Next
‘मी सामान्य जगणे आवडणारी ‘वर्किंग वूमन’
कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनप्रसंगी गौरी खान यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 11:17 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘‘पती शाहरुख खान आणि मुले यांना असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो,’ असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो; परंतु मी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दूर ठेवून केवळ सकारात्मक गोष्टीच घेते. मी एक ‘वर्किंग वूमन’ असून, इतरांसारखेच सामान्य जीवन जगायला मला आवडते. इंटिरिअर डिझायनर म्हणून माझ्या असलेल्या कामाविषयी मला अत्यंत प्रेम आहे,’ अशा शब्दांत गौरी खान यांनी आपली स्वतःची असलेली वेगळी ओळख उपस्थितांसमोर मांडली.

निमित्त होते ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या ‘ग्रॅव्हिटस रत्न’ या कॉफी टेबल बुकच्या अनावरण सोहळ्याचे. गौरी खान यांच्यासह अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन जुलै २०१९ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, आमदार माधुरी मिसाळ, डॉ. परवेझ ग्रँट, विद्या येरवडेकर, सुलज्जा फिरोदिया-मोटवानी, क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, रेखा मगर, सबीना संघवी, दिव्या सेठ, पारुल मेहता, फ्लो पुणेच्या माजी अध्यक्षा वर्षा चोरडिया, राज्यसभा खासदार संजय काकडे या वेळी उपस्थित होते.  


या कॉफी टेबल बुकमध्ये महिला सक्षमीकरण व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५ व्यक्तींविषयी लिहिलेल्या लेखांचा समावेश असून, मेघा शिंपी व पराग पोतदार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या सर्व मान्यवरांचा गौरी खान व अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्रॅव्हिटस रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव करण्यात आला; तसेच गौरी खान आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांचा या वेळी ग्रॅव्हिटस ऊर्जा पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला.

या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गौरी आणि अमृता यांची मुलाखत घेतली. इंटिरिअर डिझायनिंगमध्ये अगदी छोट्या स्तरावर केलेली सुरूवात, आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करताना मिळणारा आनंद आणि ग्राहकांच्या मनासारखे काम झाल्यावर मिळणारे समाधान याविषयी गौरी खान भरभरून बोलल्या. शाहरुख हा पाठीशी उभा राहणारा पती आणि अतिशय उत्तम पिता असल्याचे नमूद करायलाही त्या विसरल्या नाहीत.


‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसते, तरी मला त्यामुळे काही फरक पडला नसता. कारण मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व मला आवडते,’ असे सांगत अमृता यांनीही आपल्याला सामान्य जीवनच जगायला आवडत असल्याची भावना व्यक्त केली. ‘मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मक टीका घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझ्या माहेरी अनेकजण डॉक्टर असून, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याही कुटुंबात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामाजिक कार्याकडे माझा ओढा राहिला असल्याचे नमूद करून सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यासाठी काम करणे आपल्याला महत्त्वाचे वाटते असल्याचे अमृता यांनी सांगितले.


‘डोअरस्टेप स्कूल’च्या संस्थापिका रजनी देशपांडे, ‘एग्झिस्टेन्शियल नॉलेज फाउंडेशन’च्या रंजना बाजी, ‘लेक लाडकी अभियाना’च्या वर्षा देशपांडे, लेखिका वंदना खरे, बियाणे संरक्षक राहीबाई पोपरे, सामाजिक कार्यकर्त्या रितू बियाणी, ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा शेख, तब्बल १२५ जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके, ग्रॅव्हिटस रत्न संस्थेच्या दीपा खोरे, निवांत अंध विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे, ‘नासा’मध्ये स्थान मिळवलेल्या भारताच्या प्रतिनिधी लीना बोकिल, ‘शांतीवन’ संस्थेच्या संचालिका कावेरी नागरगोजे, ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संचालिका डॉ. विनीता आपटे, बालकल्याण समिताच्या प्रिया चोरगे, ‘सखी’ संस्थेच्या संचालक अंजली पवार, ‘लोकधारा’च्या राष्ट्रीय समन्वयक पल्लवी रेणके, जगन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनिषा टोकले, पत्रकार जयंती बरूडा यांना ग्रॅव्हिटस रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत यांची पत्नी सुषमा राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.   

‘महिलांनी एकत्र येऊन इतर महिलांना सक्षम करणे महत्त्वाचे असून, या कॉफी टेबल बुकद्वारे अशा अनेक महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे उषा काकडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search