Next
‘आपल्या नृत्य माध्यमाचा आदर करणे आवश्यक’
‘मॅडम मेनका..’ नृत्य महोत्सवात इशिरा पारीख यांचे मत
BOI
Wednesday, May 29, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘आपल्याला नृत्य दिग्दर्शन क्षेत्रात भरीव काम करायचे असेल, तर प्रथम आपण आपल्या नृत्य माध्यमाचा मनापासून आदर करणे गरजेचे आहे. भरतनाट्यम्, कथक, ओडिसी, मणिपुरी किंवा अन्य कोणताही नृत्य प्रकार असला, तरी त्यावर पूर्ण श्रद्धा असायला हवी. आपल्या नृत्याच्या माध्यमातच असीम क्षमता आहेत. त्या चोखंदळण्याची हिम्मत आपल्यात हवी,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध कथक कोरीओग्राफर इशिरा पारीख यांनी केले.

मौलिक शहा व इशिरा पारीख

प्रसिद्ध कथक गुरु शमा भाटे यांची नादरूप कथक संस्था, महाराष्ट्र कल्चरल सेंटर व प्राज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’ या दोन दिवसीय महोत्सवाच्या समारोप प्रसंगी पारीख बोलत होत्या. हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा महोत्सव पार पडला. या वेळी कथक गुरु शमा भाटे, प्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार डॉ. सुचेता भिडे चापेकर, वैभव आरेकर, शर्वरी जमेनीस आदी उपस्थित होते. 


कोरिओग्राफीचा खरा अर्थ सर्वांसमोर यावा व त्याचा प्रसार व्हावा या उद्देशाने या उद्देशाने ‘मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शमा भाटे यांच्या शिष्या अवनी गद्रे यांनी ‘द मोअर यू सी, द लेस यू नो, फॉर शुअर’ या म्हणीवर नृत्य सादर केले.  भरतनाट्यम् गुरु दीपक मुजुमदार यांचे शिष्य  पवित्र भट यांनी ‘ओगट्टी नल्ली बलविदे’ या म्हणीवर, तर पुण्यातील कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर यांच्या शिष्या अमृता गोगटे यांचे ‘इव्हन इफ यू कम आउट ऑफ वन केज, अरन्ट यू इन जस्ट अनदर वन ?’ या म्हणीवर आधारी सादरीकरण झाले. कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या शिष्या स्वाती सिन्हा यांचे ‘द क्लॉक डझन्ट मेक अ माँक’ या म्हणीवरील तर भरतनाट्यम् गुरु वैभव आरेकर यांच्या शिष्या स्वरदा दातार यांचे ‘अपिअरन्स कॅन बी डिसेप्टिव्ह’ या म्हणीवर नृत्य सादरीकरण झाले. 

त्यानंतर मौलिक शहा व इशिरा पारीख यांनी आपल्या विविध नृत्य दिग्दर्शनांमध्ये कधी स्वलिखित कविता, कधी गद्य तर कधी अगदी पारंपरिक लोक वाद्य, लोक कला यांचाही उपयोग करून कथक नृत्याविष्कार सादर केला आहे. कधी सकाळी व्यायम करणारा मुलगा कथकमधून कसा दाखवता येईल, चौकोनी,आयताकार, गोल,पायऱ्यांवर नृत्य कसे सादर केले जाऊ शकते, असे यशस्वी नृत्यदिग्दर्शनाचे प्रयोग उपस्थित रसिकांसमोर मांडले. या वेळी त्यांनी आपल्या जुन्या नृत्यदिग्दर्शनाच्या व्हिडीओ क्लिप्स दाखवून त्यावर चर्चादेखील केली.

 
शाह म्हणाले, ‘आमचे कथकमध्ये बरेच सादरीकरण करून झाले होते. त्यामुळे त्यापुढचे एक पाऊल टाकत आम्ही कोरिओग्राफी करायचे ठरविले. त्यात आमची स्वतःची शैली, संवेदनशीलता आणि तार्किकता यांचा समावेश करत आपल्याला जे आणि जसे मांडावेसे वाटते ते स्वतःच्या मार्गाने मांडायचे, आपले काम हे रसिकांना गुंतवून ठेवणारे आणि प्रभावी करायचे हे ठरवून त्याप्रमाणे मार्गक्रमण करीत गेलो. शास्त्रीय नृत्य काय हे आपल्याला माहिती असले, तरी प्रेक्षकांना समजेलच असे नाही, त्यामुळे त्यांना सहज समजेल व भावेल असे सादरीकरण हवे हे ध्यानात ठेवत नृत्यदिग्दर्शन करायचे हा नियम आम्ही नेहमी पाळला.’

या वेळी नृत्याबरोबरच संगीत, नाट्य, प्रकाशयोजना, समीक्षण आदी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या महोत्सवात सादर झालेल्या नृत्य दिग्दर्शनावर आपली मते मांडली. या पॅनेलमध्ये गुरु शमा भाटे, वैभव आरेकर, शर्वरी जमेनीस, अजय जोशी (समीक्षक), चैतन्य आडकर (संगीत), प्रदीप वैद्य (नाट्य) यांबरोबरच अहमदाबाद येथील आघाडीचे कोरीओग्राफर मौलिक शहा व इशिरा पारीख आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search