Next
‘देवी-दर्शना’चा अविस्मरणीय योग!
BOI
Wednesday, March 07 | 02:49 PM
15 0 0
Share this story

प्रा. डॉ. गणेश देवीभाषाशास्त्रात केवळ देशातच नव्हे, तर परदेशांतही प्रसिद्ध असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. गणेश देवी. देवरुख (जि. रत्नागिरी) येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आणि ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ. सुरेश जोशी यांना अलीकडेच डॉ. देवी यांच्या भेटीचा योग आला. त्या भेटीतून घडलेल्या डॉ. देवी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाबद्दल डॉ. जोशी यांनी लिहिलेला हा लेख... 
.........
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी २०१८ च्या सायंकाळी, आम्ही चार बंधू अत्यंत भावविभोर होऊन आमच्या खेडेगावातील (निलजी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) घराच्या अंगणात गप्पामग्न झालो होतो. गप्पांचा विषय होता ‘डॉ. प्रा. गणेश देवी यांचे आम्हाला भावलेले व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य.’ कारण त्या दिवशी आम्ही धारवाड शहरात (कर्नाटक) जाऊन डॉ. देवींना भेटून आलो होतो. ही पूर्वनियोजित भेट सुमारे दोन तासांची होती. त्या भेटीतील प्रत्येक मिनिट अन् मिनिट त्याचं गंभीर, विचारसंपृक्त बोलणं ऐकण्यात संपलेलं होतं. आम्ही तृप्त झालो होतो. खूप खूप दिवसांनी असं व्यक्तिदर्शन आणि असं विचारदर्शन घडलं होतं विद्येच्या क्षेत्रात आणि सामाजिक विधायक कार्यात सदा मग्न असलेलं असं प्रगल्भ व्यक्तिमत्त्व साक्षात अनुभवुन आम्ही चौघं भारावून गेलो होतो. परतीच्या प्रवासात आणि संध्याकाळी अंगणात आमच्या गप्पांचा विषय एकच होता - गणेश देवींची जीवनदृष्टी आणि त्याचं जगणं! असं त्यांचं थोरपण लक्षात घ्यावं, अशी त्यांची कोणती कामगिरी आहे? या थोर व्यक्तीला भेटावं , त्यांची ओळख करून द्यावी, हे कसं काय ठरलं?

डॉ. गणेश देवी हे नाव इंग्रजी वाङ्मयाचे ख्यातनाम प्राध्यापक आणि आगळेवेगळे समीक्षक म्हणून अध्यापन काळात परिचित झालेलं होतं. ‘आफ्टर अॅम्नेशिया’ या त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा अनुवाद (अनुवादक - डॉ. म. सु. पाटील) वाचला होता. शिवाय ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ या त्यांच्या महत्त्वाकांक्षी बृहद् खंडात्मक प्रकल्पाबद्दल ऐकून होतो. तसेच त्यांची आदिवासी लोकांमधील विकासकामे, त्यांना मिळालेला पद्मश्री सन्मान आणि अन्य अनेक पुरस्कारांबद्दलहीही वाचले होते. अशा व्यक्तीचा अधिक परिचय करून घ्यावा, त्यांचे विचार जाणून घ्यावेत, असे वाटत होते. आणि आकस्मिक तो योग जुळून आला. आमच्या मधल्या भावाच्या वर्गमित्रांचे गेट-टुगेदर निपाणीत वेळोवेळी आयोजित होत असते. त्यांच्या वर्गातील हुशार विद्यार्थिनी सुरेखा विभूतेची एकदा आठवण निघाली आणि सध्या ती बडोद्यातील सयाजीराव विद्यापीठात रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असल्याची माहिती समजली. तिचे जीवनसाथी म्हणजे विख्यात समीक्षक डॉ. गणेश देवी हे आहेत, अशी अधिक माहितीही समजली आणि त्यांची ओळख करून घेण्याची उत्सुकता वाढली. नंतरच्या त्यांच्या एका गेट-टुगेदरला सुरेखा विभूते-देवी उपस्थित राहिल्या. आमच्या भावाने गणेश देवींच्या भेटीची इच्छा व्यक्त करताच त्यांनी होकार दिला. सध्या त्या दोघांचा मुक्काम बडोद्याऐवजी धारवाड येथे असल्याचे सांगून सुरेखाताईंनी पत्ता, फोन नंबर दिला. त्याप्रमाणे २५ जानेवारी ही तारीख स्वतः डॉ. गणेश देवी सरांनी कळवली. आम्ही चार बंधू मोठ्या उत्साहाने धारवाडला पोहोचलो, त्यांच्या घरी.

