Next
झरिना वहाब, जेम्स कॅग्नी, डॉनल्ड सदरलँड
BOI
Tuesday, July 17, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

अभिनेत्री झरिना वहाब, चतुरस्र अभिनयाने गाजलेला नृत्यनिपुण अभिनेता जेम्स कॅग्नी आणि आठ वेळा गोल्डन ग्लोबसाठी नामांकनं मिळवणारा अभिनेता डॉनल्ड सदरलँड यांचा १७ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
झरिना वहाब

१७ जुलै १९५९ रोजी विशाखापट्टनममध्ये जन्मलेली झरिना वहाब ही हिंदीबरोबरच मल्याळम, तेलुगू, तमिळ भाषेत गाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री. अत्यंत साधीसुधी, घरेलू स्त्रीच्या भूमिकेत ती छाप पाडून जायची. १९७४ साली देव आनंदच्या ‘इश्क इश्क इश्क’ सिनेमातल्या छोट्याशा भूमिकेतून तिने हिंदी सिनेमात एंट्री घेतली आणि दोनच वर्षांत बासू चॅटर्जी यांच्या ‘चितचोर’मधून तिने अमोल पालेकरबरोबर सिनेमाच्या नावाप्रमाणेच दर्शकांची मनं जिंकली. पाठोपाठच आलेला ‘घरोंदा’ हा सिनेमा तिला फिल्मफेअरआठी नामांकन देऊन गेला होता. जागेच्या शोधात असणाऱ्या प्रेमिकांच्या जीवनात येणारं वादळ आणि त्याला खंबीरपणे तोंड देऊन जगणारी ‘छाया’ तिने सुरेखच साकारली होती. अगर, तुम्हारे लिये, अनपढ, सलाम मेमसाब, सावन को आने दो, सितारा, जजबात, अमृत, दिल मांगे मोअर, अशा सिनेमातल्या तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. ‘माय नेम इज खान’ या सिनेमातली तिची भूमिका तिला ‘ग्लोबल इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन ऑनर्स’चा पुरस्कार देऊन गेली.
......   

जेम्स कॅग्नी

१७ जुलै १८९९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेला जेम्स कॅग्नी हा चतुरस्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. विनोदी, गुन्हेगारी आणि रोमँटिक अशा सर्वच प्रकारच्या सिनेमांतून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तो नृत्यनिपुणही होता आणि त्याने स्टेजवरूनही दमदार भूमिका गाजवल्या होत्या. ‘सिनर्स हॉलिडे’ हा त्याचा पहिलाच सिनेमा गाजला आणि लगोलग ‘वॉर्नर ब्रदर्स’ने त्याच्याशी करार करून टाकला होता. ‘दी पब्लिक एनिमी’मधला त्याचा उलट्या काळजाचा गुन्हेगार गाजला. फूटलाइट परेड, ए मिडसमर नाइट्स ड्रीम यांसारख्या संगीतिकांमधून त्यानं कामं केली होती. एंजल्स विथ डर्टी फेसेस, इच डॉन आय डाय, दी रोअरिंग ट्वेंटीज, ओक्लाहामा कीड, दी स्रॉरबेरी ब्लाँड, लेडी किलर, जी मेन, व्हाइट हीटमधल्या त्याच्या भूमिका लोकांना आवडल्या होत्या. ‘यँकी डूडल डँडी’आणि ‘लव्ह मी ऑर लीव्ह मी’मधला त्याचा अभिनय अविस्मरणीय म्हणावा लागेल. ‘यँकी डूडल डँडी’बद्दल त्याला अकादमी पुरस्कार मिळाला होता. ऑर्सन वेल्ससारखा दिग्दर्शक तर त्याला ‘कॅमेऱ्यासमोरचा दी ग्रेटेस्ट अॅक्टर’ मानायचा!....
...... 

डॉनल्ड सदरलँड 

१७ जुलै १९३५ रोजी सेंट जॉनमध्ये (कॅनडा) जन्मलेला डॉनल्ड सदरलँड हा एक चांगला अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. आठ वेळा गोल्डन ग्लोब नामांकन मिळून, त्यापैकी दोन वेळा गोल्डन ग्लोब आणि एकदा एमी पुरस्कार मिळवलेल्या सदरलँडने आपल्या अभिनयाने अनेक उत्तमोत्तम सिनेमे गाजवले आहेत. ‘थ्रेशोल्ड’ सिनेमासाठी त्याला कॅनडियन अकॅडमी अॅवॉर्ड मिळालं आहे. दी डर्टी डझन, मॅश, केली’ज हिरोज, क्ल्युट, डोन्ट लूक नाऊ, १९००, आय ऑफ दी नीडल, ए ड्राय व्हाइट सीझन, बफी दी व्हॅम्पायर स्लेयर यांसारख्या फिल्म्समधून त्याने आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली आहे. त्याला एक एमी आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. 
.........

यांचाही आज जन्मदिन :
प्रमुख दलित साहित्यिक बाबूराव बागुल (जन्म : १७ जुलै १९३०, मृत्यू : २६ मार्च २००८) 
लेखिका मृणालिनी जोगळेकर (जन्म : १७ जुलै १९३६, मृत्यू : ३१ मार्च २००७) 
नाटककार आणि कादंबरीकार अनिल बर्वे (जन्म : १७ जुलै १९४८, मृत्यू : सहा डिसेंबर १९८४) 
यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link