Next
अंदमान-निकोबारला पर्यावरणपूरक सुविधांची भेट
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ
BOI
Monday, December 31, 2018 | 01:07 PM
15 0 0
Share this story


पोर्ट ब्लेअर :  रमणीय समुद्रकिनारे, स्वच्छ, शुद्ध हवा,पाणी अशा निसर्गसंपन्न अंदमान-निकोबार बेटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणपूरक सोयीसुविधा देणाऱ्या विविध विकास योजनांची पायाभरणी रविवारी, ३० डिसेंबर २०१८ रोजी केली; तसेच अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्याची घोषणाही केली. 

होप टाउन येथे फेरारगंज भागात उभारण्यात येणाऱ्या ३८८ कोटी रुपये खर्चाच्या गॅसवर चालणाऱ्या विद्युत प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणार असून, पोर्ट ब्लेअर आणि दक्षिण अंदमान भागाला ऊर्जा पुरवठा करणार आहे. एनटीपीसी विद्युत व्यापार निगम ही एनटीपीसीची उपकंपनी हा प्रकल्प उभारणार असून, प्रशासनाने कंपनीबरोबर वीज खरेदीचा २५ वर्षांचा करार केला आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी इलेक्ट्रिक वाहन सुविधाही सुरू करणार असल्याचे जाहीर केले. सुरुवातीला २० इलेक्ट्रिक वाहनांच्या साह्याने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. चौलदारी गावात त्यांनी ९९ त्सुनामी शेल्टर घरांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या इंडक्शन स्टोव्हचे वितरण केले. कार निकोबारमध्ये सात मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र व सौर गावाचे लोकार्पण करण्यात आले. अरोंगमध्ये आयटीआय आणि कार निकोबारमध्ये क्रीडा संकुलाचेही उद्घाटन करण्यात आले. 

‘पोर्ट ब्लेअर दिल्ली, मुंबई आणि चेन्नईइतकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच जो भाग मुख्य प्रवाहाशी जोडला गेलेला नाही, तो जोडण्यावर आम्ही लक्ष्य केंद्रीत केले आहे. वीज आणि पाणी या मूलभूत गरजांची पूर्तता सर्वांत आधी करण्यावर आमचा भर आहे,’ असे मोदी म्हणाले. 


रॉस, नील आणि हॅवलॉक द्वीपांचे नामांतर 
अंदमान-निकोबार बेटांवरील रॉस, नील आणि हॅवलॉक या द्वीपांची नावे बदलण्यात आली असून, ती आता अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद आणि स्वराज या नावांनी ओळखली जाणार आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम तिरंगा फडकावला होता. त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. 

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इच्छेनुसार या द्वीपांची नावे बदलण्यात येत आहेत,’ असे पंतप्रधानांनी नमूद केले. 

या वेळी पोर्ट ब्लेअरमधील साउथ पॉइंटवर पंतप्रधानांच्या हस्ते दीडशे फूट उंचीच्या तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. अंदमान-निकोबारमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीला परवानगी दिल्याची घोषणाही त्यांनी केली. 

पंतप्रधानांनी सेल्युलर जेलमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते तिथे मोदी काही वेळ ध्यानस्थही बसले. त्याआधी त्सुनामीतील मृतांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link