Next
‘इथला’ गणेशोत्सव सुरू होतो भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून...
देवरुखातील चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला ३५० वर्षांची परंपरा
संदेश सप्रे
Friday, September 07, 2018 | 02:30 PM
15 1 0
Share this article:

गणेशोत्सवात चौसोपी वाड्यात प्रतिष्ठापना केली जाणारी अश्वावरील गणेशमूर्ती. (संग्रहित छायाचित्र)देवरुख : भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते, अशी परंपरा आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील ऐतिहासिक चौसोपी वाड्यातील उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. या वेगळ्या परंपरेला साहजिकच वेगळे कारणही आहे. गेली ३५० वर्षे हा उत्सव सुरू आहे.  या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकातील मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणे हा उत्सव साजरा होतो. 

ही वेगळी परंपरा सुरू होण्यामागचे कारण असे आहे. इ. स. १७००मध्ये सांगली जिल्ह्यातील कांदे मांगले या गावाहून देवरुखात आलेले भास्कर जोशी यांचे थोरले चिरंजीव बाबा जोशी हे देवरुखमधील श्री सिद्धिविनायक देवस्थानाचे संस्थापक असल्याची माहिती उपलब्ध आहे. बाबा जोशी हे गृहस्थाश्रमी देवरुखात राहत असताना त्यांना दुर्धर व्याधी जडली. त्यावर विविध उपाय करून झाले; मात्र गुण येईना. आता सगळे परमेश्वराच्या हाती, असे म्हणून त्यांनी संगमेश्वर तालुक्यातील मठ धामापूर येथील शंकराच्या जागृत सोमेश्वर देवस्थानात व नंतर मोरगावातील मयुरेश्वराच्या मंदिरात कडक उपासना सुरू केली. मोरगावात उपासना सुरू असताना त्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार एका ठिकाणी खोदकाम केल्यावर त्यांना चांदीच्या डब्यात श्री सिद्धिविनायकाची नुकतीच पूजा केलेली मूर्ती सापडली. झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी ती मूर्ती देवरुखात आणली आणि चौसोपी वाड्यात त्याची प्रतिष्ठापना केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध प्रतिपदेचा होता. तेव्हापासून आजतागायत दर वर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठी उजाडता संपतो. 

दृष्टांतात जोशीबुवांना सापडलेली चांदीची सिद्धिविनायक मूर्तीगेली साडेतीनशे वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. अन्यत्र सर्वच ठिकाणी गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होतो; मात्र जोशीबुवांकडील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होत असल्याने या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरुवात होते, असे म्हटले जाते.

देवरुखात चौसोपी वाड्यात साजरा होणारा हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले भाविक या उत्सवाला मोठ्या संख्येने येतात. उत्सव कालावधीत चौसोपी वाड्यात विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे एका दिवशी कितीही भाविक दर्शनाला आले, तरीही त्यांना देण्यात येणाऱ्या प्रसादात कधीच कमतरता पडत नाही. उत्सवाच्या कालावधीत येतील तेवढ्या भक्तांना दुपारी व रात्री प्रसादाचे भोजन दिले जाते. दिवसाकाठी हजारो भाविक येथे दर्शनासाठी रांग लावतात. जोशी घराण्याच्या सातव्या पिढीतील रघुनाथ काशिनाथ तथा पंताभाऊ जोशी यांनी ६०हून अधिक वर्षे हा उत्सव साजरा केला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती विजयाताई जोशी उतारवयातही आपल्या नातेवाईकांच्या व परिसरातील हितचिंतक व भाविकांच्या साथीने हा उत्सव तेवढ्याच उत्साहात साजरा करीत आहेत. 


 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search