Next
‘ताणतणाव विसरत मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या’
डॉ. सुजाता शेट्टी लिखित पुस्तकाचे डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन
BOI
Monday, July 29, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

डॉ. सुजाता शेट्टी लिखित पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. रघुनाथ माशेलकर डॉ. सुजाता केळकर-शेट्टी आणि लतिका पाडगावकर.

पुणे : ‘ताणतणाव हा आज आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. वयोमान घटण्याबरोबरच, प्रतिकारशक्ती कमी होणे, जीवनसत्त्वाचे सेवन करूनही त्यांचा शरीरावर परिणाम न होणे यांसारख्या लक्षणांपासून वयाच्या सत्तरीत भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न हे वयाच्या चाळीशीत समोर येणे अशा अनेक गोष्टी संशोधनामधून पुढे आल्या आहेत. त्यामुळे ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सुदृढ जीवनपद्धतीचा अवलंब करीत शरीर, मन व आत्मा यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या,’ असा सल्ला वेलनेस लाइफ कोच व वेलनेस कन्सल्टंट डॉ. सुजाता केळकर–शेट्टी यांनी दिला.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे डॉ. शेट्टी लिखित ‘९९ नॉट आउट! युवर गाइड टू अ लाँग अॅंड हेल्दी लाइफ’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील बजाज आर्ट गॅलरी येथे झाला. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या कार्यक्रम समिती सदस्या लतिका पाडगांवकर यांनी या वेळी डॉ. शेट्टी यांची मुलाखत घेतली. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.

वय वाढणे आणि मृत्यू या गोष्टी आपल्या आयुष्यात अटळ असल्या, तरीही निरोगी आयुष्य जगायचे असेल तर मन, शरीर आणि आत्मा यांचे स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेत ‘९९ नॉट आउट! युवर गाइड टू अ लाँग अॅंड हेल्दी लाइफ’ या पुस्तकात यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला करता येईल यावर उहापोह करण्यात आला आहे. लेखिका या स्वत: वेलनेस लाइफ कोच व वेलनेस कन्सल्टंट असून, सुदृढ आरोग्यासाठी आयुर्वेद, योग आणि उपाय पद्धती याविषयीची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली आहे.


मानसिक आरोग्यावर बोलताना डॉ. शेट्टी म्हणाल्या, ‘आज आपल्या धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. इतकेच नाही वय वाढण्याची प्रक्रियादेखील लवकर होत आहे. वय वाढणे याकडे ‘स्टेरिओटाइप’ म्हणून न पाहता सकारात्मकरीत्या पाहिले पाहिजे. याबरोबरच मन, शरीर आणि आत्मा यांचे स्वास्थ्य जपण्यावरदेखील भर दिला पाहिजे. मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी योग पद्धतीत सांगितलेल्या पाच श्वसन पद्धतींचा अवलंब केल्यास त्याचा शरीराला निश्चित फायदा होऊ शकतो.’

‘आज मानसिक आरोग्य व एकटेपणा हा आपल्याला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे. वाढत्या वयाबरोबर येणा-या एकटेपणाच्या समस्येबरोबर वयाच्या पंचवीशीत येणारा एकटेपणा हीदेखील एक समस्या बनत चालली आहे. कॅनडा, ब्रिटन या ठिकाणी या प्रश्नांवर काम करण्यासाठी वेगळी मंत्रालये आहेत; मात्र आपल्याकडे सार्वजनिक आरोग्यावर तितकासा खर्च केला जात नाही ही निराशाजनक बाब आहे,’ अशी खंत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केली.       

मन शरीर आणि आत्मा यांचे आरोग्य राखायचे असेल, तर त्यावर तुमचे स्वत:चे नियंत्रण असायला हवे इतकेच नाही, तर हे नियंत्रण खुल्या मनाने स्वीकारायला हवे. हास्य ही त्याची गुरुकिल्ली असून, आशावादी असणे हे आरोग्यासाठी चांगले आहे, त्याचा अवलंब करण्याचे आवाहन डॉ. माशेलकर यांनी केले.    

लिसा पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. प्रशांत गिरबने यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search