Next
सामाजिक कृतज्ञतेचे इच्छापत्र
BOI
Wednesday, March 15, 2017 | 05:26 PM
15 13 0
Share this story

दापोडी (पुणे) येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक अरुण गणेश सरस्वते यांनी सामाजिक कृतज्ञतेचा एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. आपल्याकडे अनेक वर्षे घरकाम करणाऱ्या मावशींना आपले चार खोल्यांचे, एक हजार स्क्वेअर फुटांचे घर दान करण्याचा, आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालेला मोठेपणा त्यांनी दाखवला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले घर त्यांना दिले जावे, असे इच्छापत्रच त्यांनी केले आहे. अशा या प्रेरक उपक्रमाच्या कल्पनेविषयीची ही माहिती त्यांच्याच शब्दांत...
................................................

मी आज ७७ वर्षांचा आहे. परिपूर्ण आयुष्य उपभोगून, तृप्त मनाने आणि अधिक उत्साहाने पुढील वाटचाल करीत आहे. मागे वळून पाहताना भूतकाळ व्हिडिओसारखा दिसत होता. सुख-दु:खाचे सर्व प्रसंग पाहताना आता मजा वाटत होती. कारण आता परिपक्वता आली होती. त्यातूनच वैराग्य आणि सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेची उपरती झाली. या सगळ्याची मानसिक तयारी साधारणतः मी सेवानिवृत्त झाल्यावर म्हणजे सन २०००पासून सुरू झाली. 

घरात आम्ही चौघे जण राहत होतो, माझे आई-वडील आणि आम्ही दोघे. माझ्या दोन्ही मुलांची लग्ने झालेली होती. मुलगा वेगळा राहत होता. त्यांचे संसार व्यावस्थित चालले होते. आमचे स्वतःचे राहते घर होते व मुख्य म्हणजे कोणतेही कर्ज डोक्यावर नव्हते. वयोमानानुसार आमच्या आवडीनिवडी व गरजा कमी होऊ लागल्या होत्या. केंद्रीय स्वास्थ्य योजनेमुळे औषधोपचाराचा खर्च सरकार करीत आहे. थोडक्यात म्हणजे माझ्यावर कोणतीही मोठी आर्थिक जबाबदारी नव्हती. केंद्रीय पेन्शन बऱ्यापैकी असल्यामुळे कुठे कामधंदा करण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा मनात विचार येऊ लागले, की समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे. मला कोणा अनाथ मुलाला दत्तक घ्यायचे नव्हते, तर एखाद्या गरजवंत कुटुंबालाच दत्तक घ्यायची इच्छा होती. त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या आणि त्यांची परिस्थिती सुधारायची होती. सुदैवाने ही संधी आपोआप चालून आली. 

आम्ही घरात सगळेच वयस्कर असल्यामुळे माझ्या मुलाने, श्रीकांतने घरकाम व स्वयंपाकासाठी एका महिलेला पाठवले. ती महिला त्याच्या सोसायटीच्या वॉचमनची सून होती. त्यांना पैशाची गरज होती म्हणून आमच्याकडे घरकामासाठी ठेवले. पगार ९०० रुपये ठरला. तिच्या घरी सासू, सासरे, पती, दीर, जाऊ, त्यांची मुले व तिची दोन मुले असा परिवार होता. तिच्या यजमानांना फिट्सचा आजार असल्याने त्यांना कोठेही नोकरी नव्हती. तिचे सासरे वॉचमन होते आणि सासूबाई बाहेर पोळ्या करत असत. दीर व जाऊ यांच्याकडून नातेसंबंध फारसे सकारात्मक नव्हते. १० बाय १०च्या एका पत्र्याच्या खोलीत एवढे सगळे जण राहत होते. तिची मुले त्या वेळी सहावी-सातवीत होती. आम्ही दिलेल्या पगारावरच तिचा संसार चालायचा. तिचे वागणे अत्यंत सुशील. स्वच्छता राखण्याची व टापटिपीची सवय. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्वासू. सदैव हसतमुख व साक्षात अन्नपूर्णा. कोणताही पदार्थ अगदी चविष्ट करायची. हळूहळू आमचा व माझ्या आई-वडिलांचा तिच्यावर विश्वास बसला. माझ्या आई-वडिलांना काय हवे-नको ते आपुलकीने पाहायची. तिच्या घराची अवस्था झोपडपट्टीतील इतर व्यवहारांप्रमाणेच होती. हिचे कुटुंब आपण दत्तक घेऊन त्यांच्या उत्कर्षासाठी मदत करायचे ठरवले. 

