Next
गानसरस्वती महोत्सवातील कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध
BOI
Monday, February 04, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे व पं. रघुनंदन पणशीकर

पुणे : नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित सातव्या गानसरस्वती महोत्सवात युवा कलाकारांसह दिग्गज कलाकारांच्या गायन, वादन आणि शास्त्रीय नृत्याच्या आविष्कारांचा रसिकांनी मनःपूत आनंद घेतला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी, तीन फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप झाला. 

ईशान घोष आणि अभिषेक बोरकर

गानसरस्वती महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अखरेच्या दिवशी रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. अभिषेक बोरकर या युवा कलाकाराने सरोदवर छेडलेल्या आहिर भैरवच्या सुरांनी सकाळच्या सत्राची अगदी प्रसन्न सुरुवात झाली. त्यांना इशान घोष यांनी तबल्यावर संगत केली. 

श्रीनिवास जोशी सादरीकरण करताना

त्यानंतर किराणा घराण्याचे गायक श्रीनिवास जोशी यांनी राग मियाँ की तोडी रागातील ‘सैंया बाँट तू’ ही विलंबित आणि लंगर कांकरिया जी न मारो’ ही द्रुत तालातील बंदीश सादर केली. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने गायनसेवेचा शेवट केला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अविनाश दिघे यांनी संवादिनीवर साथसंगत केली.

डॉ. क्षितीजा बर्वे
यानंतर संत सेवा संघाच्या जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेल्या महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांवर आधारित ‘वैकुंठनायका’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी जयपूर अत्रौली घराण्याचे पं. रघुनंदन पणशीकर, किराणा घराण्याचे पं. आनंद भाटे आणि मेवाती घराण्याचे पं. संजीव अभ्यंकर या दिग्गज कलाकारांनी ‘श्रीज्ञानराजे केला उपकार श्रीज्ञानराजे’, ‘हि माझी मिराशी, देवा’, ‘मन हे राम झाले’ व ‘हरिनारायण’ यासारखे सात अभंग सादर केले. त्यांच्या अभंगगायनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रसिक विठुरायाच्या स्मरणात रंगून गेले होते. 

त्यांना भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखावज), केदार परांजपे (किबोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्य), शुभदा आठवले (संवादिनी) यांनी साथसंगत केली, तर स्वर्णिमा यांनी निरुपण केले. 

संध्याकाळच्या सत्राची सुरुवात डॉ. क्षितीजा बर्वे यांच्या भरतनाट्यम प्रस्तुतीने झाली. यांनी या वेळी श्रीतुलसीदास रचित ‘गाइये गणपती भजे हम’ वर नृत्यप्रस्तुती केली. वर्णन्, कीर्तनम् या रचना त्यांनी सदर केल्या. त्यांना डॉ. अंबिका विश्वनाथ (नटूवांगम्), बी. शशीशंकर (मृदंगम्), सतीश शेषाद्री (व्हायोलिन), नितीश अम्मानैया (बासरी) यांनी साथसंगत केली. 

जयतीर्थ मेवुंडी

त्यानंतर किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी शुध्द कल्याण रागामध्ये ‘तुम बिन कोन खबरीया लेत’, विलंबित तीनतालातील ‘मौंदर बाज्यो रे’ चे सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या कलाश्री रागातील ‘धन धन भाग सुहाग तेरो’ या रचनेला रसिक श्रोत्यांची दाद मिळाली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), शुभम खंडाळकर आणि सौरभ काडगावकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

पं. बुधादित्य मुखर्जी
समारोप पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या सूरबहार आणि सतार वादनाने झाला. त्यांनी यमन रागामध्ये आलाप, जोड व राग कामोदमध्ये ‘गत’ वाजवली आणि भैरवीने सादरीकरणाचा समारोप केला. या वेळी त्यांना सौमेन नंदी यांनी तबल्यावर साथसंगत केली.

सरोदवादक अभिषेक बोरकर याला युवा पुरस्कार प्रदान करताना पंडित सुरेश तळवलकर. या वेळी बिभास अमोणकर, पं. रघुनंदन पणशीकर व अजित बेलवलकर उपस्थित होते.

या वेळी या वर्षी सुरू करण्यात आलेला ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ युवा सरोद वादक अभिषेक बोरकर याला पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी किशोरीताईंचे पुत्र बिभास अमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं. रघुनंदन पणशीकर व  अजित बेलवलकर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search