Next
माझ्या मराठीची गोडी
BOI
Friday, March 02 | 06:30 PM
15 0 0
Share this story


‘जिची थोरवी दररोज नवे रूप दाखवते आणि जिच्यासमोर आपोआप नतमस्तक व्हायला होतं,’ असं म्हणणारी वि. म. कुळकर्णी यांची ‘माझ्या मराठीची गोडी’ ही कविता आज पाहू या.
.................
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवीत!

वि. म. कुळकर्णीज्ञानोबांची-तुक्यांची
मुक्तेशाची-जनाईची 
माझी मराठी चोखडी
रामदास-शिवाजीची

‘या रे या रे अवघेजण
हाक माय मराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची!

डफ-तुणतुणें घेऊन 
उभी शाहीर मंडळी
मुजऱ्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर!

नव्या प्राणाची ‘तुतारी’ 
कुणी ऐकवी उठून
‘मधुघट’ अर्पी कुणी
कुणी ‘माला’ दे बांधुन!

लेक लाडका एखादा
गळां घाली ‘वैजयंती’
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा
कुणी नजराणा देती
 
हिचें स्वरूप देखणें
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्रीं प्रभा दाटे
सात्विकाची-कांचनाची!

कृष्णा-गोदा-सिंधुजळ
हिची वाढविती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखीं वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवें रूप दावी
अवनत होई माथा
मुखीं उमटते ओवी!
- वि. म. कुळकर्णी

(वि. म. कुळकर्णी यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. मराठीचं कौतुक करणाऱ्या सर्व कविता https://goo.gl/1UGvB9 या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link