Next
वर्धा, वाशिम, यवतमाळ
BOI
Wednesday, May 02 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सेवाग्राम
वर्धा, वाशिम, यवतमाळ हे तिन्ही जिल्हे म्हणजे विदर्भातील स्वतंत्र ओळख असलेले जिल्हे आहेत. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात या जिल्ह्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेऊ या.
..........
वर्धावर्धा शहराच्या ईशान्येस आठ किलोमीटरवर पवनार येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्वीय विभागाने १९६७मध्ये उत्खनन केले. त्यात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे काही अवशेष मिळाले. येथील लोक दगडाच्या हत्यारांबरोबरच काही प्रमाणात तांब्याची हत्यारे वापरत असावेत आणि त्यांची वस्ती प्रामुख्याने नदीकाठी लहान खेड्यांतून असावी, असे त्यावरून दिसून येते. तथापि वर्धा नदीचा उल्लेख इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात आढळतो. विदर्भाचा राजा बेरारच्या संबंधाने हा वर्धा नदीचा उल्लेख आढळतो. विदर्भ (बेरार) प्रदेश वर्धा नदीने विभागला जाऊन बेरार आणि त्याचा भाऊ माधवनसेन यांच्यात वाटला गेला.

वर्धा आणि उर्वरित बेरार प्रांतात चालुक्य राजपूत घराण्याने इ. स. ५५० ते ७५०मध्ये राज्यवर्धा या नदीच्या नावावरूनच ‘पालकवाडी’ या छोट्या गावापासून विकसित झालेल्या भागाला ‘वर्धा’ हे नाव देण्यात आले. या जिल्ह्याच्या परिसरावर मौर्य, शुंग, सातवाहन, वाकारम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव व गोंड या राजवटींची सत्ता असल्याचे उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजांत सापडतात. १८२२मध्ये भोसल्यांद्वारे वर्धा नागपूरमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्याचबरोबर गवळीगड आणि नरनाळा हे किल्ले व काही भूभाग निजामाच्या ताब्यात देण्यात आले. ब्रिटिशांच्या काळात १८६२पर्यंत वर्धा हा नागपूरचाच एक भाग होता. प्रशासकीय कारणांसाठी वर्धा जिल्हा वेगळा करण्यात आला. पुलगावजवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले; पण नंतर १८६६मध्ये वर्धा हे पालकवाडीजवळ वसविण्यात आले. जिल्ह्याला वर्धा हे नाव वर्धा नदीवरून देण्यात आले. जिल्ह्यातील माती मुख्यतः काळी कपाशीची आहे. आर्वी व हिंगणी परिसरात उत्तम दर्जाच्या सागवानाची वने आढळतात. येथील जंगलात धावडा, सालई, तेंदू, मोवई या वनस्पतींचे प्रमाण जास्त असून, त्यांशिवाय ऐन, वेल, कळंब, पळस, मोह, बेहडा इत्यादी वनस्पतींबरोबरच कुरूड, घोनळ, मुशाम, मारवेल, शेळा (शेंडा) इत्यादी प्रकारचे गवतही आढळते. येथील वनोत्पादनांमध्ये मुख्यत्वे साग, इमारती व जळाऊ लाकूड, बांबू, गवत, बिडी पत्ता, डिंक इत्यादींचा समावेश असतो. वनांच्या वाढीसाठी जिल्ह्यात अनेक वनविकास योजना राबविल्या जात आहेत.

वर्धा शहर : स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधींचे सेवाग्राम येथे वास्तव्य होते. त्यामुळे वर्धा हा एक केंद्रबिंदू झाला. मुंबई-कोलकाता व दिल्ली-चेन्नई या मार्गावरील हे प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. वर्धा हे सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी नावाजलेले ठिकाण आहे.

राष्ट्रभाषा समिती : या राष्ट्रीय स्तरावरील हिंदी शिक्षण संस्थेचे मुख्यालय वर्धा येथे आहे. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते या संस्थेची स्थापना सन १९३६मध्ये करण्यात आली.

