्सला कमीपणा वाटायचा; पण बच्चनने टीव्हीचं महत्त्व पुरेपूर ओळखलं होतं. टीव्हीचा रीच हा खूप जास्त आहे आणि सर्वसामान्य लोकांशी आपला कनेक्ट पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हे चांगलं माध्यम आहे हे बच्चनने हेरलं. आपल्या नम्र, ऋजुतापूर्ण सूत्रसंचलनाने बच्चनने ‘केबीसी’ला लोकप्रियतेच्या नवीन उंचीवर नेऊन ठेवलं. प्रेक्षकांना आपल्या भव्य व्यक्तिमत्वाने दिपून टाकण्यापेक्षा त्याला विश्वासात घेऊन गेममध्ये त्याला मार्गदर्शन करण्याची बच्चनची शैली प्रेक्षकांना पसंद पडली. ‘मै आज भी फेके हुए पैसे नही उठाता,’ म्हणणारा बच्चन पैशाच्या या गेममध्ये छान रमला. यानंतर बच्चनने केला राकेश ओमप्रकाश मेहराचा ‘अक्स’. राघवन घाटगेचे (मनोज वाजपेयी) वाईट अंश शरीरात शिरलेला इन्स्पेक्टर मनू शर्मा बच्चनने टेचात केला होता. चित्रपट फारसा चालला नाही पण बच्चनच्या भूमिकेचं कौतुक झालं. ‘आँखे’मध्ये बच्चनने वेगळा प्रयोग केला. बच्चनने यापूर्वी एक-दोनदा खलनायकी छटा असणाऱ्या भूमिका केल्या होत्या; पण ‘आँखे’मध्ये तीन आंधळ्यांच्या मदतीने बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या खलनायकाच्या भूमिकेमध्ये बच्चनने धमाल उडवली. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ या दोन चित्रपटांनी भारतीय सिनेमाचा मानंच बदलून टाकला. स्टोरीटेलिंग, सिनेमाचं तंत्रज्ञान या सगळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल व्हायला लागले. प्रगल्भ झालेले भारतीय प्रेक्षक पण नवनवीन प्रयोगांचा स्वीकार करू लागले. नवीन दमाच्या आणि काही तरी वेगळं सांगू पाहणाऱ्या दिग्दर्शकांनी बॉलिवूडमध्ये मोर्चे बांधायला सुरूवात केली होती. बच्चन या बदलांच्या लाटेवर स्वार झाला. त्याने या नवीन काही सांगू पाहणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करायला सुरुवात केली. त्याचे पुढचे सिनेमे होते आर. बाल्की, शूजित सिरकार,  रामगोपाल वर्मा,  बिजॉय नम्बियार, अनिरुद्ध रॉय चौधरी या दिग्दर्शकांसोबत. सिनेमातून काहीतरी वेगळं सांगणाऱ्या दिग्दर्शकांसोबत बच्चनने काम करायला सुरूवात केली. 

कारकिर्दीच्या या सेकंड इनिंगमध्ये बच्चनला ना सुपरस्टारपदाचं ओझं वाहायचं होतं, ना सिनेमा हिट झालाच पाहिजे या अपेक्षेचं ओझं. बच्चन यामुळे एकदम खुललाच. दरम्यान तो करण जोहर, संजय लीला भन्साळी आणि राजकुमार संतोषीसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करून संतुलन साधत होताच, पण बच्चनच्या फिनिक्स झेपेमागे हे वर उल्लेख केलेले नव्या दमाचे दिग्दर्शक आहेत. नॉर्मली एखादा शिखरावर पोहोचलेला आणि वयाने ज्येष्ठत्व आलेल्या लोकांमध्ये नवीन पिढीबद्दल एक तीव्र नापसंती असते, अविश्वास असतो; पण सुपरस्टार असूनही बच्चनने या नवीन दिग्दर्शकांच्या हाती स्वतःला सुपूर्द केले. कुठलेही इगो इश्यूज मध्ये न आणता. याचं पूर्ण श्रेय बच्चनच्या अभिनेता म्हणून असलेल्या आत्मविश्वासाला आणि त्याच्या मानसिक सुरक्षिततेला आहे. ‘पिंक’मधला व्यवस्थेने त्रस्त मुलींची केस लढणारा वकील असो’, ‘पिकू’मधला बद्धकोष्ठाने ग्रस्त प्रेमळ बाप असो’,  ‘पा’मधला जगावेगळ्या आजाराने ग्रस्त आरो असो’, ‘खाकी’मधला डीसीपी अनंत असो’ किंवा मग ‘सरकार’मधला डॉन नागरे असो, बच्चनने सगळ्या भूमिकांमध्ये अप्रतिम रंग भरले. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही बच्चनच्या बहुतेक कामावर पसंतीची मोहोर उमटवली. सर्वाधिक प्रतिष्ठेचे असे राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. जुन्या खोंडासोबत काम करण्यापेक्षा नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा बच्चनचा जुगार फळाला आला. बच्चनसोबत कारकीर्द सुरू झालेले दिग्दर्शक आणि सहकलाकार एकापाठोपाठ आउटडेटेड होत असताना, बच्चन मात्र इथे अजूनही टिकून आहे. नुसताच टिकून नाही, तर त्याचा लार्जर दॅन लाइफ पर्सोना अजूनच मोठा होत चालला आहे. 

