Next
उसात ज्वारीचे आंतरपीक बहरले
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी महिलेचा प्रयोग
BOI
Wednesday, February 13, 2019 | 12:56 PM
15 0 0
Share this article:

ज्वारीच्या शेतात शोभा हनुमंत घाडगे.

सोलापूर : रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील आजनसोंड येथील शोभा हनुमंत घाडगे या शेतकरी महिलेने ऊस पिकात घेतलेले ज्वारीचे आंतरपीक बहरात आले आहे. ज्वारीच्या कणसातील पांढऱ्या-शुभ्र टपोऱ्या दाण्यांमुळे जोंधळ्याला चांदणे लखडून गेल्याचे चित्र दिसू लागले आहे.  

सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर घाडगे यांनी ऊस पिकाची लागवड केली आहे. उसात आंतरपीक म्हणून या भागात हमखास मक्याची लागवड केली जाते; मात्र दुष्काळात जनावरांना चारा मिळावा आणि धान्याचे जास्त उत्पादन मिळावे, यासाठी त्यांनी फुले रेवती या जातीच्या ज्वारीची लागवड केली. खोल आणि बागायती जमिनीसाठी या जातीची शिफारस करण्यात येते. वाणाची योग्य निवड, बीजप्रक्रिया, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यामुळे ज्वारीचे पीक बहरले आहे. नेहमी उसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कमी पाणी लागणारे, कमी कालावधीत तयार होणारे आणि अल्प खर्चातील ज्वारीचे पीक चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. या पिकातून धान्याबरोबरच जनावरांना सकस चाराही मिळत असल्याने हे पीक आश्वासक वाटते. ज्वारीचे गोदाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ज्वारीचे उत्पादन हवामानबदलामुळे सातत्याने घटते आहे. शिवाय जमिनीनुसार ज्वारीच्या योग्य जातीची निवड होत नसल्याने ज्वारी शेतकऱ्याना परवडत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, शोभाताईंनी ऊस पिकात घेतलेल्या ज्वारीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते, हे दिसून आले आहे. 

त्यांचे पती डॉ. हनुमंत घाडगे पुणे येथील कृषी महाविद्यालयात विस्तार कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मार्गदर्शन शोभाताईंना लाभले आहे. डॉ. घाडगे म्हणाले, ‘ऊस पिकात मका लागवडीची शिफारस नाहीच. ऊस पिकात एका बाजूने ज्वारीची टोकण पद्धतीने लागवड केली, तर दोन्ही पिके चांगली येतात.’सध्या त्यांच्या शेतातील ज्वारी हुरडा अवस्थेत आहे. त्यातच ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे ज्वारीची कणसे आता भरू लागली आहेत. यापुढे वातावरण पोषक राहिले, तर साडेतीन एकर ज्वारीच्या आंतरपिकातून सुमारे ५५ ते ६० क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा या दाम्पत्याने व्यक्त केली. 

फुले रेवती हा ज्वारीचा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खोल व बागायती क्षेत्रासाठी प्रसारित केलेला आहे. तो अधिक उत्पादन देणारा तर आहेच, मात्र जनावरांसाठी चारा म्हणून त्याच्या कडब्याचा चांगला उपयोग होतो. मालदांडी ज्वारीपासून निवड केलेल्या या वाणापासून हेक्टरी ५५ ते ६० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे डॉ. हनुमंत घाडगे यांनी सांगितले.

(बहरलेल्या शेताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search