गीताई मंदिरगीताई मंदिर :
आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या आईच्या इच्छेनुसार गीतेच्या ७०० ओव्यांचे मराठीत भाषांतर केले व १९३२मध्ये ते पहिल्यांदा पुस्तकरूपात ‘गीताई’ या नावाने प्रसिद्ध केले. त्याच गीतेवरून प्रेरणा घेऊन कमलनयन बजाज यांनी २७ एकर जागेवर गीताई मंदिरची उभारणी केली. सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान यांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले होते. आचार्य विनोबा भावे यांनी १९८०मध्ये याचे उद्घाटन केले. या मंदिरात कोठेही मूर्ती नाही, तसेच यावर छतही नाही. १८ उभ्या दगडांच्या फरशीवर गीतेतील वचने लिहिण्यात आली आहेत. हे शिल्प गाय आणि चरखा या दोन्ही चिन्हांवर आधारित आहे.

बौद्ध स्तूप, वर्धाबौद्ध स्तूप, वर्धा : हा स्तूप गीताई मंदिराजवळच बांधला असून, १९९३मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. जपानचे फुजी गुरुजी यांचे येथे स्तूप उभारण्याचे स्वप्न होते. महात्मा गांधी त्यांना फुजी गुरुजी असे प्रेमाने म्हणत. या स्तूपामध्ये चारही दिशांना बुद्ध मूर्ती आहेत.


मगनवाडी संग्रहालय : साबरमतीहून वर्धा येथे आल्यावर महात्मा गांधी येथे वास्तव्यास होते. मगनवाडी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे निवासस्थान होते. तेथे सरहद्द गांधी वगैरे नेते मुक्काम करत असत. तेथे जुनी फोर्ड गाडी ठेवलेली आहे. त्या वेळच्या नेत्यांच्या प्रवासासाठी या गाडीला बैल जोडून वापर केला जाई. सरदार पटेल या गाडीला थट्टेने ऑक्स-फोर्ड असे म्हणत. महात्मा गांधींना देश स्वयंपूर्ण बनवायचा होता व त्यासाठी ग्रामोद्योगांचा विकास केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्याला अनुसरून हातमाग, सूतकताई इत्यादी गोष्टींना त्यांनी चालना दिली. देश आर्थिक गुलामगिरीत नसावा, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यातूनच मगनवाडीमध्ये ग्रामोद्योग संग्रहालय उभारण्यात आले. गांधीजी वापरत असलेल्या अनेक वस्तू या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. या वस्तूंमधून गांधीजींच्या वेगळ्या स्वरूपाचे दर्शन घडते. यातल्या बहुतेक वस्तू गांधीजींना भेट मिळालेल्या आहेत. यामध्ये अतिशय सुंदर व बारीक कलाकुसर केलेली लाकडाची थाळी, पानपुडा, फोटोफ्रेम, पाण्याचा कमंडलू, कलाकुसर केलेले लाकडाचे सुंदर बॉक्स आहेत. ताडाच्या पानावर बंगाली भाषेत लिहिलेली गांधीजींची आत्मकथा, वेगवेगळे शंख, बुद्धाची प्रतिमा, काठी, बापूंना दक्षिण आफ्रिकेत मे १९२४मध्ये देण्यात आलेली चामड्याची पेटी (नेटाल), बापूंची हस्तलिखिते, गांधीजी तुरुंगात असताना त्यांनी वापरलेले चमचे, चाकू, ते वापरत असलेला सर्वांत लहान तकली चरखा, जपमाला अशा अनेक वस्तू एका प्रवासासारख्या भासतात.

लक्ष्मीनारायण मंदिरलक्ष्मीनारायण मंदिर :
हे वर्ध्यातील एक सुंदर मंदिर आहे. शेठ जमनालाल बजाज यांनी हरिजनांसाठी हे मंदिर १९२८मध्ये बांधले. या ट्रस्टमार्फत औषधालय, तसेच एक वाचनालयही चालविले जाते. संस्कृतमधील अनेक ग्रंथ, उपनिषदे, वेद व भागवत यावरील ग्रंथ येथे उपलब्ध आहेत.