धारवाड हे सेवानिवृत्तांचे, सुविद्यांचे शांत शहर आहे. सुप्रसिद्ध मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांचे ते आवडते गाव होते. नाटककार गिरीश कार्नाड, गायक मल्लिकार्जुन मन्सूर, विचारवंत प्रा. कलबुर्गी यांसारख्यांचेही वास्तव्य तेथे होते. विशेष गजबजाट नसलेल्या शांत उपनगरात एका छोट्या बंगलीत सुरेखताईंनी आमचे सुहास्यवदनाने स्वागत केले. त्यांच्या घराभोवातीच्या नाजूक फुलवेलीही स्वागतास सज्ज होत्या. घरात पाऊल टाकताच भरगच्च ग्रंथदालनाचे दर्शन घडले. हे घर एका प्राध्यापक दाम्पत्याचे, विचारवंतांचे आहे, याची साक्ष पदार्पणातच पटली! औपचारिक ओळख आणि चहा झाल्यावर त्यांनी, डॉ. देवी थोड्याच वेळात मुंबईहून घरी येणार असून, त्यांना स्टेशनवरून घेऊन येण्यास आपण जात असल्याचं सांगितलं आणि तोपर्यंत आम्हाला विश्रांती घेऊन प्रतीक्षा करण्यास सांगितलं. 

सुमारे अर्धा-पाऊण तास आम्ही सरांचा ग्रंथसंग्रह न्याहाळत-चाळत राहिलो. आंतरविद्याशाखीय अभ्यासाच्या अनेकानेक इंग्रजी पुस्तकांची नावं आणि त्यांचे जागतिक ख्यातीचे लेखक, त्यांची पुस्तकं नजरेनं बघता बघता आमची छाती दडपून जात होती. अशा व्यासंगी व्यक्तीशी आम्ही काय बरं बोलायचं, असं आम्ही परस्परांशी बोलत असतानाच देवी सर आत आले आणि त्यांची रेल्वेगाडी उशिरा आल्यानं त्यांना यायला विलंब झाला, असा खेद व्यक्त करीत पुढच्या पाच मिनिटांतच सर आमच्याशी वार्तालाप करू लागले. त्यांनी रात्रभर प्रवास केलेला होता, हे जाणून त्यांनी थोडी विश्रांती घ्यावी असं आम्ही सुचवलं; पण ते मनावर न घेता त्यांनी आम्हा चौघांची ओळख करून घेत आमच्याशी बोलणं सुरू ठेवलं.

डॉ. देवींच्या शांत, सौम्य अन् मृदू बोलण्यामुळे आम्ही हळूहळू त्यांच्या व्यक्तित्वात जणू विरघळलोच! यापूर्वी आम्ही अनेक जेष्ठ अभ्यासकांशी वार्तालाप केला होता. ते आठवून सारखे सरांचे व्यक्तिमत्त्व-साधर्म्य आम्हाला जाणवू लागले. गुरुवर्य प्रा. गो. म. कुलकर्णी, प्रा. श्री. पु. भागवत, प्रकाशक रामदास भटकळ इत्यादींच्या वागण्या-बोलण्याची, त्यांच्या सौम्यतेची आणि सौजन्याची, त्यांच्या चिंतामग्नतेची आणि मानवतावादी भूमिकेची आठवण मनात तरळू लागली. सगळीच व्यासंगी माणसं अशी सुजनतेची मूर्ती असतात का? त्यांची वाणी आणि त्यांची लेखणी त्यांना उच्च तात्त्विक मंथनात आणि सात्त्विक चिंतनात सदासर्वदा गुंतवून ठेवत असेल का? मनात असे प्रश्नचक्र सुरू राहिले.

