हिमायतनगर : ‘राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) ही स्वयंसेवक व स्वयंसेविकावर सामाजिक संस्कार करते. सर्वधर्म समभाव बाळगून राष्ट्रीय विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे अवलोकन करावे, असे सांगते. मीसुध्दा माझ्या कॉलेज वयात असे अनेक कॅम्प करायचो. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे शिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळते,’ असे प्रतिपादन ‘पाटील’ चित्रपटातील अभिनेते नरेंद्र देशमुख यांनी केले.
हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील (हुजपा) महाविद्यालयाच्या ‘एनएसएस’चे सात दिवसांचे विशेष निवासी शिबिर मौजे सरसम येथे नुकतेच झाले. यात स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छतेबरोबरच विविध पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली; तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, मतदान जनजागृती, शोष खड्ड्यांच्या माध्यमातून जलपुनर्भरणासह सिकलसेल, थायरॉइडसारख्या आजाराची मोफत रक्तचाचणी शिबिर, पशुआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
या शिबिराचा सांगता सोहळा नुकताच आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हुजपा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘पाटील’ चित्रपटाचे अभिनेते नरेंद्र देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख व नगरसेवक प्रभाकर आण्णा मुधोळकर उपस्थित होते. या निवासी शिबिराचे आयोजन ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी डॉ. सूर्यप्रकाश जाधव व सहकार्यक्रमाधिकारी प्रा. महेश वाखरडकर यांनी केले होते.
सहकार्यक्रम अधिकारी प्रा. महेश वाखरडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या वेळी डॉ. पंजाब शेरे, अच्युत जोशी, सरपंच विलास सूर्यवंशी, प्रा. आशिष दिवडे, अॅड. अतुल वानखेडे, राजेंद्र हनवते व प्रिया मिराशे उपस्थित होते.