बोर अभयारण्य : हिंगणी येथे ६१.१० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे. या अभयारण्यात वाघ, रानगवे, नीलगायी, चितळ, सांबर, मोर पाहायला मिळतात.

धम्म शिबीर, बोर : ह्युआन त्संग बौद्ध विहार तैवान आणि इंग्लंडमधील बौद्ध संस्थांच्या साहाय्यातून सेलूजवळील बोर धरण परिसरात उभारण्यात आला आहे. भारतातील व परदेशातील उपासक मोठ्या संख्येने येथे येतात. अत्यंत रमणीय असे हे ठिकाण आहे. बुद्धाच्या अनेक भावमुद्रा येथील मूर्तीवर पाहायला मिळतात.

गायिका वैशाली भैसने-माडेहिंगणघाट : ‘सारेगमप’ या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेली गायिका वैशाली भैसने-माडे हिचे हे जन्मगाव. हिंगणगाव वर्धा शहराच्या दक्षिणेस ३३.५ किलोमीटरवर असून, पूर्वीपासून कापूस उत्पादक प्रदेशातील शहर म्हणून ओळखले जाते. पूर्वी येथील बनी जातीचा कापूस लँकाशरला पाठविला जात असे. येथे नागपूरच्या राजे भोसले यांनी आईच्या स्मरणार्थ उभारलेले सुंदर शिल्पकाम केलेले मल्हारी-मार्तंडाचे जुने मंदिर आहे. दादोबा बोरकर यांनी त्याचा दाजीर्णोद्धार केला.  विदर्भातील जैन मंदिरांपैकी महत्त्वाचे धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले बन्सीलाल कोचर यांनी जीर्णोद्धार केलेले येथील जैन मंदिर, सुंदर बागा आणि काचकाम यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. संत गाडगे महाराजांच्या स्मरणार्थ मार्गशीर्ष महिन्यामध्ये येथे मोठी यात्रा भरते. शहरात दोन दर्गे व तीन मशिदी असून, येथे मोठा उरूसही भरतो.

आर्वी : हे ‘संतांची आर्वी’ म्हणून प्रसिद्ध असलेले शहर वर्ध्याच्या वायव्येस ५५ किलोमीटरवर असून, कापसाची बाजारपेठ म्हणून विख्यात आहे. राष्ट्रीय चळवळीत या शहराचा मोठा वाटा होता. शहरात राम, कृष्ण, लक्ष्मीनारायण यांची सुंदर मंदिरे असून संत मायबाईचा मठ आहे. आष्टी हे वर्ध्याच्या उत्तरेला ७९ किलोमीटरवर असून, पीर वजित या मुसलमान अवलियाची येथील कबर प्रसिद्ध आहे. दर वर्षी तेथे मोठा उरूस भरतो. हिंदूही याचे भक्त आहेत. छोडो भारत आंदोलनात या गावात मोठी रणधुमाळी झाली होती.

पवनारपवनार : हे पुरातन गाव वर्ध्याच्या ईशान्येस नऊ किलोमीटरवर धाम नदीकाठी वसलेले असून, वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याची प्रवरपूर राजधानी हीच असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. रोमन साम्राज्याशी पवनारचे (प्रवरपूरचे) व्यापारी संबंध असावेत, असे म्हटले जाते. तेथे अनेक पुरातत्त्वीय उत्खनने झाली आहेत. १९३७पासून मात्र हे प्रेरणास्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आचार्य विनोबाजींनी स्थापन केलेला ‘परमधाम आश्रम’ (पूर्वीचा जमनालाल बजाज यांचा लाल बंगला), महात्मा गांधीस्तंभ व छत्री ही येथील महत्त्वाची स्थाने आहेत.

सेवाग्राम : वर्ध्यापासून पाच किलोमीटरवर असलेले हे गाव महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुण्यस्थळ बनले. येथील आदिनिवास, बापू व बा कुटी, आखरी निवास, महादेव कुटी ही पर्यटकांची प्रमुख श्रद्धास्थळे व आकर्षणे आहेत. या शहरांशिवाय अलीपूरचे संत वली यांची कबर, आंजीचा किल्ला, देवळी येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत.

