Next
मुलांच्या कलाने घ्या..
BOI
Saturday, September 22, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


बदल हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक टप्प्यावर बदलांना सामोरं जातच पूढे जाण्यात खरी मजा असते. परंतु हे बदल मुलांच्या बाबतीतले असतील, तर ते जरा त्यांच्या कलाने घेणं आवश्यक असतं अन्यथा मुलांची वैचारिक फरफट होऊ शकते... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या बदलासंबंधीच्या मानसिकतेबद्दल...
..............................
४०-४५ वर्षांच्या सीमा ताई एक दिवस भेटायला आल्या. आल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि कुटुंबाचीही. सीमा ताई, त्यांचे पती, एक मुलगा आणि एक मुलगी, असं त्यांचं छान चौकोनी कुटुंब. सीमा ताई गृहिणीच होत्या. त्या खरं तर एम. एस्सीपर्यंत शिकलेल्या, परंतु नवऱ्याला कामानिमित्त सतत बाहेरगावी राहावं लागत असल्यानं त्यांनी स्वेच्छेने पूर्ण वेळ घराची आणि मुलांची जबाबदारी सांभाळायचं ठरवलं. यामुळे ओघानंच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्या पतीकडे, तर कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर अशा कामाच्या वाटण्याच होऊन गेल्या. 

साधारण वर्षभरापूर्वीपर्यंत हे सगळं छान चाललं होतं. आर्थिक परिस्थिती छान होती, वडील जेव्हा जेव्हा घरी असायचे, तेव्हा मुलांना वेळ द्यायचे. सगळे मिळून खूप धमाल करायचे. परंतु मागच्याच वर्षी तब्येतीच्या काही कारणांनी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि एका जागी बसून करता येईल, अशी नोकरी शोधायची, असं ठरवलं. परंतु बराच काळ गेला, तरी मनासारखी नोकरी मिळेना. यामुळे हळू हळू त्यांचा चिडचिडेपणा वाढला. दिवसभर घरी असल्यानं, वेळ जावा म्हणून ते मुलांशी गप्पा मारायचे, त्यांची चौकशी करायचे, पण वडिलांचं असं अती चौकशी करणं मुलांना आवडेनासं झालं. काही दिवसांपूर्वी बाबा घरी येण्याची आतूरतेनं वाट पाहणारी मुलं आता ते कधी घराच्या बाहेर पडतात याची वाट पाहू लागले. हळू हळू मुलांचीही चिडचिड वाढली. ती वडिलांशी बोलेनाशी झाली. 

या सगळ्याचा परिणाम म्हणून मग वडिलांना दारूचं व्यसन लागलं. ते हळू हळू वाढत गेलं. खरं तर या सगळ्यामागं नेमकं काय कारण असावं याचा अंदाज सीमा ताईंना लावता येईना. या सगळ्याचा उलगडा होईना म्हणून सीमा ताई भेटायला आल्या होत्या. त्यांच्याकडून ही सगळी परिस्थिती माहित करून घेतल्यावर मुलांना आणि वडिलांना एकदा भेटण्यासाठी आणण्यास सांगितलं. आधी मुलं भेटून गेली आणि नंतर त्यांचे वडील. मुलांनी प्रामाणिकपणे आधीच्या आणि आत्ताच्या स्थितीचं वर्णन केलं. त्यानंतर भेटायला आलेल्या वडिलांनी मात्र या सगळ्या निर्णयांमागची त्यांची भूमिका मांडली. 

नोकरीनिमित्त १०-१२ वर्षं आपण बाहेर असताना पत्नीनं म्हणजेच सीमा ताईंनी घर आणि मुलं अगदी व्यवस्थित सांभाळली असं त्यांनी अभिमानानं आणि कौतुकानं सांगितलं. मुलं आता मोठी होत आहेत, तर त्यांना या वयात आईइतकीच वडिलांचीही गरज असते, असा विचार करून आपण फिरती नोकरी सोडून नवीन काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेण्याचं ठरवलं, अशी त्यांची भूमिकाही त्यांनी ठामपणे मांडली. 

या सगळ्यांतून एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. इतके दिवस कधीतरी घरी येणारे बाबा मुलांशी फक्त खेळत होते. आता रोजच घरी असणारे बाबा मुलांची चौकशी करू लागले, त्यांना सतत त्यांच्या कामाबद्दल-अभ्यासाबद्दल विचारू लागले. या बदललेल्या बाबांसोबत जुळवून घेणं मुलांना जरा अवघड होऊ लागलं. याउलट इतके दिवस मुलांच्या सतत सोबत असलेल्या आईशी मुलांची जवळीक होती. घरात आईच असल्यानं कितीतरी गोष्टी केवळ आईच अधिकारवाणीनं ठरवत होती. त्याची मुलांनाही सवय होती. त्यात बाबा काही वेगळं काही करू लागले, की मुलं त्यांना अडवायची. आईही, आजवर मुलांना अशीच सवय आहे, असं वडीलांना सांगत मुलांची पाठराखण करायची यामुळेही वातावरण तापायचं. हळू हळू हे सगळं वाढत गेलं आणि मग घरात कोणीच कोणाशी नीट बोलेनासं झालं. 

हे ऐकल्यावर सीमा ताई आणि त्यांचे पती यांचं एक वेगळं सत्र घेतलं. त्या दोघांनाही या सगळ्यांत मुलांची होणारी वैचारिक फरफट लक्षात आणून दिली. कित्येत वर्षं मुलांना वेगळ्या परिस्थितीची सवय होती, ती अशी एकदम बदलली, तर त्यांना त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागेल आणि तोच वेळ या दोघांनी त्यांना देणं अपेक्षित आहे, असं त्यांना पटवून दिलं. बदल करा, पण तो सावकाश आणि मुलांच्या कलाने घेऊन करावा, हे ही सांगितलं. त्यानुसार पूढे सीमा ताई आणि त्यांचे पती मुलांशी सांगितल्याप्रमाणे जुळवून घेऊ लागले आणि पाहता पाहता त्यांचं चौकोनी कुटुंब पुन्हा बहरलं आणि हसतं-खेळतं झालं.  

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link