Next
दर रविवारी आदिवासी गावांत मोफत आरोग्य सुविधा
पुणे शहरातील डॉक्टरांचा आंबेगाव तालुक्यात उपक्रम
डॉ. अमोल वाघमारे
Saturday, November 24, 2018 | 10:50 AM
15 0 0
Share this article:आंबेगाव :
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात दर रविवारी मोफत आरोग्य सुविधा देण्याचा उपक्रम पुणे शहरातील डॉक्टर राबवत आहेत. गेल्या दीड वर्षापासून हा अनोखा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. हे डॉक्टर दर रविवारी स्वखर्चाने आदिवासी भागात जाऊन ही सुविधा देत आहेत. आपल्या डॉक्टर मित्राचे समाजकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी या डॉक्टर्सनी राबविलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजूंना मोठा उपयोग होत आहे. 

पुणे शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारे व सामाजिक जाणिवेने पुणे जिल्ह्याच्या आदिवासी व ग्रामीण भागात नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात पुढाकार घेणारे एक डॉक्टर म्हणजे शेखर बेंद्रे. पुणे शहरात जन आरोग्य मंच या संघटनेची स्थापना करण्यातही त्यांचा पुढाकार होता. जनतेच्या आरोग्यविषयक भूमिका समर्थपणे मांडून त्यासाठी प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या जन आरोग्य मंच या संघटनेने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात लवकरच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. 
अचानक एका अपघातात डॉ. शेखर बेंद्रे यांचे निधन झाले. त्यांचे निधन त्यांच्या कौटुंबिक परिवारासाठी तर धक्कदायक होतेच; पण त्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील अनेक आदिवासी, ग्रामीण भागातील कुटुंबांनाही हे दुःख पचविणे जड गेले होते. या दरम्यान डॉक्टर शेखर बेंद्रे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील मित्र एकत्र आले आणि त्यांनी डॉ. शेखर बेंद्रे यांचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला. जन आरोग्य मंच या संघटनेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील महाळुंगे या गावात डॉ. शेखर बेंद्रे यांच्या नावाने एक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे ठरले. या आरोग्य केंद्राच्या वतीने दर रविवारी मोफत दवाखाना सुरू करून, परिसरातील सात ते आठ आदिवासी गावांतील आदिवासी बांधवांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचा निश्चय झाला. या आरोग्य केंद्रासाठी पहिली गरज होती ती म्हणजे जागा उपलब्ध होणे. गावातीलच तुकाराम पारधी व ज्ञानेश्वर पारधी या दोघा भावांनी आपले स्वतःचे घर देऊन ही चिंता चुटकीसरशी सोडवली. डॉक्टरांची भोजनाची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थांनी करण्याचे स्वीकारले. पुण्यातील अनेक डॉक्टर मित्रांनी या आरोग्य केंद्रासाठी लागणारी औषधे व इतर सामग्री उपलब्ध करून दिली. यानंतर हे आरोग्य केंद्र सुरू झाले. दर रविवारी डॉक्टरांसमवेत स्थानिक पातळीवर सुनील पेकारी व संतोष कोकाटे हे उपस्थित राहतात. ते आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांना सर्व प्रकारचे सहकार्य ते करत असतात. 

आजमितीस सुमारे दीड वर्ष हे आरोग्य केंद्र दर रविवारी अखंडपणे सुरू आहे. या दरम्यान सुमारे दीड हजारांहून अधिक रुग्णांवर या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अनेक रुग्णांच्या मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या विकारांचे निदान या केंद्रात झाले. काही रुग्णांना पुण्याला नेऊन त्यांना योग्य ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या आरोग्य केंद्राच्या वतीने उपचारांसोबतच अनेक गावांत ग्रामस्थांसोबत आरोग्यविषयक चर्चा करण्यात आली. आजार होऊच नयेत यासाठी घ्यायची काळजी आणि एकंदर आरोग्यविषयक प्रबोधन या कार्यक्रमातून केले जात आहे. 

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पिंपरी, ढकेवाडी, महाळुंगे, पाटण, साकेरी, कुशिरे, भोईरवाडी, नानावडे यांसारख्या गावांना शासकीय आरोग्यसुविधा जवळपास उपलब्ध नव्हती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना आठ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेघर या गावातील सरकारी दवाखान्यात जावे लागत होते. या गावाला जाण्यासाठी एसटीची व्यवस्था नाही. बाजाराच्या दिवशी खासगी वाहनाने रुग्णाला या गावी नेले जायचे. अशा बिकट पार्श्वभूमीवर हे आरोग्यकेंद्र या भागासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे. पुणे शहरात या सर्व प्रकल्पाचे संयोजन जन आरोग्य मंच व डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्राची कार्यकारी समिती करत आहे. स्थानिक पातळीवर किसान सभा ही शेतकरी संघटना सर्व नियोजन करत आहे. या केंद्राच्या मुख्य समन्वयक डॉ. अरुणा जाधव व त्यांचे सर्व सहकारी जन आरोग्य केंद्राचे पदाधिकारी डॉ. अनुप लढा, डॉ. लता शेप, डॉ. किशोर खिलारे, डॉ. महारुद्र डाके, डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी अत्यंत उत्तमपणे या केंद्राचे कामकाज सुरू ठेवले आहे. स्थानिक पातळीवर किसान सभेचे कृष्णा वडेकर, अशोक पेकारी, अरुण पारधी, राजू घोडे, सुनील पेकारी, संतोष कोकाटे यांनी या सर्व प्रकल्पाला उत्तम साह्य केले आहे. 

ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नावर जन आरोग्य मंच व अखिल भारतीय किसान सभा यांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय असा आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 15 Days ago
Best wishes .May your example inspire others .
0
0
Dipak Sapkale About 149 Days ago
I am really looking forward to work with these people and to serve for social development....plz tell me what procedure should i follow
0
0

Select Language
Share Link
 
Search