सेवाग्रामढगा : जंगलव्याप्त प्रदेशातील निसर्गसुंदर ढगा हे गाव व तेथील स्वयंभू महादेव मंदिर, हिंदू-मुस्लिमांना पवित्र असलेली गिरडमधील ख्वाजा फरीद बाबांची समाधी, पारडीचे मुरलीधर मंदिर प्रसिद्ध आहे.

गारपीट :
हे रम्य वनग्राम आहे. तेथील वन्य पशू-पक्ष्यांचे अभयारण्य, बोरीचे धरण व अभयारण्य ही जिल्ह्यातील प्रमुख आकर्षणे आहेत.

टाकळखेडा  : लहानूजी महाराज यांचे वास्तव्याने पवित्र झालेले ठिकाण.

आष्टी : हे स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भारत छोडो आंदोलनात येथील अनेक कार्यकर्त्यांनी येथे बलिदान दिले. येथे नागपंचमीचा उत्सव मोठा असतो.

कोटेश्वर : देवडी तालुक्यात वर्ध्यापासून ४० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून, रामायण काळात वसिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केला होता असे मानले जाते. या ठिकाणी शंकराचे हेमाडपंती देवालय आहे.

इतिहासाचा वारसा सांगणारा वाशिम जिल्हा :

बालाजी मंदिरसातवाहन राजांची राजधानी म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. तिसऱ्या शतकापासून सातवाहन घराण्याची राजधानी येथे होती. वाशिमला पूर्वी वत्सगुल्म/वात्सुलग्राम असे संबोधले जाई. त्याचे नंतर बच्छोम, बासम व नंतर वाशिम झाले. वाकाटक राजांनीही येथे राज्य केले. इ. स. पूर्व ३००पासून येथे सातवाहन या राजवंशाची सत्ता होती. प्राचीन विदर्भात प्रशासकीय सोयीसाठी दोन ठिकाणी राजधान्या करण्यात आल्या. एक म्हणजे वाशिम व दुसरे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील नंदीवर्धन (सध्याचे नगरधन). वाशिम येथे वाकाटकांची राजधानी होती. त्या वेळी लोकांना साहित्याची आवड होती. वाशिमच्या इतिहासात वाकाटक राजा प्रवरसेन याचा मुलगा सर्वसेन याने वाशिम हे राजधानीचे गाव केल्याचा उल्लेख आढळतो. राजशेखर यांच्या ‘काव्यमीमांसा’मध्ये याचा उल्लेख सापडतो. वाशिमचा महाभारतात, तसेच कामसूत्रामध्येही याचा उल्लेख दिसून येतो. पूर्वी निजामाची टाकसाळ येथे होती. इंग्रजांनी ताबा घेतल्यावर वाशिम जिल्हा करण्यात आले. परंतु १९०५ सालच्या पुनर्रचनेत हा भाग अकोला जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. २६ जानेवारी १९९८ रोजी पुन्हा वाशिम हा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

बालाजी मंदिर :
बाजी भोसले यांचे दिवाण भवानी कळू यांनी बालाजी मंदिराचे बांधकाम केले असे म्हणतात. औरंगजेबाच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी बालाजीची मूर्ती दडवून ठेवण्यात आली होती.

बालाजी तलावबालाजी तलाव : बालाजी मंदिराला लागूनच हा तलाव घडीव दगडामध्ये बांधलेला आहे. आसपास सुंदर वृक्षही आहेत. गणपती विसर्जनामुळे यात होणारे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. पद्मतीर्थ नावाचे तीर्थस्थानही येथे आहे

