Next
भर चौकात गांधी पुतळ्यासमोर...
BOI
Saturday, November 24, 2018 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

५८व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतल्या प्राथमिक फेरीच्या सातव्या दिवशी (२३ नोव्हेंबर २०१८) ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ हे नाटक सादर झालं. राजेंद्र पोळ यांनी लिहिलेलं हे नाटक रत्नागिरीतल्या संकल्प कला मंच या संस्थेनं सादर केलं. त्या नाटकाचा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला हा परिचय...
.....
भर चौकात गांधी पुतळ्यासमोर एका अनोळखी तरुणानं आपलं चुंबन घेतलं, अशी तक्रार नोंदविण्यासाठी एक तरुणी पोलीस ठाण्यात येते. पाठोपाठ तो तरुणही तिथं दाखल होतो. त्याचं नाव-गाव समजताच तिथं आधीपासूनच हजर असलेला वकील ‘हे प्रकरण रेकॉर्डवर येऊ देऊ नका, मिटवून टाका’ असा सल्ला पोलिसांना देतो. इतक्यात विरोधी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मयुराबाई ठाण्यात येतात. तक्रार नोंदवायला भाग पाडतात. हे चालू असताना चुंबन घेणारा तरुण मुरली, याचे वजनदार पुढारी असलेले काका - तात्या मोहितेही येतात. गरमागरम शब्दाशब्दी होते; पण तक्रार नोंदवली जाते.

चुंबन घेणाऱ्या मुरलीचं ते कृत्य असभ्यपणाचं असलं, तरी त्याची वर्तणूक चांगली आहे. आपल्याला तसं करावंसं वाटलं, ती तरुणी आवडली, हे तो उघडपणे सांगतो. तिची मनापासून माफी मागतो; पण आता तिच्या - मोहिनीच्या हातून तीर सुटलाय. कायद्याची विद्यार्थिनी असलेली मोहिनी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल दाद मागण्याचा निर्णय बदलत नाही. मुरलीही आपल्या चुकीची शिक्षा भोगायला तयार आहे; पण मुरलीचे काका महिपतराव उर्फ तात्या मोहिते, त्यांच्याच तालमीत तयार होऊन प्रगती केलेले पालकमंत्री माधवराव आणि मयुराबाई ही सगळी जणं या प्रकाराचं राजकारण करतात. 

एरव्ही कोटा भरण्याएवढेही गुन्हे न घडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्या गावात चुंबनासारख्या लहानशा गोष्टीची ‘लिंगपिसाटाचा धुमाकूळ’ म्हणून आठ कॉलम बातमी छापून येते, तीही पालकमंत्री दौऱ्यावर असताना. त्यांच्या विश्रामगृहातल्या मुक्कामी मोहिनी आपली मैत्रीण मंजिरी हिला सोबत घेऊन त्यांना भेटायला जाते. प्रकरण मिटवून टाकण्यासाठी माधवराव तिला सरकारी नोकरी देण्याचं, पाहिजे तर सिनेमात काम मिळवून देण्याचं, पाहिजे तेवढे पैसे देण्याचं आश्वासन देतात; पण ती तयार होत नाही. मोहिनी गरीब, वृद्ध मनुष्याची मुलगी, तर मंजिरी मोहनराव मोरे या राजकीय कार्यकर्त्याची मुलगी. मंत्रिमहोदय ‘मोहनरावांचं आमदार बनण्याचं स्वप्न पुरं व्हायला पाहिजे ना,’ असं दटावूनही पाहतात; पण दोघीही बधत नाहीत.

मोहिनी आणि मंजिरी या दोघी कायद्याच्या विद्यार्थिनी. पोलिसांकडे रीतसर दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन न्यायालय आपल्याला योग्य तो न्याय देईल, असं त्यांना वाटतं; पण ‘गांधी चौकातले सगळे दुकानदार आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा कोण तुझ्या बाजूने साक्ष देणार,’ असं मंत्री माधवराव उघडपणे सांगतात.

