Next
आठ वर्षांच्या अनुशला मिळाले नवजीवन
ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
BOI
Friday, April 05, 2019 | 06:05 PM
15 0 0
Share this article:

पुणे : जन्मापासूनच यकृताच्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या अनुश गिरनाळे याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याला नवजीवन बहाल केले आहे. 

औरंगाबादच्या अनुश गिरनाळे याला बिलिअरी एस्ट्राशिया(Biliary Atresia)झाला होता, ज्यामुळे त्याची बिलिअरी ट्यूब अरुंद होऊन त्याचे यकृत निकामी झाले होते. परिणामी त्याला दैनंदिन कार्य करण्यात अडचण येत असे. त्याला यातून बरे करण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे यकृत प्रत्यारोपण पण जन्मापासूनच त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती, त्यामुळे यकृत प्रत्यारोपणासाठी येणारा खर्च कसा करायचा या विचाराने त्याचे आई-वडील खचून गेले होते. 

दरम्यान, त्यांनी औरंगाबादमध्ये ज्युपिटर हॉस्पिटलच्या ‘पेरिफेरल क्लिनिक’ची जाहिरात पाहिली. त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. गौरव चौबळ आणि येथील यकृत प्रत्यारोपण टीमबद्दल माहिती मिळाली;तसेच हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या प्रत्यारोपणाच्या खर्चावर १० टक्के सूटदेखील मिळणार असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी अनुशच्या यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला आणि ते पुण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. येथे त्यांच्या मदतीला मुकुल माधव फाउंडेशन उभे राहिले. अनुशच्या फक्त शस्त्रक्रियेचा खर्चच त्याच्या पालकांना द्यावा लागला. उर्वरीत सगळा खर्च हॉस्पिटल आणि मुकुल माधव फाउंडेशनने उचलला. अनुशची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, लवकरच तो इतर मुलांप्रमाणे आयुष्य जगू शकेल. 

डॉ. गौरव चौबळ, डॉ. शरण नरुटे आदींसह अनुश गिरनाळे

या वेळी बोलताना ज्युपिटर हॉस्पिटल येथील यकृत प्रत्यारोपण विभागाचे मुख्य शल्यचिकित्सातज्ञ डॉ. गौरव चौबळ म्हणाले, ‘अनुशची आई सौ. गिरनाळे यांनी त्याला यकृत दान केले व दोघेही आता सुस्थितीत आहेत. लहान मुलांचे यकृत प्रत्यारोपण ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यात अनुशची अगोदर शस्त्रक्रिया झाली असल्याने हे काम अतिशय कठीण होते. हे प्रत्यारोपण करून आम्ही समाधानी आहोत.’

डॉ. शरण नरुटे म्हणाले, ‘जिवंत यकृत दाता म्हणजे दात्याच्या यकृताचा काही भाग रुग्णास दिला जातो. अनुशच्या आईला जेव्हा आपल्या मुलगा बरा होण्याची आशा दिसली, तेव्हा त्या यकृत दानाकरीता लगेच तयार झाल्या. दोघांच्याही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, दोघेही उत्तम आहेत.’

रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यास कटीबद्ध आहेत. कोणत्याही मुलास वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत हवी असल्यास आम्ही ती करण्यास तयार आहोत. माणुसकीच्या नात्याने आम्ही ही मदत करतो.’ 

या वेळी अनुशचे वडील म्हणाले, ‘ ज्युपिटर हॉस्पिटल, डॉ. गौरव चौबळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळेच माझ्या मुलाला नवीन जीवन मिळाले आहे.’

ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉ. पारिजात गुप्ते, डॉ वैशाली, डॉ. पवन हंचनाळे, डॉ. आदित्य नानावटी, डॉ. सागर कक्कड व डॉ सेजल गराडे यांसाखे अनुभवी व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search