रिसोड :
रिसोड हे एक ऐतिहासिक शहर आहे. ऋषिवट हे रिसोडचे मूळ नाव आहे. रंगारी लोकांचे शहर म्हणून सुद्धा रिसोडची ख्याती होती. रामायणातील दंडकारण्यात हा भाग असावा, असे समजतात. येथे महादेवाची मंदिरे होती. एके काळी हे तलावांचे गाव म्हणून म्हणून ओळखले जाई. असे म्हणतात, की रिसोड परिसरात पुराणकाळी वडाची असंख्य झाडे होती. तिथे ऋषिमुनी तपस्या करत असत. संतांची भूमी म्हणून रिसोडची ख्याती पूर्वीपासून आहे. अजूनही या परिसरात उत्खननात महादेवाच्या पिंडी सापडतात. आता पिंगलाक्षी तलाव शिल्लक आहे. येथे कापूस व शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे. तसेच अमरदासबाबा मंदिर, गंगा माँ उद्यान, श्री सिद्धेश्वर मंदिर ही ठिकाणेही पर्यटक व भाविकांची आवडीची ठिकाणे आहेत.

कारंजा लाड : स्कंद पुराणात उल्लेख असलेले हे गाव आहे. करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. दत्तसंप्रदायातील दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांचे जन्मठिकाण म्हणून ते ओळखले जाते. सन १३७८ ते १४५८ या काळामध्ये ते होऊन गेले. सांगलीजवळील नरसोबाची वाडी, विजापूरजवळील गाणगापूर येथेही त्यांचे वास्तव्य होते. करंजपूरचे कार्यरंजकपूर आणि नंतर कारंजा असे नाव झाले. पूर्वी बांधलेल्या वेशी (प्रवेशद्वारे) हे गावाचे वैशिष्ट्य. दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या वेशी कारंजाचे ऐतिहासिक महत्त्व पटवून देतात. अद्यापही काही जुन्या हवेल्या, तळघरे, जिने विहिरी, भुयारी वाटा अस्तित्वात आहेत. आहेत. हे जैनधर्मीयांचे तीर्थक्षेत्र समजले जाते. जैन धर्मविषयक मूळ हस्तलिखिते येथे जतन करून ठेवण्यात आली आहेत. स्वातंत्र्यलढ्यात या गावातील लोकांचा मोठा सहभाग होता. स्वयंचलित सूतगिरणी कापूस पणन महासंघ, अॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, हँडमेड कागदाचे कारखाने या ठिकाणी आहेत.

शिरपूर :
अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर येथील काळ्या पाषाणातील मूर्ती विहिरीत लपवून ठेवण्यात आली होती. तिचे मंदिर येथे आहे.

अनसिंग : एक शिंगी या शब्दाचा अपभ्रंश होऊन पुढे या गावास अनसिंग असे नाव पडले. रामायणकालीन पौराणिक कथा असे सांगते, की विभांडक यांचा मृग-पुत्र श्रुंगऋषी यांस एक शिंग होते. त्याला पिता विभांडक याने विश्वापासून दूर ठेवून सर्व शिक्षण दिले. श्रुंगऋषींनी केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञामुळे राजा दशरथ यांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी पुत्ररत्न प्राप्ती झाली असे मानले जाते.

यवतमाळ जिल्हा : या जिल्ह्यात हातविणकाम (हँडलूम), विडी, कागद, साखर, जिनिंग-स्पिनिंग व तेल उद्योग असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची पिके कापूस, ज्वारी, भुईमूग, तूर ही आहेत. जिल्ह्याला कापूस, लाकूड, चुनखडी, कोळसा व संत्री या वस्तूंद्वारे महसूल मिळतो. जिल्ह्यात विपुल प्रमाणात वनसंपत्ती आहे. तेथून लाकूड, बांबू, तेंदू, आपटा, हिरडा व मोह या उपयोगी वस्तू मिळतात. यवतमाळ, पुसद, वणी, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, उमरखेड, दारव्हा व नेर ही महत्त्वाची व्यापार केंद्रे आहेत. हा जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले, ते म्हणजे वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक. तसेच विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे यवतमाळ हे जन्म ठिकाण.

पुसद : ही वसंतराव नाईक यांची कर्मभूमी. त्यांचा जन्म माहुली गावी झाला. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीस सुरवात केली. सलग १२ वर्षे ते राज्याचे मुख्यमंत्री होते. १९७१च्या सुमारास पडलेल्या भीषण दुष्काळात रोजगार हमी योजनेद्वारे त्यांनी अनेक पाझर तलावांची कामे केली.

