Next
रामराम...! घाशीराम...!
BOI
Friday, November 03 | 04:53 PM
15 0 0
Share this story

'घाशीराम कोतवाल' नाटकातील एक क्षण

‘आयपार’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचा दुसरा दिवस (दोन नोव्हेंबर) रंगला तो विजय तेंडुलकरांच्या सुप्रसिद्ध ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने. आपल्या सोयीने व्यवस्थांची निर्मिती करणारे सत्ताधारी लोक आणि त्यांच्या या तत्त्वावर आधारित हे नाटक रसिकांची दाद मिळवून गेले... 
..................................
सत्ताधारी लोक आपल्या सोयीनुसार काही व्यवस्थांची निर्मिती करतात व तितक्याच सोयीस्करपणे त्या व्यवस्था संपवूनही टाकतात. मग त्यात काहींचे नुकसानही होते, पण अंतिमतः सत्ताधाऱ्यांचा हेतू साध्य होणे यातच त्या गोष्टीचे यश असते. या कालातीत तत्त्वावर आधारित असलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा प्रयोग राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या रंगमंडलार्फे काल (दोन नोव्हेंबर) ‘आयपार’च्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात सादर करण्यात आला...

विजय तेंडुलकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून तयार झालेले हे नाटक काळाच्या कसोटीवर शंभर टक्के उतरते. १९७२ मध्ये तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर तिरकसपणे भाष्य करणारे हे नाटक तेंडुलकरांनी लिहिले होते. मूळ मराठीत लिहिलेल्या या नाटकाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले व जगभर त्याचे प्रयोगही करण्यात आले. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बुंदेलखंडी भाषेत सादर केले. असे असले, तरी त्यातून मिळणाऱ्या संदेशात कोणतीही कसर राहिली नसल्याचे कोणीही ठामपणे सांगू शकेल. 

पेशवाईतील ब्राह्मणवर्ग आणि इतर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाटकाची सुरुवात होते. यात दोन सूत्रधार व इतर पात्रे वेगवेगण्या पद्यांच्या माध्यमातून नाटकाची सुरुवात करतात. पांढरेशुभ्र अंगरखे, पुणेरी पगड्या व त्यातून मागे मानेवर रुळणाऱ्या त्यांच्या शेंड्या एवढ्या गोष्टी पात्रांची पेशवेकालीन ब्राह्मण ही ओळख सांगण्यासाठी पुरेशा ठरल्या. हा वर्ग, पेशव्यांचे प्रधान नानासाहेब फडणवीस यांच्यासह नाचगाण्यात कसा रमला आहे, हे पहिला अंक आपल्याला सांगतो. त्यानंतर या नायकिणाच्या इथे काम करणारा घाशीराम आपल्या कलेच्या व सेवेच्या जोरावर नानासाहेबांकडून बक्षीस मिळवितो व तिथून नाटक वळण घेऊ लागते. त्याला मिळालेला बक्षीसाचा हार नायकिणीस देण्यास तो नकार देतो. त्यानंतर काही कारणाने त्याचा पुण्यनगरीत अपमान होतो. पुढे नानासाहेबांना एक कोवळी मुलगी आवडते व ती नानांपुढे सादर करण्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडून पुण्याची कोतवाली पदरात पाडून घेतो. आपले काम साध्य करण्यासाठी नाना लगेचच तसे फर्मान काढतात. पहिला अंक इथे संपतो. 

दुसऱ्या अंकात अशा प्रकारे अचानक सत्तेचा धनी झालेला घाशीराम कसा निष्ठूर होत जातो, याचे चित्रण पाहायला मिळते. आपल्या मुलीचीच आहुती देऊन त्याने हे प्रतिष्ठेचे कोतवालाचे पद मिळविलेले असते. पुढे त्याचा अहंकार वाढत जातो व सर्व प्रजा त्याच्या विरोधात उभी राहते. कधी काळी त्याच्यावर कृपादृष्टी दाखविलेले नानादेखील जनतेच्या मागणीखातर तितक्याच सहजतेने घाशीरामाच्या वधाचे फर्मान काढून मोकळे होतात. ज्या सहजतेने घाशीराम कोतवालीचा धनी होतो, तितक्याच सहजतेने तो मृत्यूच्या हवाली होतो. दरम्यान त्याच्या मुलीसही या व्यवस्थेने गिळंकृत केलेले असते. यातील कलाकारांनी सर्वच पात्रे जिवंत वाटावीत, इतक्या ताकदीने सादर केली. पोशाखात जरी पुणेरीपण दिसत असले, तरी बुंदेलखंडी बोलीने त्याला एक वेगळीच किनार मिळवून दिली. 

एके काळी बंद पाडण्यात आलेले घाशीराम पुन्हा रंगमंचावर पाहण्याचा योग आल्याने प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी झाली होती. प्रयोगानंतर डॉ. अजय जोशी यांनी घेतलेल्या चर्चेतूनही या नाटकाचे काही पैलू उलगडण्याचा प्रयत्न कलाकारांसह प्रेक्षकांनीदेखील केला. तसेच कमीत कमी सेट, प्रॉपर्टीचा वापर असल्याने ते महोत्सवाच्या ‘ॲक्टर ॲट दी सेंटर’ या थीममध्ये चपखल बसले. संगीतातसुद्धा महाराष्ट्रीय व पहाडी संगीताचे मिश्रण वापरण्यात आल्याचे कलाकारांनी चर्चेदरम्यान सांगितले. एकूणच या नाटकाने प्रेक्षकांना महोत्सवाच्या निमित्ताने एक संस्मरणीय अनुभव दिला. 

आरती तिवारीया नाटकाच्या आधी प्लॅटफॉर्म परफॉर्मन्समध्ये आरती तिवारी यांनी ‘किस्से कहानी - इस्मत की जुबानी’ हे नाट्यवाचन सादर केले. यालाही प्रेक्षकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी सादर झालेल्या गजब कहानी या नाटकानेही सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. एका जुन्या ग्रीक कथेवरून हे नाटक रूपांतरित करण्यात आलेले होते. वामन केंद्रे लिखित-दिग्दर्शित या नाटकातील कथा युद्धाच्या भोवती फिरणारी आहे. या नाटकाचा हा ५६ वा प्रयोग होता. वामन केंद्रे यांनी त्यांची ओळख असलेल्या सटायरिकल शैलीने हे नाटक बसवले. त्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेव्हर आला होता, असे कलाकारांशी झालेल्या चर्चेतून लक्षात आले.  

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa इथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link