Next
ढोल बजने लगा...
BOI
Saturday, August 11, 2018 | 03:52 PM
15 0 0
Share this article:

गणपतीबाप्पाच्या आगमनासाठी पुण्यात ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी पथकांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. त्या आवाजाने भारलेल्या वातावरणामुळे गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. ढोलपथकांच्या या तयारीचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेला हा आढावा...
.....

सातासमुद्रापार पोहोचलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात महत्त्वाचे आकर्षण असते ते ढोल-ताशा वादनाचे. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ढोलपथकांची तयारी सुरू झाली असून, शहरात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या सरावाचा आवाज घुमू लागला आहे. वेगवेगळे ताल तयार करून, त्यांचा सराव करणे, नवीन सहभागी झालेल्या सदस्यांची तयारी, ढोल, ताशे, झांजा, झेंडे आदि साहित्य-सामग्रीची जमवाजमव उत्साहाने सुरू आहे. 

ढोलपथकाच्या या तयारीबाबत शिवतेज पथकाचे प्रमुख अविनाश मुळे म्हणाले, ‘शहरात सध्या संध्याकाळी नदीकिनारी ढोल-ताशांचा सराव सुरू आहे. हा आवाज कानी पडला, की जाणारा येणारा प्रत्येक पुणेकर आवर्जून थांबून सराव पाहत असतो. पाहता पाहता तो तालही धरतो आणि सगळे विसरून त्यात दंग होतो. गेल्या चार वर्षांपासून आम्ही हे पथक चालवत आहोत. यात माझ्यासह अश्विनी तिकोणे, निशिता सावंत सहभागी असून, मुलींचाही यात सहभाग आहे. पथक चालवण्यासाठी मुलामुलींच्या पालकांना दिला जाणारा विश्वास महत्त्वाचा असतो. तो विश्वास दिल्यानंतर ढोलपथक सुरू होते.’ 

अश्विनी तिकोणे म्हणाल्या, ‘सध्या गृहिणी, ‘आयटी’मधील मुले-मुली, महाविद्यालयीन मुले यांचे ढोलपथकात येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यांना ढोल कमरेला बांधण्यापासून ते वाजविण्यापर्यंतचे धडे दिले जातात. तसेच ताशावादनाचाही सराव घेतला जातो. शिस्त, ताल यावरच प्रत्येक ढोलपथकाचे भवितव्य ठरत असते. यासाठी पथकात वाजवण्यापासून ते मिरवणुकीत संयम कसा ठेवावा, हेही शिकवले जाते.’

निशिता सावंत म्हणाल्या, ‘एका पथकात साधारण तीस मुले-मुली असतात. तीस ढोल, आठ ताशांसोबत साधारण पन्नास दिवस आधी सराव सुरू होतो. सरावापासून ते मिरवणुकीपर्यंत किमान पाच लाख रुपये खर्च होतो. सरावादरम्यान ढोलाचे पान सहा वेळा तरी फुटते. बाजारात दोन पानांची किंमत दीड हजार रुपये असते. तसेच सदस्यांचे ड्रेस, वाहतूक, जेवण असा खर्चही असतो. सरावासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. नदीपात्रालगत सरावाची जागा असल्याने पाटबंधारे विभागाची परवानगीही घ्यावी लागते. परवानग्या, साधनसामग्री, सराव याच्या खर्चाची तरतूद, सरावातील अडचणी, नवीन ताल, ठेका शोधणे, त्याची पक्की तयारी करणे आणि जीव तोडून मेहनत केल्यानंतर गणेशोत्सवासाठी ढोलपथक सज्ज होते.’ 

बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे वाजवताना या सगळ्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटते, असेही या सर्वांनी आवर्जून नमूद केले. सर्वसाधारणपणे प्रत्येक ढोल-ताशा पथकातील सदस्यांची ही प्रातिनिधिक भावना आहे. 

(पथकाच्या सरावाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search