Next
‘रत्नदुर्ग माउंटेनीअर्स’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा सत्कार
BOI
Wednesday, May 15, 2019 | 03:22 PM
15 0 0
Share this article:

सुनीता नाडगीर यांचा सत्कार करताना शेखर मुकादम.

रत्नागिरी :
रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या कोकणातील गिर्यारोहण क्षेत्रातील पहिल्या नोंदणीकृत संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नुकताच विशेष कार्यक्रम पार पडला. सामाजिक बांधिलकी जागृत ठेवून काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती तसेच श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील मारुती मंदिर परिसरातील हॉटेल व्यंकटेश येथे हा कार्यक्रम झाला.

एकादशी कोल्हटकर यांचा सत्कार करताना नगराध्यक्ष राहुल पंडित.

या कार्यक्रमात शीतल मुकादम यांनी ट्रेकिंग, सायकलिंग आणि धावण्यात यश मिळवणाऱ्या ज्येष्ठ महिला सुनीता नाडगीर आणि एकादशी कोल्हटकर यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी नाडगीर यांनी आपले रोमांचकारी अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, ‘लग्नानंतर पुण्यात आले व एमए करताना माझ्या दोन मुलग्यांनी मला सायकल शिकवली. मैत्रीण निरुपमा भावे हिच्यामुळे ट्रेकिंगची ओळख झाली. तिच्यामुळेच ६८व्या वर्षी धावायला सुरवात केली. गुडघे वापरले तरच ते चांगले काम करतात. पुणे माउंटेनीअरिंगचे संस्थापक महाजन हे माझे गुरू. मी लहानपणी विहिरीत पडले होते, काकांनी वाचवले. हा माझा पुनर्जन्म म्हणावा लागेत. मी नंतर पोहायला शिकले, तेव्हापासून एकही दिवस खंड पडला नाही. थंडी असली तरीही अर्धा तास पोहते. मी शुद्ध शाकाहारी असून, कोणतेही डाएट करत नाही. आवडेल ते पदार्थ प्रमाणात खाते. महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई शिखराचा ट्रेक केला. सुंदर हवा, वातावरण पाहून कृतकृत्य वाटले. भीमाशंकरचा ट्रेक पावसाळ्यात चार वेळा वेगवेगळ्या वाटांनी केला. हिमालयीन ट्रेक सरावासाठी पुण्यातील १४ टेकड्या सहा वेळा पार केल्या. सरावाला रात्री सुरुवात करावी लागते. कात्रज बोगदा ते सिंहगड असे हे अंतर पायी पार केले. सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रुपमधून चांगली संधी मिळाली. दांडेलीच्या जंगलातून प्रवास केला, तिथे रस्ता नव्हताच. त्या वेळी पक्षी निरीक्षण, पर्यावरण, खेड्यातील जीवन, निसर्गाच्या जवळ जाण्याचा आनंद मी घेतला.’

मुलाखत घेताना शीतल मुकादम.

एकादशी कोल्हटकर यांनी सांगितले, ‘अलंग मलंग ट्रेकला जाण्याचा योग आला. मानसिक तयारी केली. गुहेत गेल्यावर पडले, पायाला सूज आली; पण सर्व ट्रेकर्सनी कुटुंबाप्रमाणे सांभाळ केला. या प्रसंगावरून मला अनोळखी माणसांचीही माणुसकी कळली. ४३व्या वर्षी पुण्यात सायकल शिकले. पती मागोमाग यायचे. हळूहळू धाडस वाढले. १८ किलोमीटरपर्यंत सायकल नेली आणि अत्यानंद झाला. निरुपमा भावे यांनी खूप मदत केली. नंतर त्यांच्यासोबत पुण्यापासून नगर, शिर्डी, नागपूर, जबलपूर आणि कन्याकुमारी असे सायकलिंग केले. आमच्या ग्रुपमधील कोणाचाही वाढदिवस असला, की आम्ही टेकडी चढायला जातो किंवा ५० किलोमीटर सायकल चालवतो व मगच हॉटेलात जातो. कन्याकुमारीला जाण्यापूर्वी सराव करताना सायकलवरून पडले आणि सहा आठवडे सायकलिंग बंद झाले. तरीही आत्मविश्वाीस आणि उत्साहाच्या भरात पुण्यातून कन्याकुमारी हे १६०० किलोमीटरचे अंतर १६ दिवसांत पार केले. ५-१० किलोमीटर असा सराव करत गेले.’ धावण्याच्या व्यायामापूर्वी मसल्स ट्रेनिंग घेतले पाहिजे. पायाचे स्नायू ताकदवान झाले पाहिजेत. वॉर्म अप करायला हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

टीम रत्नदुर्ग माउंटेनीअरिंग.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राहुल पंडित, गिर्यारोहणातील पहिला श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रदीप केळकर, बांधकाम व्यावसायिक दीपक साळवी, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, जि. प. सदस्य उदय बने, संस्थेचे अध्यक्ष शेखर मुकादम, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू यांच्यासमवेत ‘रत्नदुर्ग’चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरेश्वयर जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी प्रदीप केळकर यांनी गिर्यारोहणासंदर्भात सादरीकरण केले. यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मैत्रेयी गोगटे व ऐश्वीर्या सावंत यांचा, सामाजिक कार्याबद्दल राजरत्न प्रतिष्ठान, नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत साईल शिवलकर, ओंकार गिरकर, दीप्तेश थेराडे, गो-पालनाबद्दल मुकेश गुंदेचा यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. तसेच, आशादीप संस्थेचे दिलीप रेडकर, पॉवरलिफ्टिंगपटू नेहा नेने, श्री. व सौ. नलावडे, गिर्यारोहणातील उदयोन्मुख जिद्दी माउंटेनीअरिंग संस्था आणि कासवे वाचवणारे प्रदीप डिंगणकर यांनाही सन्मानित करण्यात आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search