Next
‘आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडिया करील पुस्तक व्यवसायाची भरभराट’
BOI
Saturday, January 20, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

‘प्रकाशक लेखक संवाद’ या कार्यक्रमात बोलताना शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे
पुणे : ‘मराठी वाचक कमी झाला आहे अशी ओरड केली जाते; पण तसे मुळीच नाही. उलट, वितरण व्यवस्था पुरेशी नसल्याने पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. पुस्तके गावोगावी पोहोचण्यासाठी प्रकाशकांनी ऑनलाइन विक्रीची सेवा देणाऱ्या व्यवस्थेचा आधार घ्यावा,’ अशी सल्लावजा सूचना राज्याचे शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) पुण्यात केली. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रकाशक लेखक संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 

याच कार्यक्रमात ‘बदलत्या काळात छापील पुस्तकांवर आक्रमण की नवीन संधी?’ या विषयावर सायंकाळी झालेल्या परिसंवादातही प्रकाशन व्यवसायाच्या भरभराटीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाच्या वापराबद्दल आग्रही असण्याचा सूर निघाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजीव बर्वे, सुनीताराजे पवार, प्रकाश पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्याचे मार्केटिंग, कॉपीराइट कायदा, संपादन, जीएसटी आणि प्रकाशक अशा पुस्तक प्रकाशन व्यवसायाशी निगडित विविध विषयांवरही या वेळी चर्चा झाली. बडोदा येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला.

मान्यवरांनी मांडलेले विचार :

विनोद तावडे, (सांस्कृतिक कार्यमंत्री) :
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाबळेश्वरजवळील भिलार या पुस्तकांच्या गावाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली आणि या उपक्रमाचे कौतुक केले; पण तिथे पोहोचलेल्या प्रकाशकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ज्यांच्यावर याचा थेट परिणाम होणार आहे, तेच फारसे प्रतिसाद देत नाहीत. वाचनसंस्कृती वाढावी यासाठी विविध प्रयोग करण्याकरिता शासन प्रोत्साहन देत आहे. अनेक उपक्रम राबवत आहे. त्या उपक्रमांना लेखक, प्रकाशक, साहित्य परिषद यांचे सहकार्य अधिक मिळाले पाहिजे. भिलारमध्ये आता अॅम्फी थिएटर उभारण्याची योजना असून, तिथे प्रकाशकांना अगदी अल्प खर्चात पुस्तक प्रकाशन, प्रदर्शन, वाचन महोत्सव असे उपक्रम राबवता येतील. तेथील आणखी १५ घरांमध्ये पुस्तक संग्रहालय सुरू करण्यात येणार असून, दृकश्राव्य सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत.

संजय भास्कर जोशी (लेखक, विक्रेते) :
‘माझ्या रेषेला हात न लावता ही रेषा छोटी कोण करून दाखवेल?’ ही अकबर-बिरबलाची गोष्ट आपणा सर्वांना माहीत असते. तसंच तंत्रज्ञान असो, जागतिकीकरण असो, पाश्चात्यांच्या इंग्लिशचं आक्रमण असो, आपण आपली रेषा मोठी करून, ती संकटं लहान करू शकतो. पुस्तकं वाचणारे कमी झाले आहेत अशी रड ऐकू येते. प्रत्यक्षात पूर्वीसुद्धा वाचणारे कमी होते आणि आताही कमी आहेत; पण एकूण लोकसंख्या वाढल्याने वाचणाऱ्यांचा टक्का पूर्वीपेक्षा निश्चितच वाढला आहे. आपल्याकडे दुर्दैवाने संख्याशास्त्रीय अभ्यास न करता काही लोकं शेरेबाजी करतात. ती चुकीची आहे. एक ओरड असते, की फक्त धार्मिक आणि पाकशास्त्राची पुस्तकं खपतात; पण एक विक्रेता म्हणून मी सांगतो, की ती धादांत खोटी ओरड आहे. आजही उत्तम आणि सकस साहित्याला उत्तम मागणी आहे. कदाचित आपणच ते देण्यात, काही उत्तम दुर्मीळ पुस्तकं उपलब्ध करून देण्यात कमी पडतो आहोत. आपणच लोकांना वाचायला उद्युक्त करायला कमी पडतो आहोत. उलट जे नवीन तंत्रज्ञान आलंय, त्याचा वापर करून आपला व्यवसाय वाढवता येईल. नवीन आलेली ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स ही छापील पुस्तकांना पर्याय म्हणून आलेली नाहीत, तर ती पूरक किंवा नवीन क्षेत्र घेऊन आली आहेत. त्याचा फायदा करून घेता यायला हवा. आपण त्यासाठी तयार नाही आहोत. त्यामुळे त्याला नव्या तयारीनं सामोरं जायला हवं. ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ हे ब्रीद लोकांसमोर ठेवायला हवं.

