Next
..आणि झोपडी झगमगून गेली..
BOI
Tuesday, May 01 | 06:45 AM
15 1 0
Share this story


पाच झोपड्यांची निवड करून त्यांच्या छपरावर सौर पॅनल बसवले. झोपडीच्या प्रवेशाजवळ बॅटरी व कंट्रोल बॉक्स बसवले व प्रत्येक झोपडीत एका ओळीत पाच एलईडी लाईट लावले. स्विच सुरू केल्याबरोबर झोपडी प्रकाशाने झगमगून गेली. त्यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे कुतुहलाचे व आनंदाचे हसू बघण्यासारखे होते. मला व पणशीकरांना आमच्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले होते... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’या लेखमालिकेचा हा सातवा भाग...
........................................................
हंग्रूम येथील सौर दिव्यांचा प्रकल्प ‘झिलियानग्रांग हरका असोसिएशन’ यांच्या सहाय्याने करायचे ठरले. त्यासाठी त्यांची एक बैठक बोलवली. संपूर्ण प्रकल्प त्यांना नीट समजावून सांगितला. हंग्रूममध्ये कोणत्या प्रकारचे दिवे उपयुक्त ठरतील, त्याचे तीन-चार मॉडेल्स मी दाखवले. त्यातून एक मॉडेल सर्वानुमते निश्चित करण्यात आले. मी त्यांना सांगितले, की त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प करणे मला शक्य नाही. 

हंग्रूमला ये-जा करण्यापासून ते गावकऱ्यांशी समन्वय साधण्याचे काम त्यांना करावे लागेल. शिवाय कोणतीही गोष्ट कोणालाही फुकट दिली जाणार नाही. प्रत्येकाकडून थोडे-फार पैसे घेतले जातील. सौर दिव्यांसाठी घरटी १००० रुपये गोळा करावे लागतील. तुम्ही त्यासाठी बँकेत नवीन खाते उघडा व त्यात पैसे जमा करा. माझ्याकडे मी पैसे जमा करणार नाही. प्रकल्पासाठी लागणारी उर्वरित रक्कम मी पुण्यातून गोळा करण्याचा प्रयत्न करेन. आवश्यक पैसे जमा झाले नाहीत, तर मात्र प्रकल्प रद्द करावा लागेल. तसे झाल्यास सर्वांना त्यांचे पैसे परत करा, असे मी सांगितले. या माझ्या खूलाशामुळे त्यांचा माझ्यावर विश्वास बसला. 

एकूण ७० घरांमध्ये सौर दिवे लावायचे आहेत, तेव्हा ७० हजार रुपये या खात्यात जमा झाल्यावर, मी माझ्या कामाला सुरुवात करेन, असे मी सांगितले व ते सर्वांनी मान्य केले. या प्रसंगी एक गोष्ट मला कटाक्षाने जाणवली, की एखादी गोष्ट घडायची असेल, तर कोणतीतरी अदृश्य शक्ती त्यासाठी तुम्हाला साहाय्य करत असते, प्रेरणा देत असते वा त्यातील अडथळे दूर करत असते. पुण्यात येऊन मी या प्रकल्पासाठी मदत मिळवण्यासाठी तेथील परिस्थितीवर एक लेख लिहिला व तो वृत्तपत्रातून छापून आणला. त्यासोबत लोकांना आर्थिक मदतीचे आवाहनही केले. हा लेख वाचून पहिलाच फोन आला, तो सुमनताई किर्लोस्करांचा. त्यांनी माझ्या या उपक्रमाला शुभाशीर्वाद दिले व आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. नंतर तीन-चार दिवस यासाठी सतत फोन खणखणत होता. अगदी १०० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत देणग्या मिळत होत्या. ही किमया त्या अदृश्य प्रेरणेचीच होती. 

जवळ जवळ साडेतीन लाख रुपये जमा झाले होते. आता चांगला सौर संच शोधण्याचे काम मी सुरू केले. योगायोगाची मालिका सुरूच होती. एक देणगीदार दत्तात्रय जोशी यांनी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी आपल्या घरी सौर दिवे लावलेले होते. ते पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे त्यांनी प्रदीप पाटसकर यांची ओळख करून दिली. पाटसकरांनी ते काम केले होते. हे लाईट कॉम्पॅक्ट एलईडी होते व दीर्घायुषी होते. मला अशाच प्रकारच्या दिव्यांची आवश्यकता होती. हाफलांगमध्ये एकदा लागल्यावर पुन्हा काढता येणार नाहीत, असेच दिवे मला पाहिजे होते. पाटसकरांनी मला या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे कबूल केले. वासुदेव पणशीकर नावाचे आणखी एक दिलदार देणगीदार जोडले गेले. पाटसकर यांचे तांत्रिक व व्यावहारिक ज्ञान चांगले असल्यामुळे ते काम त्यांच्याकडेच सोपवण्याचा निर्णय घेतला. एका घरासाठी एक सौर संच बसवायचा होता. एक संच साधारण तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत पडणार होता. 