डॉ. गणेश देवी यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेबद्दल आणि नोकरीबाबत थोडक्यात सांगून पुढे असे स्पष्ट केले, की महात्मा गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्या जीवनविचारांचा मोठा प्रभाव त्यांच्या लेखनावर आणि सामाजिक कार्यावर पडला आहे. अतिशय आदरपूर्वक आणि अभ्यासपूर्णतेने त्यांनी तो जाणून घेतला आहे. भाषा ही जीवनव्यापी आणि सर्वस्पर्शी संपत्ती आहे. भाषेशिवाय आपण मानवी विश्वाचा विचार करूच शकत नाही. जे जे जाणून घ्यायचं ते ते भाषेतच आणि जे काही करून दाखवायचं तेही भाषेच्या माध्यमातूनच करावं लागतं. भाषांचं असणं हेच मानवी जीवन असणं होय. डॉ. देवी हे बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात इंग्रजी भाषा आणि साहित्याचे अध्यापक म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. तसेच भारतीय भाषांचे ते संशोधक-अभ्यासक आहेत. त्या संदर्भातील त्यांचे सर्वेक्षणाचे कार्य खरोखर अपूर्व आहे. त्या अभ्यासाच्या संदर्भात त्यांना भाषा, बोलीभाषा, आदिवासींची भाषा, प्रत्येक प्रांताची भाषा, भारताची बहुभाषकता, भाषा आणि संस्कृतीचे परस्पराश्रयी संबंध, परकीय राज्यकर्त्यांमुळे भारतीय भाषांची झालेली हेळसांड, अव्वल इंग्रजी अंमलात देशी भाषांना दिले गेलेले गौणत्व असे अनेकांगी भान त्यांना आले. अध्यापनाच्या चाकोरीबद्ध वाटा त्यांनी बदलल्या. विद्यापीठातील नोकरीतून वयोपूर्व निवृत्ती घेतली आणि गुजरातमधील तेजगढ भागात आदिवासी लोकजीवनाशी ते समरस झाले. 

डॉ. देवींना आदिवासीविषयक समाजकार्य करतानाच त्यांच्या परंपरा, संस्कृती आणि बोलीभाषा यांचे महत्त्व लक्षात आले. त्यांनी बडोदा येथे भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्र स्थापन केले. आणि ‘भाषासंगम’ हा राष्ट्रीय पातळीवरचा मोठा कार्यक्रम आयोजित केला. भारतातल्या विविध भागांतून बहुभाषक प्रतिनिधी, भाषातज्ज्ञ, भाषा संशोधक, तसेच ज्येष्ठ साहित्यिका महाश्वेतादेवी असे सातशे अभ्यासक उपस्थित होते. त्या वेळच्या चर्चा-मंथनातून ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हा प्रकल्प उभा राहिला. आज त्याचे ५० खंड प्रसिद्ध झाले आहेत. भाषेच्या माध्यमातून शांती आणि सामंजस्य, भाषेच्या पुनरुत्थानासाठी आदानप्रदान, सांस्कृतिक आणि भाषिक वैविध्याचा अभ्यास इत्यादी या प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत. 

सयाजीराव विद्यापीठातून निवृत्त होण्यापूर्वी डॉ. देवींनी १९९२ मध्ये ‘आफ्टर अॅम्नेशिया’ (‘स्मृतिभ्रंशानंतर’ - अनुवादक डॉ. म. सु. पाटील) हा बहुचर्चित दीर्घनिबंध प्रसिद्ध केला. त्याला १९९४मध्ये साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. भारतातील आणि विदेशातील अनेक विद्यापीठांमधून अभ्यासासाठी त्या पुस्तकाचा उपयोग करण्यात आला आहे आणि त्यावर उलटसुलट चर्चा झालेली आहे.

