Next
‘चंदू चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणारा’
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, January 24, 2019 | 05:45 PM
15 0 0
Share this story

जवान चंदू चव्हाण यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाश करताना मान्यवर.

पुणे : ‘भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये तीन महिने २१ दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू समोर दिसत असतानाही ते ‘भारत माता की जय’ म्हणत सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणारा आहे,’ असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

चंदू चव्हाण यांच्यावर पाकिस्तानमध्ये अंधाऱ्या कोठडीमध्ये झालेल्या छळावर आधारीत, पत्रकार संतोष धायबर यांनी जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) हे पुस्तक लिहिले आहे. चव्हाण यांना भारतात येऊन २१ जानेवारी २०१९ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. हेच औचित्य साधत वळसे-पाटील यांच्या हस्ते मंचर येथे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते-अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री मालविका गायकवाड, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पालांडे, रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. अंकुश लवांडे, अनसूया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरण वळसे-पाटील, युवा नेत्या पूर्वा वळसे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना वळसे-पाटील म्हणाले, ‘भारतीय सीमेवर डोळ्यात तेल घालून जवान देशाची सेवा करत असतात. जवानांबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात आदराची भावना आहे. जवान चंदू चव्हाण भारतात आल्यानंतर ‘सकाळ’चे पत्रकार धायबर यांनी धुळे येथे जाऊन सर्वप्रथम मुलाखत मिळवली होती. ‘सकाळ’मध्ये ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर देशभर गाजली. प्रेरणादायी अशी सविस्तर माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचेल.’

या पुस्तकाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हे पुस्तक छापण्यात आले असून, पुणे येथील ईश्वरी प्रकाशनतर्फे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link