Next
कोपरी विसर्जन घाटाचा कायापालट करणारे प्रकाश कोटवानी
प्रशांत सिनकर
Tuesday, September 18, 2018 | 05:37 PM
15 0 1
Share this storyठाणे
: दिखाऊपणाचे समाजकार्य करून अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात वावरत असतात. निष्ठेने समाजकार्य करणारे अवलिया कार्यकर्ते मात्र पडद्यामागे राहून काम करणेच पसंत करतात. त्यांना प्रसिद्धीची नव्हे, तर कामाची आस असते. ठाण्यातील असेच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे प्रकाश कोटवानी. ठाण्यातील कोपरी येथील गणेश विसर्जन घाटाचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा कामाचा मोठा सहभाग आहे. 

कोपरीतील गणपती विसर्जन घाटावरील सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी ते कायमच तळ ठोकून असतात. गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या सामाजिक कार्याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला आहे. पूर्वी भाविकांना गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी अरुंद, चिखलाच्या रस्त्यातून जावे लागत होते. परंतु कोटवानी यांच्या प्रयत्नांमुळे डांबरी रस्ता निर्माण झाल्यामुळे बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांना सहज जाता येते. आता या घाटावर गर्दी होऊ लागल्यामुळे महापालिकेनेही या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा केल्या असून, केवळ कोपरीतीलच नव्हे, तर चेंदणी कोळीवाडा, मिठबंदर रोड, मुलुंड, नौपाडा, चरई, पाचपाखाडी परिसरातील गणेशमूर्तीही येथे विसर्जनासाठी आणल्या जात आहेत. येथे दीड दिवसाच्या जवळपास ९०० गणपतींचे, तर एक हजार गौरी-गणपतींचे विसर्जन होते.

कोपरीतील विसर्जन घाट आज प्रशस्त दिसत असला, तरी पूर्वी विसर्जनाची ही जागा चिंचोळी होती. त्यामुळे विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडणे अवघड जात होते. खाडीकिनाऱ्याचा परिसर असल्यामुळे नाग, घोणस अशा विषारी सापांची भीती असायची. भाविकांना चिखलातून जावे लागत होते. परंतु २०००-०१ मध्ये या घाटाला झळाळी देण्यासाठी कोटवानी यांनी परिश्रम घेतले होते. आता महापालिकेच्या माध्यमातून हा परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्यासाठी कोटवानी यांनी पाठपुरावा केला.

गेल्या १८ वर्षांपासून एका सामाजिक बांधिलकीने कोटवानी कार्यरत आहेत. पूर्वी खडबडीत जागेत उभे राहून बाप्पाची आरती करावी लागत होती. अन्य सोयीसुविधांची वानवाही या ठिकाणी जाणवायची. परंतु आता महापालिकेच्या माध्यमातून चांगली सोय करण्यात आली आहे. आता हा विसर्जन घाट ठाण्यातील सर्वांत चांगला आणि सुरक्षित घाट म्हणून नावारूपाला आला आहे. त्यामागे कोटवानी यांचे प्रयत्न आहेत.

गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मुलांपासून सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचीही कोटवानी विचारपूस करतात. त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना पुरवतात. हेच त्यांचे वेगळेपण आहे.

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. )

 
15 0 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link