Next
ठाण्यातील शाळा-महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त करणार
ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांचा संकल्प
BOI
Monday, July 08, 2019 | 05:04 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : चालू शैक्षणिक वर्षापासून ठाण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये यांचे परिसर तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी तंबाखूविरोधी ‘कोटपा’ कायद्यानुसार शैक्षणिक संस्था परिसरात सार्वजनिक धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.  

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात जिल्हा अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अप्पर पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संजयकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात ‘सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा’ (कोटपा) - २००३च्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ‘संबंध हेल्थ फाऊंडेशन’चे महाराष्ट्र प्रकल्प व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी ‘कोटपा कायदा’, त्यातील विविध कलमे, पोलिस कारवाईची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत ‘कोटपा कायद्या’च्या प्रभावी अंमलबजावणीबाबतचे प्रशिक्षण पोलिसांना दिले. 

‘सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी ९० टक्के तोंडाचे कर्करोग हे केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. जे रुग्ण अशा जीवघेण्या आजाराच्या शस्त्रक्रियेतून जातात, ते आयुष्यात निराश होऊन जीवनाचा आनंद हरवून बसतात. तोंडाच्या कर्करोगाच्या उपचारांपेक्षा तंबाखू विक्रीस आळा घालणे अधिक महत्त्वपूर्ण आहे’, असे ‘क्रेअरिंग फ्रेंड्स’चे निमेश सुमती यांनी सांगितले.

‘तंबाखूमुळे कर्करोग झालेल्या रुग्णांवर उपचार आहेत. मात्र, हे रुग्ण दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला रुग्णालयात येतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरही ५० टक्के रुग्ण दगावतात. यातून आलेल्या अनुभवानुसार डॉक्टरांकडून केवळ वैद्यकीय उपचारांवर, जीव गमावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करता येणार नाही. तर समाजामध्ये याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. तंबाखू सेवनाचे अनेक दुष्परिणाम आहेत. व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. त्याच्याशी संलग्न आजारांबाबत लोकांमध्ये अज्ञान आहे. अशा वेळी तंबाखू विरोधी कोटपा कायद्याचा धाक दाखवून व्यसनाची तीव्रता कमी करणे पोलिसांना शक्य आहे’, असे ‘मुलुंड फोर्टिस रुग्णालया’चे कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पवार यांनी सांगितले. ‘आपल्या मनाने निश्चय केला, तर तंबाखूचे सेवन लगेच सुटते. त्यामुळे रात्रपाळी किंवा रात्र गस्तीवर कोणीही तंबाखू खाणे शक्य तेवढे टाळावे. अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येते’, असेही डॉ. पवार यांनी सांगितले. 

या कार्यशाळेत ठाणे ग्रामीण परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रमुख, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यात कोटपा कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. काश्मीरा, मीरारोड, कल्याण, भिवंडी, भाईंदर, मुरबाड, गणेशपुरी शहरातील शिवाजी चौक, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे, ‘कोटपा कायद्या’नुसार लहान मुलांसाठी सूचना फलक न लावणाऱ्या, शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या पान टपऱ्या चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ही कारवाई पाहून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search