Next
‘व्यवसायात ग्राहक हाच सर्वांत महत्त्वाचा’
अतुल किर्लोस्कर यांचे व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना धडे
प्रेस रिलीज
Monday, April 22, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this article:

नेहा अगरवाल या विद्यार्थिनीला सुवर्णपदकाने गौरविताना अतुल किर्लोस्कर.

पुणे : ‘व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायाची काही काळाने सवय होते आणि आपल्या कामाबद्दल स्व-समाधानाची भावना बाळगण्यातच धन्यता वाटू लागते; परंतु कोणताही व्यवसाय हा ग्राहकासाठी असतो. त्याचाच हळूहळू विसर पडू लागतो. त्यामुळे आपण सातत्याने ग्राहकासाठीच काम करतो आहोत ना, याची खातरजमा प्रत्येक व्यावसायिकाने करायला हवी,’ असे मत प्रसिद्ध उद्योजक आणि ‘किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीज’च्या (केआयएएमएस) नियामक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.

‘केआयएएमएस’च्या पदवीप्रदान समारंभात आज १७८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यात संस्थेच्या पुणे आणि हरिहर (कर्नाटक) या दोन्ही ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. पुण्याजवळ धामणे येथे असलेल्या ‘केआयएएमएस’च्या संकुलात हा समारंभ पार पडला.

‘किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.’चे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी आर. आर. देशपांडे आणि हार्बिंजर समूहाचे संस्थापक व प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. विकास जोशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ‘केआयएएमएस’चे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, संस्थेचे पुणे येथील संचालक डॉ. अमित सिन्हा, हरिहर येथील संचालक डॉ. व्ही. एस. पै या वेळी उपस्थित होते.

नेहा अगरवाल (पुणे) आणि अनंत हेगडे (हरिहर) या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावले. मनप्रीत मनोज (पुणे) आणि विपुल लाहोटी (हरिहर) यांना रौप्यपदकाने गौरविण्यात आले. या विजेत्यांबरोबरच विविध विषयांमध्ये सौमेन साहा, उत्षा रे, श्रेया श्रीवास्तव, आकांक्षा अग्निहोत्री आणि सत्या प्रकाश या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गौरविण्यात आले. संस्थेतर्फे माजी विद्यार्थी हितेंद्र रामचंद्रन आणि श्रीशैल देशनुर यांना ‘डिस्टिंग्विश्ड अलुम्नाय’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माणसाचे खरे शिक्षण प्रत्यक्ष व्यवसायात पडल्यावर सुरू होते, असे सांगून किर्लोस्कर म्हणाले, ‘रूढ शिक्षण संपल्यावरही प्रत्येक व्यावसायिकाकडे नवे शिकण्यासाठीची उत्सुकता जागृत असायला हवी. कोणताही निर्णय घेताना इतरांची मते विचारात घ्या. मतमतांतरे जाणून घेतल्यामुळे निर्णय घेण्यासाठी फायदाच होतो.’

आर. आर. देशपांडे आणि विकास जोशी यांनीही अनुभवकथन केले. देशपांडे म्हणाले, ‘तुम्ही नोकरी देणारे असा किंवा नोकरी करणारे असा, इतरांबद्दल आदर बाळगणे फार महत्त्वाचे आहे. रुढ अर्थाने यश संपादन केल्यानंतरही स्वतःबद्दल समाधानी होऊन निर्धास्त राहू नका. सुधारणा व विकासाची प्रक्रिया ही सातत्याने चालू राहायला हवी.’ जोशी यांनी ‘नेटवर्किंग कॅपिटल’ अर्थात आजूबाजूच्या व्यक्तींशी विचारविनिमयातून व्यवसायास कसा फायदा होऊ शकतो, याबद्दलचे काही अनुभव विषद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search