माझ्या वडिलांचे २००३ साली निधन झाले. त्यानंतर आई कोथरूडला भावांकडे राहायला गेली. त्यानंतर घरात आम्ही दोघेच असायचो. आमच्या दोघांचे घरातले करूनदेखील तिच्याकडे भरपूर वेळ असायचा. २००४मध्ये आम्ही घर बदलले आणि सोसायटीत राहायला आलो. तिला सर्व जण ‘मावशी’ म्हणायचे. येथे तिला पोळ्या करायचे काम मिळायचे. त्यामुळे तिच्या उत्पन्नात भर पडायची. माझी मुलगी जवळच राहत असल्याने तिच्या घरचेही काम तिला मिळाले. अशा प्रकारे हळूहळू तिचे उत्पन्न वाढत गेले. तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तिचे सर्व कर्ज फेडून टाकले. पगारातून हप्त्याहप्त्याने तिने त्याची परतफेड केली. तिला गॅस सिलिंडर घेऊन दिला. पंखे दिले, कूलर दिला. मुलाला ‘मिटकॉन’मध्ये प्रशिक्षण देऊन चांगली नोकरी मिळवून दिली. जसजशी माझ्या पेन्शनमध्ये वाढ होत असे, त्याप्रमाणे मावशीचा पगारही मी वाढवत असे. दिवाळीला बोनस देत असे. आता मी तिला दरमहा चार हजार रुपये देतो. माझी मुलगीही तिला तेवढाच पगार देते. आता ती आमच्या कुटुंबातील तिसरी सदस्य झाली आहे. माझे सर्व नातेवाइक, मित्रपरिवार तिला तसाच मान देतात. तिला आमच्याकडे काम करायला लागून आता १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या दोन्ही मुलांची लग्ने झाली. मी आणि आमच्या मुलांनी लग्नाचा खर्च उचलला. यथावकाश तिनेही परतफेड केली. ती आज कर्जमुक्त आहे, याचा मला अभिमान वाटतो. 

सर्वसाधारण १० वर्षांच्या सेवेनंतर पेन्शन सुरू होते. माझे वयही आता सरत आले आहे. हिला पेन्शन नाही, तर तिच्यापुढे काय पर्याय असेल, असा विचार सतत मनात घोळत असे. तेव्हा अचानक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आलेला वृंदा भालेराव यांचा ‘मालमत्ता कोणास द्यावी,’ हा लेख वाचनात आला. त्याचा सारांश असा आहे - ‘वयस्कर आईवडील येथे एकटे राहत असत. मुलगा परदेशात स्थायिक आहे. आई-वडिलांची देखभाल एक नर्स करायची. तिने १०-१२ वर्षे सेवा केल्यानंतर आईवडिलांचे निधन झाले. मुलगा परदेशातून आला. त्याने नर्सला पाच हजार रुपये दिले. राहते घर विकून टाकले आणि पैसे घेऊन परदेशी गेला. आता प्रश्न असा, की त्या मुलाने त्या नर्सला पैसे देऊन उपकार केले की काय? १०-१२ वर्षे मुलाच्या अनुपस्थितीत तिने आई-वडिलांना छान सांभाळले, त्याची परतफेड पैशांत होईल का? त्याला पैशांची काही कमतरता नाही. मग ते घर विकून पैसे घेऊन निघून जाण्यापेक्षा ते घर नर्सला दिले असते, तर त्याला काय फरक पडला असता?’ या लेखातील हा विचार वाचून मला मावशीसाठी काय करावे याचा मार्ग सापडला.

माझ्या दोन्ही मुलांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. प्रत्येकाचे दोन-दोन फ्लॅट आहेत. भरपूर पगार आहेत. प्रत्येकाला एक-एकच अपत्य आहे. त्याची त्यांनी सोय केलेली आहे. म्हणून मी जर माझ्या पश्चात त्यांच्यासाठी काही ठेवले नाही, तर त्याने त्यांना काहीच फरक पडणार नाही. दुसरे म्हणजे माझी वास्तू सर्वार्थाने लाभदायक सिद्ध झालेली आहे. मावशीला या वास्तूचा कानाकोपरा परिचयाचा आहे आणि या घराविषयी आपुलकी आहे. वैयक्तिक पातळीवर तिला वन बीएचके घर घेणेही आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. 

माझ्या वडिलांनी मला काही ठेवले नाही, त्यामुळे माझे काही अडले नाही. उलट माझी भरभराटच झाली. तसेच मी माझ्या मुलांसाठी काही ठेवले नाही, तरी त्याने काही फरक पडणार नाही, हा विचार पक्का झाल्यावर मी माझ्या मुलीशी विचारविनिमय केला. तिला यात काहीही वावगे वाटले नाही. म्हणून मी लगेच नवीन इच्छापत्र केले आणि ‘ही वास्तू आम्हा दोघांच्या निधनानंतर मावशीच्या नावावर करावी,’ असे त्यात नमूद केले. हे इच्छापत्र नोटराइज करून पाकिटात सीलबंद करून, त्यावर ‘आम्हा उभयतांच्या मृत्यूनंतर याची अंमलबजावणी करावी,’ असे लिहून मुलीला सूचना दिल्या आहेत.  आता मला खूप हलके व मोकळे वाटत आहे.

- अरुण गणेश सरस्वते, पुणे
संपर्क :
९४२३० ०२२१५
 
15 13 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link