हा प्रकल्प सुरू करण्याआधी मी एक चाचणी फेरी करायचे ठरवले. हंग्रूम येथे आठ महिने ढगाळ वातावरण असते. मार्च ते जुलै भरपूर पाऊस असतो. या काळात सौर दिवे कसे काम करतात, याची चाचणी घेण्याचे ठरवले. पाच संच घेऊन मी मे महिन्यात हंग्रूमला जाण्याचे ठरवले. नातू सोहमसह पणशीकरांनीही माझ्याबरोबर यायचे असे ठरवले. पाटसकरांनी वायरिंगचे सगळे काम करून दिले होते. लोकांना फक्त स्विच बंद-चालू करायचा होता व चार्जिंगचा लाल दिवा सुरू राहिल याची खात्री करायची होती. प्रत्येक झोपडीतील वायरिंग त्याठिकाणच्या स्थानिक मुलांना शिकवून त्यांच्याकडून करून घ्यायची असे ठरवले.

मे महिन्यात मी व पणशीकर ५ संच घेऊन हंग्रूमला गेलो. संपूर्ण गाव हे काम बघायला जमले होत. पाच झोपड्यांची निवड करून त्यांच्या छपरावर सौर पॅनल बसवले. झोपडीच्या प्रवेशाजवळ बॅटरी व कंट्रोल बॉक्स बसवले व प्रत्येक झोपडीत एका ओळीत पाच एलईडी लाईट लावले. ही कामे गावातल्या तरुण मुलांनी उत्साहाने केली. स्विच सुरू केल्याबरोबर झोपडी प्रकाशाने झगमगून गेली. त्यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे कुतुहलाचे व आनंदाचे हसू बघण्यासारखे होते. मला व पणशीकरांना आमच्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले होते. अदृश्य प्रेरणा आम्हाला प्रोत्साहित करत होती.

पुण्याला आल्यावर ऑक्टोबरपर्यंत तेथील लोकांच्या सतत संपर्कात होतो. तेथील सगळी माहिती त्या लोकांकडून घेत होतो. ‘मामा, पुरा बरसात मे लाईट अच्चामे जाला. कोई बंद नाही हुआ’, असे हरका सांगू लागला. ‘मामा, अब दुसरा घरोमे भी लाईट लगायेगा’, असे त्याने म्हटल्यावर आम्ही चौघे जण कामाला लागलो. ‘हरका असोसिएशन’नेही काही पैसे माझ्या खात्यावर जमा केले. पाटसकर व पणशीकर या दोघांनीही या कार्यात खूप मदत केली. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व सामान रेल्वेने गुवाहाटीला पाठवण्याचे निश्चित केले. ‘पुण्यातील नागरिकांच्या आर्थिक सहकार्यामुळे हंग्रूम येथील सौर दिव्यांचा प्रकल्प पूर्ण केला’ अशा आशयाचा मजकूर असलेले काही फलक तयार करण्यात आले. हे फलक इंग्रजी भाषेत लिहून ते हंग्रूममध्ये जागोजागी लावण्याचे ठरवले. १५ नोव्हेंबरपर्यंत पाटसकरांनी  सर्व ६५ सेट्स तयार केले व त्यांचे व्यवस्थित पॅकिंग केले. असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना हे सामान घेऊन जाण्यासाठी सांगितले होते. 

रेल्वेने पाठवलेले पार्सल काही कारणास्तव मध्येच कुठेतरी अडकले. ते गुवाहाटीपर्यंत पोहोचलेच नाही. मग हाफलांगला विश्व हिंदू परिषदेच्या दिनेश तिवारी यांना फोन करून, मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या सांगण्यानुसार दीनदयाळजी यांनी त्वरित हालचाल करून सामान गुवाहाटीच्या गाडीत लोड केले. गुवाहाटीला वनवासी कल्याण आश्रमचे शाळीग्राम यांना ते सामान ताब्यात घेण्याची विनंती केली. आयकुटिंग व आराबाबांना वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यालयातून ते सामान हाफलांगला घेऊन जाण्यास सांगितले. 

मी, जोशी, पाटसकर व पणशीकर १५ डिसेंबरला विमानाने गुवाहाटीला व पुढे हाफलांगला गेलो. हाफलांगमध्ये रामकुइजी व हरका असोसिएशनचे कार्यकर्त यांनी आमची राहण्याची चांगली सोय केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेटवर्कच्या बसने अराबाबा सामान आणणार होते. सामान आले, की लगेच जीपने सर्वांनी हंग्रूमला जाण्याचे ठरवले. जोशी, पाटसकरांना हाफलांग खूप आवडले. चारही बाजूंना हिरव्यागार पर्वत रांगा, वेडी-वाकडी वळणे घेत डोंगर चढणारे रस्ते, थंडगार हवा आणि मनमिळाऊ परिवार. सगळे एकदम खुश होते. बस आली. सर्वांनी मिळून सामान उतरवले. ते सुरक्षित पोहोचले होते. सगळे सामान दोन जीपमध्ये भरून आम्ही लगेच हंग्रूमला निघालो...  

(क्रमशः)                                                                                        
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link