Next
शेअर्स खरेदीसाठी अनुकूल स्थिती
BOI
Sunday, February 04, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात सध्या ओहोटी सुरू आहे; मात्र या स्थितीत घाबरून न जाता योग्य शेअर्सची निवड करून खरेदी करणे महत्त्वाचे आहे. त्याबद्दल आणि कोणते शेअर्स सध्या खरेदीयोग्य आहेत याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात....
.............. 
शेअर बाजार हा समुद्रासारखा आहे. तिथे सदैव भरती नसते वा ओहोटी नसते. कधी भरती, कधी ओहोटी इथेही दिसते. त्यामुळे इथे पोहणाऱ्याने किमान काही तंत्रे शिकून घ्यायला हवीत. त्यानंतरच या समुद्रात पाय ठेवावा. नाही तर ओहोटीच्या वेळी आत ओढले जायची शक्यता असते. 

शेअर बाजारातले वातावरण हे अर्थसंकल्पाच्या आधी वा नंतर बदलते. तसेच, पावसाळ्याच्या आधी, मध्ये व नंतरही बदलते. या वेळी अर्थसंकल्पात कुणालाच काही दिले नसल्याने, त्यानंतरच्या दोन दिवसांत निर्देशांक एक हजार अंकांनी घसरून, बाजारमूल्य पाच कोटी रुपयांनी कमी झाले आहे. निर्देशांक अर्थसंकल्पाआधीच्या २४२ दिवसांत म्हणजे आठ महिन्यांत पाच हजार अंकांनी वाढला; पण अर्थसंकल्पानंतर एका दिवसात एक हजार अंकांनी कोसळला. कित्येक चांगले शेअर्स पाच ते दहा टक्क्यांनी घसरले. त्यामुळे लोकांनी घाबरून विक्रीही करायला सुरुवात केली आहे; पण या समुद्रात ओहोटीच्या वेळीच शिरायचे असते. इथे भाव वर जाऊ लागले, की लोक खरेदी करतात. कारण ते आणखी वर जातील हा ‘लोभ’ असतो. याउलट भाव कमी झाले, की ते आणखी कमी होतील ही भीती असते. म्हणून गुंतवणूकदार विक्री करतात. लोभ व भीती हे शेअर बाजाराचे स्थायी भाव आहेत. त्यावर ‘या निशा सर्व भूतानी, तस्यां जागर्ति संयमी’ हे लक्षात ठेवून वागायचे असते. भाव आणखी कमी होतील म्हणून थांबू नये, तर खरेदी सुरू करावी. कारण कमी भावात खरेदी व उच्च काळात विक्री हे कुणालाही जमत नाही. 

या अर्थसंकल्पात कृषी, दूध व ग्रामीण क्षेत्रावर भर दिल्याने अवंती फीड्स, कावेरी सीड्स हे शेअर्स वर जातील. दूध व अन्नप्रक्रिया क्षेत्राला उत्तेजन दिल्याने ज्युबिलंट फूड्स, प्रभात डेअरी, हेरिटेज फूड्स, मनपसंद हे शेअर्स गुंतवणूकयोग्य आहेत. ‘सागरमाला’साठी ऑप्टिकल फायबर्स पुरवू शकणाऱ्या स्टरलाइट टेक्नॉलॉजी व विंध्या टेलिलिंक्स या कंपन्यांचे शेअर्स उत्तम आहेत. पाच हजार १०० कोटी रुपये खर्चून ५० लाख घरे बांधली जाणार आहेत. म्हणून दिवाण हाउसिंग फायनान्स, इंडियाबुल्स फायनान्स, पीएनजी हाउसिंग व कॅनफिन होम्समध्ये गुंतवणूक करावी. केपीआयटी, फिलिप्स कार्बन, थिरुमलाई केमिकल्स, जिंदाल सॉ पाइप्स (हिस्सार), जिंदाल स्टील अँड पॉवर (JSPL), अपोलो पाइप्स, एपीएल अपोलो हेही उत्तम नफा देऊन जातील. तसेच आयर्न पेलेट्स करणाऱ्या ‘गोदावरी पॉवर अँड स्टील’चे शेअर्स ५०० रुपयाला खरेदी केले, तर वर्षभरात ४० टक्के नफा मिळेल; मात्र सर्व शेअर्स ऑगस्टनंतरच वाढतील हे लक्षात घ्यावे. 


- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link