Next
‘सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘सायबर सेल’ तत्पर’
सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, July 03, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात होतो. डिजिटल इंडियाच्या काळात बरेच आर्थिक व्यवहार ऑनलाइन स्वरूपात होत आहेत. त्यातून सायबर गुन्हेगारीही वाढत आहे; मात्र, सायबर संबंधित गुन्हा घडल्यास जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सुरक्षा विभाग अतिशय तत्पर असून, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे,’ असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी केले.

केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचा संगणक अभियांत्रिकी विभाग आणि  कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेवर आधारित एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे आयोजन केला होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. पंडित मदन मोहन मालविय नॅशनल मिशन फॉर टीचर्स अ‍ॅंड टीचिंग या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

या वेळी केजे शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी अ‍ॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. नीलेश उके, संगणक विभागाचे प्रमुख प्रा. संतोष दराडे आदी उपस्थित होते. सायबर गुन्हे, सुरक्षा आणि त्यासंदर्भातील घ्यायची काळजी याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन झाले.

देशमुख म्हणाले, ‘ऑनलाइन धमक्या, बदनामी, फेक कॉल, एसएमएस व ई-मेल्स अशा स्वरूपातून गुन्हे घडत आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मेहनत घेतली जाते. त्यामुळे आपल्यासोबत असा प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क केला पाहिजे. वेग, क्षमता, कौशल्य, संयम आणि प्रमाणिकता या गोष्टी आपल्या अंगी बाणवल्या पाहिजेत.’

डॉ. अभ्यंकर म्हणाले, ‘शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केजे शिक्षणसंस्था नेहमीच पुढाकार घेत असते. सायबर सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. या डिजिटल युगात आपली सुरक्षा कशी करावी, याविषयी हा कार्यक्रम मार्गदर्शक ठरेल.’

डॉ. उके म्हणाले, ‘सायबर गुन्हेगारीवर मात करण्यासाठी विद्यापीठे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या परस्पर सहकार्याने नवनवीन तंत्रज्ञान विकसित व्हायला हवे. उच्च दर्जाचे संशोधन झाले आणि विद्यार्थी-शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले, तर सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक उपाययोजना देता येतील.’

प्रा. दराडे म्हणाले, ‘सायबर सुरक्षा विभागाला आज चांगल्या कौशल्य विकसित विद्यार्थ्यांची (टेक्नोक्रॅट) आवश्यकता आहे. आपण संशोधन व विकासाच्या माध्यमातून ती पूर्ण करू शकतो. सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थी-शिक्षकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.’

संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, संचालक डॉ. व्यासराज काखांडकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. शीतल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश देवरे व प्रा. यामिन हकीम यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. प्रा. संतोष दराडे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search