Next
रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
BOI
Monday, January 14, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले रत्नागिरीतील शिरगाव येथील  मत्स्य महाविद्यालय व दापोलीतील इंटर डिसिप्लीनरी सोसायटी फॉर अॅग्रीकल्चर सायन्सेस अॅंड टेक्नॉलॉजी (ISASaT) यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य महाविद्यालयात ‘शाश्वत मासेमारी आणि मत्स्य संवर्धन विकास : आव्हाने आणि संधी’ या विषयावर १७ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन १७ जानेवारीला सकाळी १० वाजता होईल.

या परिषदेत मत्स्य व्यवसाय, मत्स्य संवर्धन, मत्स्य जीवशास्त्र, पर्यावरण शास्त्र, जैव विविधता, पोषण आणि खाद्य, शाश्वत संवर्धन, आरोग्य आणि पर्यावरण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसायातील विस्तार आणि क्षमता बांधणी, मत्स्य व्यवसाय प्रशासन आणि धोरण आदी विषयांवरील विविध सत्रांत सखोल चर्चा होणार आहे.

या परिषदेसाठी ऑस्ट्रेलिया, स्पेन, व्हियतनाम, थायलंड या देशांबरोबर भारतातील नामवंत मत्स्य शास्त्रज्ञ विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. त्याचबरोबर मत्स्यशास्त्र या विषयात संशोधन करीत असलेले जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ, संशोधक विविध विषयांतील शोधनिंबध या परिषदेत सादर करणार आहेत. १९ जानेवारीला दोन वाजता या परिषदेतील एका विशेष सत्रात मच्छिमार, मत्स्य संवर्धक आणि मत्स्य उद्योजक आपापल्या क्षेत्रातील अनुभव कथन करून शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरची मत्स्य शास्त्र विषयावरील ही परिषद रत्नागिरीतील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार आहे. या परिषदेतून मत्स्य व्यवसायातील समस्या व संधी यावर सखोल चर्चा होणार आहे.

परिषदेविषयी :
कालावधी :
१७ ते २० जानेवारी २०१९
उद्घाटन : १७ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link