दारव्हा :
हे स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख गाव आहे. येथे गोळीबार चौक असून, सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी गोळीबार केला होता. येथील गणेश मंदिर श्रीकृष्णाने बांधले आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. येथे मल्लिकार्जुन व अंबादेवीचे मोठे मंदिर आहे. सातारच्या महाराजांचे विश्वासू सेवक रंगो बापूजी गुप्ते अज्ञातवासात येथे राहिले होते. येथे जिनिंग मिल्स आहेत. हे ठिकाण यवतमाळपासून ४० किलोमीटरवर आहे.

इसापूरइसापूर अभयारण्य : इसापूर धरण परिसराला पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने फिरविला असून, आता त्या ठिकाणी वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली जाणार आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. पुसद तालुक्यातील इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प आहे.

टिपेश्वर अभयारण्यटिपेश्वर अभयारण्य : १४८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. हरणे, बिबटे, अस्वले असे अनेक प्राणी येथे पाहायला मिळतात.

कोपेश्वर : येथे गरम पाण्याचा झरा आहे. हे ठिकाण आर्वीपासून २५ किलोमीटरवर आहे.

कुंभारकिणी : दारव्हाजवळील सहलीचे निसर्गरम्य ठिकाण.

नेर : येथे गुरांचा मोठा बाजार भरतो.

घाटंजी :
‘कॉटन सिटी’ या नावाने ओळखले जाणारे घाटंजी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातील एक फार जुने शहर आहे. अत्यंत चांगल्या दर्जाच्या कापसासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. घाटंजी हे शहर ‘घाटी’ व ‘अंजी’ या दोन्ही गावांच्या मध्ये असल्यामुळे या शहराचे नाव घाटंजी पडले आहे. येथे वाघाडी नदीच्या काठावर असलेले ब्रह्मलीन संत श्री मारोती महाराज यांचे देवस्थान आहे. या गावाला लागूनच असलेल्या अंजी गावात ऐतिहासिक हेमाडपंती शैलीतील अत्यंत प्राचीन व भव्य श्री नृसिंहाचे पाषाण कलाकृती असलेले मंदिर आहे. महाराष्ट्रातूनच नाही, तर आंध्र प्रदेशातूनही लाखो भाविक येथे येतात.

चिंतामणी मंदिरकळंब : कपास संशोधन केंद्र येथे आहे. येथील चिंतामणी मंदिर प्रसिद्ध असून, हे ठिकाण यवतमाळपासून २२ किलोमीटरवर आहे.

वाशिम नागपूरपासून २८२ किलोमीटरवर आहे. वर्धा नागपूर अंतर ७६ किलोमीटर आहे. यवतमाळ हे रेल्वे व रस्त्याने नागपूर, अकोला, वर्धा या ठिकाणी जोडलेले आहे, ते नागपूरपासून १५० किलोमीटरवर आहे. तेथे राहण्याची व्यवस्था आहे. या भागात हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. तेथे जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी चांगला असतो.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

गीताई मंदिर

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री चारेकर About 258 Days ago
खूप छान सविस्तर माहिती मिळाली बरेच नवीन ठिकाणे कळाली
0
0
अविनाश अशिरगडे.. About 259 Days ago
छान माहीती.. सहज भटकंती नी कामानिमीत्ताने,हे तिनही जिल्हे मी पिंजून काढले आहेत...वाचताना काही नवीन संदर्भ कळले..धन्यवाद.
0
0
Shripad phatak About 259 Days ago
Very nice,minute info.of geetai,vardha ashram and old,ancient events.
0
0
Satish Chaugule About 260 Days ago
खूप सुंदर माहिती
0
0
Milind Lad About 260 Days ago
Splendid article. Vivid information. Great efforts Madhavji.
0
0
SAGAR RANADE About 260 Days ago
Beutiful Information.. Instigated Me to Tour to Wardha &Yeotmal.
1
0
Anand G Mayekar About 260 Days ago
Apratim Mahiti.
1
0
Babar Parashuram About 260 Days ago
Excellent and very beautiful pictures
1
0

Select Language
Share Link