भारतीय भाषांसंबंधीच्या आणि तेजगड येथील आदिवासी पाड्यातील डॉ. गणेश देवींच्या अनेक वर्षांच्या कामांचा ओझरता परिचय होण्यासाठी त्यांचे ‘वानप्रस्थ’ हे पुस्तक लक्षात घ्यावे लागते. आदिवासींच्या अस्मितेचा विकास साधणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. हे काम करताना त्यांनी ‘बिनराजकीय कृतिप्रवणता’ आणि ‘बिनआध्यात्मिक अपरिग्रह’ या अभिनव संकल्पना रुजवल्या आणि वानप्रस्थाश्रम या पारंपरिक संकल्पनेचा विस्तार केला आहे. अनेक विद्याशाखांच्या अभ्यासातून त्यांचे व्यक्तित्व पैलूदार झाले, ते आर्ष आणि विदग्ध झाले आहे, त्याचा प्रत्यय ‘वानप्रस्थ’ पुस्तकातून येतो. पारंपरिक अर्थाने ते व्यक्तिगत समाधानासाठी केलेले ‘अरण्य’वाचन नसून, स्वातंत्र्य, सहिष्णुता, अहिंसा या मूल्यांचा एका परिणतप्रज्ञ व्यक्तीने घेतलेला तो शोध आहे. या पुस्तकाला दुर्गा भागवत पुरस्कार आणि महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही लाभला आहे.

आजकालच्या सार्वजनिक जीवनात जी असहिष्णुता वृत्ती फोफावली आहे तिच्यामुळे डॉ. गणेश देवी फार अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आपला साहित्य अकादमी पुरस्कार (१९९४) आणि पद्मश्री पुरस्कार (२०१४) केंद्र शासनाला परत केला आहे. कृतिशील विचारवंतांचे दिवसाढवळ्या खून होत आहेत, वैचारिक विविधता, लोकशाहीपूरक असा सहिष्णू संवाद, सह-अस्तित्व आणि धार्मिक-सांस्कृतिक समानता या संविधानमान्य मूल्यांचा अंत होत आहे, यामुळे सर अस्वस्थ झाले आहेत. त्या मूल्यांची पुनर्स्थापना व्हावी यासाठी त्यांनी ‘दक्षिणायन’ ही व्यापक चळवळ उभी केली आहे.   

डॉ. गणेश देवी यांनी विविध प्रांतांतील, विविध भाषांतील लेखक-कलावंत-कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘दक्षिणायन’ अभियान सुरू केले आहे. त्याचा पहिला भाग म्हणून त्यांनी पुणे-कोल्हापूर-धारवाड या शहरांना आपल्या काही सहकाऱ्यांसह भेटी देऊन दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. पुढे गुजरातमधील दांडी येथे ‘सर्वभाषासंवाद’ परिषदेचे आयोजन केले. नंतर नोव्हेंबर २०१६मध्ये गोव्यातील मडगाव येथे ‘दक्षिणायन’ची तीन दिवसांची परिषद त्यांनी घेतली. आजकाल अहिंसेची कल्पना नाकारण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर सुरू आहेत. राज्यव्यवस्थेच्या बाहेर राहून पाशवी दहशतवादी हल्ले होत आहेत. विचारांची गळचेपी होत आहे. हिंसेचे वादळ घोंगावत आहे. लोकशाहीला मूलभूत जीवनमूल्य मानणाऱ्यांनी एकत्र येऊन त्याच्याशी सामना करण्याची गरज आहे. जनसामान्यांच्या मनात विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी दक्षिणायन मोहीम अवतरली आहे. हिंसेच्या वादळाला निर्भयतेने प्रतिरोध करण्यासाठी केलेले हे आवाहन आहे.

सांगली-कोल्हापूर भागात शिकून प्राध्यापक झालेला एक बहुभाषक अभ्यासक स्वतःचं संवेदनशील मन आणि अखंड व्यासंगाच्या बळावर आता राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. भारतातील अनेक पुरस्कारांबरोबरच युनेस्कोचा ‘लिंग्वापॅक्स’ हा जागतिक पुरस्कारही त्यांना लाभला आहे. ‘सार्क’ लेखक सन्मान मिळाला आहे. बहुसन्मान प्राप्त झालेले डॉ. गणेश देवी अतिशय साधेपणाने दैनंदिन जीवन जगत आहेत. आदिवासींच्यात, लेखक-कलावंतांच्यात आणि समविचारी कार्यकर्ते-विचारवंतांच्यात सहभागी होऊन कार्यरत आहेत.

