Next
‘मनातून येणाऱ्या गाण्याला चौकटी नसाव्यात’
महेश काळे यांचे मत
BOI
Friday, February 01, 2019 | 01:02 PM
15 0 0
Share this story

कोथरूड सांस्कृतिक महोत्सवात  सादरीकरण करताना गायक महेश काळे.पुणे : ‘गळ्यातून निघणारे प्रत्येक गीत हे मनापासून येत असल्याने ते सर्वांचेच असते. अशा गाण्याला चौकटी नसाव्यात. कारण गाणं हे अमर्यादीत आहे,’ अशी भावना शास्त्रीय गायक महेश काळे यांनी व्यक्त केली.

संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयडियल कॉलनी येथील मैदानावर ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. महेश काळे यांच्या मैफलीने या महोत्सवाची सांगता झाली. 

‘कोथरूड हे माझं अंगण आहे. या अंगणात गाणं सादर करण्याचा आनंद वेगळाच असतो. भरभरून प्रेम करण्याऱ्या रसिकांमुळेच आजही माझं गाणं टिकून आहे,’ असेही महेश काळे यांनी सांगितले.

या वेळी महेश काळे यांना गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक प्रसन्न जगताप, धीरज घाटे, महेश लडकत, दीपक पोटे, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भांबरे, मोहन घैसास, हर्षाली माथवड, आदी मान्यवर उपस्थित होते. 

महोत्सवाच्या चारही दिवशी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने कला क्षेत्रातील योगदानासाठी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे निवेदक आनंद देशमुख, संवादिनी वादक सचिन जांभेकर, गायक मेहेर परुळेकर, रंगकर्मी श्रीराम रानडे, नेपथ्यकार शाम भूतकर, गायिका राजेश्वरी पवार, सिंथेसायझर वादक अनय गाडगीळ आणि कथ्थक नृत्यांगना अर्चना संजय या कोथरूडमधील कलाकारांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

गायक महेश काळे यांचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी नगरसेवक योगेश समेळ, विधी समितीचे अध्यक्ष महेश लडकत, गायक महेश काळे, गिरीश बापट, मुरलीधर मोहोळ व प्रसन्न जगताप.

यानिमित्ताने गायक महेश काळे यांची ‘स्वरतरंग’ ही सुरेल मैफिल रसिकांना अनुभवता आली. शास्त्रीय गायनापासून ते फ्युजन... चित्रपट गीतांपासून ते रागांपर्यंत अशा एकापेक्षा एक रचना त्यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. राग पुरिया कल्याण, हे सुरांनो चंद्र व्हा, माझे जीवन गाणे असे विविध गायन प्रकार सादर करताना त्यांनी आपले गायनातील काही अनुभव ही सांगितले. निखिल फाटक (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (तालवाद्य), राजीव तांबे (हार्मोनियम), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), अमित गाडगीळ (गिटार), अभिजित भदे (ड्रम्स) आणि केदार गुळवणी (व्हायोलिन) यांनी संगीत साथ केली.

या वेळी पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘कलाकारांच्या कला प्रत्यक्ष पाहणे हा वेगळाच अनुभव असतो. त्या कलेतून आपणही समृद्ध होत जातो. मालिकेत किंवा चित्रपटात दिसणारे हे कलाकार खऱ्या जीवनात कसे आहेत ही अनुभूती त्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण पाहताना होते.’ 

संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link