Next
पारिभाषिक शब्दांची संख्या वाढवणे गरजेचे...
BOI
Tuesday, March 06, 2018 | 01:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘मराठी ही ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. ते करताना त्यासाठी आवश्यक बाबींचा विचार होणे गरजेचे आहे. भाषा वापरकर्त्यांचा विचार करून त्यानुसार जास्तीत जास्त नवनवीन शब्द मराठीत तयार करणे हे यादृष्टीने आपले पहिले उद्दिष्ट आहे’, असे मत शुद्धलेखन तज्ज्ञ आणि भाषा अभ्यासक अरुण फडके यांनी व्यक्त केले. ‘मराठी परिभाषा – कशी असावी, कशी नसावी’ या विषयावर आयोजित एका व्याख्यानात ते बोलत होते. 

मराठी व संस्कृत भाषेच्या आणि व्याकरणाच्या अभ्यासक सत्त्वशीला सामंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘मराठी अभ्यास परिषदे’तर्फे फर्ग्युसन महाविद्यालय येथे फडके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठी अभ्यासक वर्ग उपस्थित होता.   

‘मराठी शुद्धलेखन हा समान विषय असल्याने सामंत आणि आमची मैत्री झाली. मतभिन्नता असूनही आमची गाढ मैत्री होती. बऱ्याच काळापासून मराठी व्यावहारिक कोष करण्याचा मानस होता. साधारण दहा वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात केली. सध्या एका सजीव परिभाषा कोषाचे काम सुरू आहे. यामध्ये वनस्पती, प्राणी मासे यांच्यावरील काम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ माणूस हा प्रकार राहिला आहे. तो होईल. एखाद्या विषयावर पुस्तक लिहिताना, त्या विषयावर बाजारात काय काय उपलब्ध आहे, हे पाहून त्यापेक्षा मला वेगळे काय देता येईल यादृष्टीने माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मी असे काही देऊ शकत असेल, तरच ते पुस्तक आणण्याचा नैतिक अधिकार मला आहे, असे माझे मत आहे. त्यादृष्टीने हा नक्कीच वेगळ्या स्वरूपाचा कोष असेल’, अशी माहिती या वेळी फडके यांनी दिली. 

मराठी भाषेत नवीन शब्द निर्माण करत असताना ते, केवळ मराठी, मराठी – संस्कृत मिश्र आणि केवळ संस्कृत परंतु समजण्यास सोपे अशा पायऱ्यांवर तयार केल्यास अनेक नवीन शब्द मिळू शकतात, अशी एक संकल्पना त्यांनी मांडली. 

मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी भाषेतील पारिभाषिक शब्दांची संख्या वाढली पाहिजे. आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज आपल्याकडे जवळपास ४० हजार पारिभाषिक शब्द उपलब्ध आहेत, त्यातही ते सर्वच स्वीकारार्ह आहेत असे नाही. बोजड, अनाकलनीय असेही अनेक शब्द त्यात आहेत, त्यामुळे अशा शब्दांचा उपयोग होणार नाही. हे विचारात घेऊन या शब्दांवर काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

‘सर्वच क्षेत्रांतील शिक्षण मराठीतून द्यायचे असेल, तर तेवढी शब्दावली आज आपल्याकडे उपलब्ध आहे का, हा विचार झाला पाहिजे. हे तपासण्यासाठी आपल्याला डॉ. रघुवीर यांचा इंग्रजी-हिंदी परिभाषा कोष अभ्यासावा लागेल. दिवाळी अंकाएवढा आकार आणि जेमतेम हातात बसेल एवढ्या जाडीचा असलेल्या या कोषाच्या १३५ आवृत्त्या निघाल्यानंतर त्याची आवृत्ती थांबली. या परिभाषा कोषात दीड लाख शब्द आहेत’, अशी काही नवीन माहितीही त्यांनी या व्याख्यानात दिली.     
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link