‘प्रकाशक लेखक संवाद’ या कार्यक्रमात बोलताना बुकगंगा डॉट कॉमचे सीईओ मंदार जोगळेकर
मंदार जोगळेकर (सीईओ, बुकगंगा डॉट कॉम) :
साधारण दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत कागदाची टंचाई निर्माण झाली होती, त्या वेळी मी ई-पेपर्सची संकल्पना आणली होती. आणि ती यशस्वीही झाली होती. नव्या पिढीच्या वाचण्याच्या संकल्पना तंत्रज्ञानामुळे बदलताहेत; पण त्यामुळे वाचन कमी न होता वेगळ्या मितीनं वाढतं आहे. पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन जेव्हा अमेरिकेत भरलं होतं, त्या वेळी एका ज्येष्ठ साहित्यिकाशी झालेल्या चर्चेतून मला ‘बुकगंगा ऑनलाइन पोर्टल’ची कल्पना सुचली आणि मराठी वाचकांच्या, प्रकाशकांच्या सहकार्याने आज ती यशस्वी होताना दिसत आहे. त्याच दरम्यान आयपॅड आलं होतं. त्या वेळी मी एक देवनागरी अॅप तयार केलं आणि ‘अॅपल कॉर्पोरेशन’चा पाठपुरावा करून, स्टीव्ह जॉब्सपर्यंत माझं म्हणणं पोचल्यावर, त्यांना सर्व स्टॅटिस्टिक्स दिल्यावर, त्यांनी माझं म्हणणं मान्य करून ‘बुकगंगा रीडर’चं अॅप आयपॅडवर देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे परदेशी मराठी वाचकांना आयपॅडवर मराठी वाचनाची सोय झाली आणि वाचक वाढले. जगभरात जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे, तिथे ‘बुकगंगा’तर्फे पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज नवीन मराठी पिढीत मुलं इंग्लिश माध्यमांत शिकतात; पण घरी मराठी बोलतात, मराठी ऐकतात. मग त्यांच्यापर्यंत मराठी पुस्तकं ऑडिओ बुक माध्यमातून पोहोचवायला काय हरकत आहे? आज इंग्लंड, अमेरिकेत पुस्तकं प्रकाशित होण्याआधीच ती विक्रेत्यांपर्यंत पोहोचलेली असतात, त्यांचं ई-बुक तयार असतं, ऑडिओ बुक तयार असतं, मग आपण तसं करायला काय हरकत आहे? आज सोशल मीडियाचा प्रचंड बोलबाला आहे. लोकांपर्यंत सर्व काही अत्यल्प वेळात पोहोचत असतं. मग आपणही सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून पुस्तकं लोकांपर्यंत न्यायला हवीत. त्याचं एक उदाहरण म्हणजे ‘बुकगंगा’च्या माध्यमातून झी टीव्हीने लोकांपर्यंत पोहोचवलेला दिवाळी अंक. या दिवाळी अंकाचा खप नेहमीच्या कोणत्याही दिवाळी अंकांपेक्षा कितीतरी जास्त झाला होता. ‘बुकगंगा’च्या दुकानात लोकांच्या रांगा लागल्या होत्या. आमच्या कॉल सेंटरचे फोन सतत खणखणत होते. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत झी टीव्हीने केलेल्या मार्केटिंगमुळे अंक हातोहात खपला. बदलत्या काळात फोनवरून ऑर्डर बुक केल्यावर दुसऱ्या दिवशी पुस्तक हातात पडावं, अशी लोकांची अपेक्षा असते. आपण या गोष्टींना तयार असायला हवं. ‘प्रिंट ऑन डिमांड’सारखी टेक्नॉलॉजीसुद्धा आता उपलब्ध आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण पुस्तक काढतानाच प्रिंट बुक, ई-बुक आणि ऑडिओ बुक अशा तिन्ही स्वरूपात काढलं, तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. आमच्याच ‘बाइट्स ऑफ इंडिया’सारख्या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचा वापर करून आपण पुस्तकांबद्दलची माहिती प्रसिद्ध करू शकतो. आपण प्रकाशक एकत्र येऊन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सकारात्मक पद्धतीने हा व्यवसाय पुढे नेऊ शकू, वृद्धिंगत करू शकू. आम्ही नुकतंच तयार केलेलं विश्वकोशाचं अॅप काही दिवसांत दहा हजार लोकांनी डाउनलोड केलं आहे. म्हणजे लोकांना वाचायची आणि नवीन शिकण्याची भूक आहे. आज मराठीइतकी ई-बुक्स कुठल्याच भारतीय भाषेत उपलब्ध नाहीत. त्यामुळेच प्रकाशकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी पुस्तक व्यवसाय वृद्धिंगत करू या. 

(या कार्यक्रमात विनोद तावडे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search