Next
‘आयएजीईएस’तर्फे पुण्यात फेलोशिप सर्टिफिकेशन कोर्स
BOI
Thursday, November 29, 2018 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टीनल एंडो सर्जन्सतर्फे (आयएजीईएस) सह्याद्री हॉस्पिटल्स व जेटी सेंटर ऑफ लॅपरोस्कोपी अँड ओबेसिटी यांच्या सहकार्याने तीन दिवसीय फेलोशिप सर्टिफिकेशन कोर्स (एफआयएजीईएस) नुकताच आयोजित केला होता. यात तज्ज्ञांनी दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण, एन्डोस्कोपीसंदर्भात सादरीकरण व सहभागी डॉक्टरांचे मूल्यांकन अशा संरचित कार्यक्रमाचा समावेश होता.

प्रभात रोड येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे झालेल्या या कोर्सदरम्यान सह्याद्री हॉस्पिटल्स येथील कन्सल्टंट  लॅपरोस्कोपीक आणि बेरीयाट्रिक सर्जन आणि ‘आयएजीईएस’च्या पश्‍चिम विभागाच्या उपाध्यक्ष डॉ. जयश्री तोडकर यांनी मार्गदर्शन केले. गेली १५ वर्षे त्या ‘आयएजीईएस’च्या सदस्या असून, पाच वर्षांपासून ‘आयएजीईएस’च्या राष्ट्रीय कार्यकारणी मंडळात कार्यरत आहेत.

मार्गदर्शन करताना डॉ. तोडकर म्हणाल्या, ‘या सर्टिफिकेशन कोर्ससाठी भारतातील विविध राज्यांतून १५० हून अधिक युवा शल्यविशारदांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम म्हणजे युवा शल्यविशारदांना या क्षेत्रातील अद्ययावत कौशल्य व पद्धती अंगीकारण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या अभ्यासक्रमामध्ये तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन, शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. व्हर्च्युअल टूल एंडो ट्रेनरचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आधुनिक लॅप्रोस्कोपिक सुविधेद्वारे शल्यविशारदांच्या राष्ट्रीयस्तरावरील टीमने थेट प्रक्षेपणाद्वारे प्रतिनिधींसमोर यशस्वीरित्या केल्या. यामुळे सर्व रुग्ण लवकरात लवकर बरे होऊन शस्त्रक्रियेनंतर ४८ तासांच्या आत घरी जाऊ शकले.’

अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया आणि या क्षेत्रामध्ये येणारे नवीन तंत्रज्ञान व विकसित होणार्‍या नवीन पद्धतींसंदर्भात प्रभावी प्रशिक्षण देणे हे ‘एफआयएजीईएस’चे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक काळात शस्त्रक्रिया अधिक प्रभावी असल्या, तरीही वेदनांच्या भीतीमुळे रुग्णांची संख्या बदलत राहते. त्यामुळे कमीत कमी छेद देऊन करण्यात येणारी शस्त्रक्रिया म्हणजेच लॅप्रोस्कोपीला अधिक मान्यता आहे. लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रियांमुळे रुग्ण व डॉक्टर या दोघांनाही फायदा होतो. कमीत कमी छेद असल्यामुळे कमी वेदना, कमी रक्तस्त्राव यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरे होतात आणि त्याचा त्यांना दीर्घकालीन फायदा होतो. शल्यविशारद लॅपरोस्कोपीक तंत्रज्ञान वापरून शरीरातील घटक २० पटापर्यंत विस्तृत करून पाहू शकतात त्यामुळे एकंदर शस्त्रक्रियेमध्ये लक्षणीय सुधारणा होते.’

एक दशकापूर्वी शल्यविशारदांना तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी भारताबाहेर जावे लागत असे; पण आता भारतात अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य, तसेच ‘आयएजीईएस’सारख्या संस्थांचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण येथेच मिळू शकते. या क्षेत्रातील तज्ज्ञ आपले ज्ञान नवीन पिढीपर्यंत पोचवत आहेत ही एक जमेची बाजू असल्याचे डॉ. तोडकर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search