Next
ग्रामीण भागातील मुलांसाठी अॅथलेटिक स्पर्धेचे आयोजन
प्रशांत सिनकर
Saturday, March 23, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ६०० मुला-मुलींची अॅथलेटिक स्पर्धा २३ मार्च २०१९ रोजी ठाण्यातील पातलीपाडा येथील श्री माँ विद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध अॅथलेटिक प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्या एम स्पोर्टस् अँड फिटनेसच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर, बदलापूर, ठाणे या तालुक्यांतील कोठारे, तानसा, मोडकसागर या विभागांतील नऊ मराठी खासगी, जिल्हा परिषद, एक इंग्रजी शाळा यातील ६०० मुले-मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाले होती. ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ६०० मीटर धावणे, रिले आणि लांब उडी या प्रकारांत ही स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले.

या वेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय अॅथलीट गणेश सातपुते, उप जिल्हाधिकारी रेवती गायकर, उप जिल्हाधिकारी संजय जाधव, श्री माँ विद्यालयाचे सेक्रेटरी राजन अय्यंगार, ‘पीटीआरए’चे अध्यक्ष के. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेची सुरुवात श्री माँ विद्यालयाच्या बँड पथकाने वादन करत आकाशात फुगे सोडून झाली. आठ, १०, १२ आणि १४ वर्षे वयोगटांतील मुले आणि मुलींच्या झालेल्या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमाकांना मान्यवरांच्या हस्ते सायकल, फुटबॉल, स्पिकिंग रोप असे पारितोषिक देण्यात आले.
 


स्वत: अॅथलीट असलेले प्रशिक्षक अजित कुलकर्णी हे गेली १९ वर्षे ठाणे शहरातील श्री माँ विद्यालय आणि वसंत विहार क्लबमधील विद्यार्थ्यांना अॅथलेटिक्सचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरणाऱ्या श्रेया विध्वंस, सिद्धार्थ रिंगाला यांसारखे अनेक गुणवान खेळाडू कुलकर्णी यांनी राज्याला आणि देशाला दिले आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे. ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव चमकवू शकतात; मात्र या विद्यार्थ्यांकडे क्रीडासाहित्य आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची कमतरता असल्याचे कुलकर्णी यांच्या निदर्शनास आले.

एम स्पोर्टस् अँड फिटनेस संस्थेच्या माध्यमातून अजित कुलकर्णी यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील मुले आणि मुलींसाठी छोट्या-छोट्या स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. अनवाणी धावणाऱ्या या मुला-मुलींना शूज, सॉक्स, टी-शर्ट, कॅप, बॅग, ट्रकसूट असे क्रीडा साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. गेल्या वर्षी मुलींची पहिली अॅथलेटिक्स स्पर्धा तानसा येथे झाली. या स्पर्धेत २५० मुलींनी भाग घेतला होता. या स्पर्धेत अनवाणी धावणाऱ्या मुलींना मोठ्या क्रीडांगणावर स्पर्धा घेण्याचे कुलकर्णी यांनी सांगितले होते. त्यानुसार श्री माँ विद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा घेण्यात आली.  

स्पर्धेत सहभागी झालेल्या ६०० मुला-मुलींची प्रवास व्यवस्था, नाश्ता, शूज, सॉक्स, ट्रक सूट, टी-शर्ट, कॅप, बॅग आणि जेवणाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या आठ खेळाडूंचे टॅलेंट हंट घेऊन शनिवारी आणि रविवारी खास प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search