कुमार गंधर्वकाही केसेसमध्ये एखाद्याच्या कारकिर्दीचे दोन भाग करता येतात. पहिल्या भागात लोकांना किंवा प्रेक्षकांना आवडतं ते करण्यासाठी आपली कला पणाला लावणारा कलाकार किंवा खेळाडू आणि कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला आवडतं, भावतं ते करून आपल्या क्षेत्रात मूलभूत कार्य करणारा तोच माणूस. मी मध्यंतरी पंढरीनाथ कोल्हापुरे यांचं त्यांनी कुमार गंधर्वांसोबत देवासला घालवलेल्या दिवसांवर लिहिलेलं एक सुंदर पुस्तक वाचलं. एका गंभीर आजारानंतर कुमार गंधर्व मुंबईचं वातावरण मानवत नाही म्हणून मध्य प्रदेशमधल्या देवास या निसर्गरम्य ठिकाणी राहायला गेले. तो कुमारांचा अज्ञातवासातला काळ मानला जातो; पण कोल्हापुरे कुमारांच्या सांगीतिक कारकिर्दीचं देवास-पूर्व आणि देवास-उत्तर असं विभाजन करतात. मैफली गाजवणारे कुमार गंधर्व आणि भारतीय संगीतामध्ये या अज्ञातवासानंतर अतिशय मूलभूत प्रयोग करणारे कुमार गंधर्व, हे सर्जनशील व्यक्ती म्हणून पूर्णपणे वेगळे होते, असं निरीक्षण कोल्हापुरे नोंदवतात. याचंच अजून एक उदाहरण म्हणजे राहुल द्रविड. कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून राहुल द्रविड ओळखला जायचा. तो ‘वन डे फॉरमॅट’मध्ये मिसफिट आहे अशी राहुलची हेटाळणी केली जायची; पण प्रचंड मेहनतीच्या बळावर द्रविड कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात ‘वन डे’मधला आदर्श खेळाडू बनला. अगदी तसेच अमिताभ बच्चन हा कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात इव्हॉल्व झालेला असाच एक महान कलाकार  आहे. 

सिंड्रेला या शापित राजकुमारीची गोष्ट सगळ्यांनीच ऐकली असेल. एका दीर्घ झोपेत गेलेल्या सिंड्रेलाला एका राजकुमारामुळे पुन्हा आयुष्याची दुसरी संधी मिळते. सेकंड चान्स. तेव्हापासून तळागाळात जाऊनही जोरदार पुनरागमन करणाऱ्या माणसाला सिंड्रेला मॅन असे संबोधण्यात येते. ‘सिंड्रेला मॅन’ या नावाचा जिम ब्रॅडोक या अशाच पुनरागमन करणाऱ्या एका बॉक्सरची गोष्ट फार सुंदरपणे सांगतो. या ब्रॅडोकमध्ये आणि बच्चनच्या पुनरागमनाच्या परिकथेत फारसा फरक नाही. बच्चन हा आपला असाच एक सिंड्रेला मॅन आहे.

- अमोल उदगीरकर 
मोबाइल : ९९२१३ ५०४५५ 
ई-मेल : amoludgirkar@gmail.com

(लेखक चित्रपट अभ्यासक असून, ‘फँटम फिल्म्स’सोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.)

अमिताभ बच्चन
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search