दुसऱ्या बाजूने मोहिनीच्या पाठीशी उभं राहणाऱ्या मयुराबाईबरोबर राजकीय सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. तिला महामंडळ, लाल दिवा अशी आमिषं दाखवली जातात. आतापर्यंत मोहिनीला नजरेआड न करणारी मयुराबाई तिच्यामागची नजर काढून घेते. मोहिनीला असुरक्षित वाटू लागतं. 

दरम्यान, मुरलीची नि मोहिनीची भेट होते. मुरली मनाने स्वच्छ, नितळ, निसर्गात रमणारा. व्यवहारी जगातल्या वास्तवापेक्षा निसर्गाच्या न्यायावर विश्वास ठेवणारा. दोघांचं जमतं. नदीत उडी घेऊन जीव द्यायला आलेली मोहिनी मुरलीची राधा होते.
दुसऱ्याच दिवशी गांधी पुतळ्यासमोर दुसरी घटना घडते. पोलीस दाखल होतात. तिथं पडलेल्या तरुणीच्या मृतदेहाभोवती खडूच्या खुणा करणं, मोजमापं घेणं हे सोपस्कार करून पोलीस पंचनामा पूर्ण करतात. तात्या मोहिते, माधवराव, मयुराबाई एकेक करून दाखल होतात. तो मृतदेह मोहिनीचा असतो. तिनं आत्महत्या केली, अशी चर्चा होत असते. शेजारी मंजिरी रडत बसलेली असते. ही दुर्घटना कळताच धावत येऊन मुरली शोक करू लागतो. त्याला कुणाचंही सांत्वन नको असतं. तो पोलिसांना सांगतो, ‘एफआयआर दाखल करा!’ पडदा पडतो!

राजेंद्र पोळ यांनी लिहिलेलं ‘भर चौकात गांधी पुतळ्यासमोर’ हे नाटक रत्नागिरीच्या संकल्प कला मंचानं सादर केलं होतं. कल्पकतेनं उभारलेलं नेपथ्य एकाच पायावर अनेक दृश्यं उभी करतं, ते नजरेत भरतं; पण सर्वांत खुलून दिसतात ते रंगकर्मींचे अभिनय. ‘काय रं फौजदारा’ अशा गुर्मीत एंट्री घेणारा बजुर्ग पुढारी महिपतराव मोहिते बाबा साळवी यांनी रंगवलाय. स्वतःला पालकमंत्री म्हणवून घेऊन एका असहाय तरुणीला ‘इथल्या न्यायदेवतेची कोर्टाच्या काचपेटीत केव्हाच ममी झालीय’ असं थंडपणे सांगणारा सत्तोन्मत्त मंत्री माधवराव परिणामकारक रीतीनं साकारलाय गणेश गुळवणी यांनी. खरोखरच राजकीय पुढारीण आली की काय, असं वाटावं अशी महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष मयुराबाईची झोकदार भूमिका केलीय पूजा सावंत यांनी! या तिघांशिवाय लक्षात राहते ती शेवटच्या भागात परस्परांची ओळख पटल्यावर मुरली आणि मोहिनी यांनी एकमेकांना आवेगानं मारलेली मिठी!

संपर्क : राजेंद्रप्रसाद मसुरकर : ९९६०२ ४५६०१

(२४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता खालगाव येथील श्री जाकादेवी देवस्थान या संस्थेतर्फे ‘नूर मोहम्मद साठे’ हे प्रेमानंद गज्वीलिखित नाटक सादर होणार आहे. या स्पर्धेतील सर्व नाटकांचे परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्पर्धेच्या वेळापत्रकासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
रवींद्र साळुंखे About 273 Days ago
खुप सुंदर समीक्षण,धन्यवाद👏
2
0

Select Language
Share Link
 
Search