Next
स्वराभिषेकाने रसिक मंत्रमुग्ध
BOI
Friday, December 15, 2017 | 11:51 AM
15 0 0
Share this article:

भुवनेश कोमकलीपुणे : पंडित जसराज, कौशिकी चक्रवर्ती व भुवनेश कोमकली या तीन मातब्बर कलाकारांनी आपल्या घरंदाज गायकीने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पाहण्यास आलेल्या सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यात आणखी भर होती ती कला रामनाथ यांच्या व्हायोलिन वादनाची. एकंदरीत महोत्सवाचा दुसरा दिवस (१४ डिसेंबर) रसिकांना तृप्त करणारा असा ठरला.

सवाई गंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कुमार गंधर्व म्हणजेच शिवपुत्र कोमकली यांचे नातू व मुकुल कोमकली यांचे पुत्र भुवनेश कोमकली यांच्या गायनाने झाली. राग मुलतानी आळवत त्यांनी सादरीकरणास सुरुवात केली. पुढे ‘दिल बेकरार’ ही द्रुत तीन तालातील बंदिश त्यांनी सादर केली. सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला) व विनय चित्राव यांनी (तानपुरा) त्यांना साथ केली. पहिल्या सादरीकरणाचा शेवट त्यांनी मुकुल शिवपुत्र म्हणजेच त्यांच्या वडिलांनी शोधलेल्या ‘आ जन जगत विच’ या मूळच्या माळवा येथील रचनेने केला. अर्थातच रसिकांनीही त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

कला रामनाथव्हायोलिन हे वाद्य मुळातच अंगावर रोमांच आणणारे आणि त्यावर प्रभुत्व असलेला कलाकार जेव्हा ते वाजवीत असतो तेव्हाचा माहौलच काहीसा निराळा असतो. याचाच प्रत्यय गुरुवारी सवाईतील रसिकांना ‘मोझार्ट ऑफ साऊथ एशिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदुषी कला रामनाथ यांच्या व्हायोलिन वादनानंतर आला. एन. राजम् व पंडित जसराज यांच्या त्या शिष्या आहेत. यंदाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराच्या मानकरी असलेल्या कला रामनाथ यांनी राग श्यामकल्याणने वादनाचा आरंभ केला. योगेश समसी यांनी त्यांना तबल्यावर आणि वैशाली कुबेर व वैष्णवी अवधानी यांनी तानपुऱ्यावर साथ केली.

कौशिकी चक्रवर्तीदुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. तब्बल ११ वर्षांनंतर या मंचावर आपली गायकी सादर करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचेच आभार मानत त्यांनी गायनास सुरुवात केली. राग मारूबिहागने त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात करून रसिकांवर आपल्या स्वरांची मोहिनी घातली. सत्यजित तळवलकर (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम) व मेघोदीपा गांगुली, अनुजा भावे (तानपुरा) यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर त्यांनी ‘करुणा करो बागेश्वरी’ ही रचना सादर केली. शेवटी रसिकांच्या आग्रही मागणीनुसार त्यांनी ‘याद पिया की आये’ ही बहारदार ठुमरी सादर केली.  

सादरीकरणानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कौशिकी ‘सखी’ या त्यांच्या बँडविषयी बोलल्या. ‘आमचा हा बँड अजून पुण्यात येऊ शकला नाही याचे फार वाईट वाटते. लवकरच आम्ही पुण्यात कार्यक्रम करू,’ असे त्या म्हणाल्या. केवळ महिलांच्या असलेल्या या बँडबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘फेमिनिझम हा शब्दच मला आवडत नाही. मुळात आपल्याला अशा शब्दांची गरज पडते हेच फार वाईट आहे.’

दुसऱ्या दिवसाची सांगता संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायकीने झाली. ‘शिवशंकर महादेव’ या रचनेतून ते रसिकांना भक्तिमय वातावरणात घेऊन गेले. मुकुंद पेटकर यांनी त्यांना हार्मोनियमवर साथ देऊन मैफलीत आणखी रंग भरले. केदार पंडित (तबला) व श्रीधर पार्सेकर (पखावज) यांनी त्यांना साथसंगत केली.  संगीतमार्तंडाने केलेल्या स्वराभिषेकाने दुसऱ्या दिवसाच्या मैफलीत रसिक श्रोत्यांचे कान तृप्त झाले.

(या सादरीकरणाची झलक दर्शविणारे काही व्हिडिओ सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search