‘वानप्रस्थ’ हे त्यांचे पारंपारिक अर्थाने आत्मवृत्त नसले, (आणि ते लिहिण्याचा त्यांचा मानस नाही) तरी त्यांचे विचार आणि कार्य यांचा चांगला परिचय त्या पुस्तकातून होतो. तेजगढमधील आदिवासींचे जीवन त्यांनी जवळून पाहिले आहे. त्यांच्या संगतीत ते राहिले आहेत. त्यांच्या समाजाचे आणि संस्कृतीचे एकंदर चित्र त्यांनी समजावून घेतले आहे. नागर समाजाकडून या आदिवासींच्या संदर्भात होणारे वर्तन आणि व्यवहार हे क्रौर्य आणि दहशतीच्या पातळीवरचे आहे, याची सरांना चीड वाटते. त्यांना नाडणे, लुबाडणे, लुटणे, शोषण करणे आणि वेळप्रसंगी हिंसा करणे हे अतिशय संतापजनक आहे. त्या पार्श्वभूमीवर देवींनी हिंसेबद्दलचे चिंतन सविस्तर व्यक्त केले आहे. तसेच गुजरात-दंगलीबद्दलही लिहिले आहे. मराठी भाषेतले त्यांचे हे एकमेव पुस्तक आहे. बाकीची पुस्तके अनुवादित आहेत. त्यांच्या लेखणीत नेमकेपणा आहे, वर्तनात आदिवासींबद्दल आत्मीयता आहे. तसेच कर्त्या सुधारकाचा धीटपणा, निर्भयता आहे. आंतरविद्याशाखीय व्यासंगामुळे लेखनाला बहुसंदर्भयुक्त वजनदारपणा प्राप्त झाला आहे.

 ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या सुपरिचित उक्तीप्रमाणे डॉ. गणेश देवींचे सांसारिक जीवन साधेपणातही समृद्ध आहे, याचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी धारवाडमधील प्रत्यक्ष भेटीतून आणि वार्तालापातून आला. डॉ. सुरेखा गणेश देवींचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व तर ज्ञानविज्ञानसंपन्न आहेच; शिवाय सरांच्या अवघ्या विचार-कार्यात, उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अशा जगावेगळ्या जीवनसाथीचा उत्साह दुणावणारा त्यांचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने सहधर्मचारिणी म्हणता येईल असा तो समृद्ध अन् प्रसन्न आहे. बा-बापू, जोतिबा-सावित्री, पुलं-सुनीताबाई अशा परस्परानुकुल जोडप्यांची आठवण यावी, असं हे जोडपं आहे. त्यांची मुलगी रश्मी हिने विद्याक्षेत्रात स्वकर्तृत्वाने प्रतिष्ठित पद संपादन केलेले आहे. आई-वडिलांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाची आणि विचारधारेची तिला अत्यंत आदरपूर्वक आणि आस्थापूर्वक जाण आहे. घरादाराची वा संपत्तीची कणभरही अपेक्षा न बाळगता आपल्या आई-वडिलांची कर्तबगारी हीच आपली इस्टेट, तोच आपला वारसा असा समंजसपणा तिच्या ठायी आहे. खानदानी घरंदाजपणा याहून वेगळा तो काय असावा?

अशा या गणेश व सुरेखा देवी यांचं आम्हाला दर्शन व्हावं, कौटुंबिक वातावरणात त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा व्हाव्यात, हे आमचं भाग्य नव्हे काय? तृप्त मनानं आम्ही त्यांचा निरोप घेता घेता देवी सरांनी ‘दी क्रायसिस विदिन’ (अनुवाद -प्रमोद मुजुमदार) हे त्यांचं नवं पुस्तक स्वाक्षरीसह आमच्या हाती ठेवलं. तो प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो ते थेट स्वगृही त्या ‘देवी-दर्शना’च्या समाधानी भावनेतच पोहोचलो. निरीश्वरवादी मनाला हा आगळावेगळा प्रसाद भावला. ही किमयाच आगळी!!

संपर्क : डॉ. सुरेश जोशी - ९४२३८ ७४७८१
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yashavant joshi About 284 Days ago
या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे. हे माझे महत्त् भाग्य.
0
0
VMMujumdar About 285 Days ago
Today,I have read everything,enjoyed all,Thanks all Dr,Ganesh Devies family as well as Gopal Joshies family.congrates all.
0
0

Select Language
Share Link