Next
सातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर
स्थानिक आदिवासींकडून होत असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली
शशिकांत घासकडबी
Thursday, June 27, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:

सर्व छायाचित्रे : आनंद बोरा

नंदुरबार :
 धडगाव तालुक्यातील (जि. नंदुरबार) डोंगर परिसरात दीड हजारांहून अधिक मोर असून, त्यामध्ये शंभरहून अधिक पांढरे मोर असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींकडून सुरू असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली आहे. हा भाग सातपुड्यातील पाचव्या व सहाव्या पुड्याच्या आसपास आहे. 

शहादा (जि. नंदुरबार) येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सागर निकुंभे यांना ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत (रावे) पक्षी निरीक्षण आणि अभ्यास करताना पांढऱ्या रंगाचे मोर दिसले. त्यांनी ही बाब वन्यजीव संरक्षण संस्थेतील आपल्या काही  पक्षिमित्रांना सांगितली. तसेच काही छायाचित्रे व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. त्यातून मोरांची ही दुर्मीळ जात असल्याचे पुढे आले आहे.छायाचित्रकार आनंद बोरा या भागात आले असताना त्यांनी या मोरांची काही छायाचित्रे टिपली. हरणखुरी गावातील भाडोला डोंगर परिसरात आदिवासी बांधवांकडून गेल्या पाच वर्षांपासून वन विभागाच्या ६५ हेक्टर जमिनीवर वनसंवर्धनाचे काम सुरू आहे. श्रमदानातून डोंगराच्या भागात झाडे लावण्यात आली. त्यानंतर येथील तितर आणि सशांबरोबरच मोरांचीही संख्या वाढत गेली. नैसर्गिक खाद्य उपलब्ध झाल्याने मोरांच्या संख्येत भर पडली, असे ग्रामस्थांनी सांगितले. जंगली श्वाान, बिबटे आणि तरस यांचाही येथील वावर वाढला आहे. वनसंवर्धनामुळे नैसर्गिक जैवसाखळी पुनरुज्जीवित होत आहे. 

पांढऱ्या मोरांना अल्बिनो पीकॉक असे म्हणतात. परदेशात अनेक ठिकाणी यांचे क्रॉस ब्रीडिंगही केले जाते. अल्बिनो मोरांचा रंग पूर्ण पांढरा असतो. त्यांचे डोळे गुलाबी असतात; पण या भागात जे पांढरे मोर आढळले, त्यांचे पूर्ण शरीर पांढरे, मान निळी व डोळेदेखील निळे आहेत. पांढऱ्या लांडोरीचा गळा विटकरी आहे. अशा प्रकारचे मोर कुठेही आढळून आले नसल्याचे काही पक्षिमित्रांचे म्हणणे आहे. ‘क्रॉस ब्रीडिंग’मधून या मोरांची उत्पत्ती झाली असल्याची शक्यता काही पक्षिमित्रांनी वर्तवली. या मोरांच्या थव्यात पूर्ण अल्बिनो असलेले मोर, लांडोरी पूर्वी असू शकतात. त्यांच्या पुढच्या पिढीत हा प्रभाव कमी कमी होत जाऊन सध्याचे मोर ‘पार्शियल अल्बिनो’ झाले असावेत, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. 

‘अल्बिनिझम ही एक प्रकारची जनुकीय समस्या असून, त्यात शरीरात अन्य रंगांचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे पुढील पिढीतदेखील असा प्रकार घडू शकतो. एकदम इतक्या संख्येने मोर पांढरट रंगाचे असणे, ही दुर्मीळ घटना आहे. यावर पूर्ण अभ्यासानंतरच योग्य मत मांडता येईल,’ असे सागर निकुंभे यांनी सांगितले. स्थानिक शेतकरी सुभाष पवारा म्हणाले, ‘या परिसरात तितर, लाहोरीबरोबर या परिसरातील मोरही वाढले. सर्व टेकड्यांची मुख्य टेकडी म्हणून सातपुड्यामधील या परिसरातील मोरांच्या संवर्धनासाठी वन विभागाने पावले उचलणे आवश्यधक आहे. हा परिसर मोरांसाठी राखीव करून, मोरांच्या संवर्धनाबरोबर त्याचा अभ्यास केला, तर पर्यटकांच्या माध्यमातून रोजगार मिळू शकणार आहे.’ 

‘ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत अभ्यास करताना पक्षिनिरीक्षणासाठी गेलो होतो. त्या वेळी पांढऱ्या मोरांचे दर्शन घडले. मोरांची ही पिढी लुसिस्टिक किंवा पार्शियल अल्बिनो असू शकते, असा अंदाज आहे. यावर अभ्यास होणे गरजेचे आहे. या परिसरात खूप मोर असून त्यांना संरक्षण मिळणे आवश्यहक आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे वन विभागाच्या परवानगीने या मोरांचा अभ्यास केला जाणार असून, जनजागृती करून मोराचे जंगलातील महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी वन्यजीव संस्थेतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत,’ असे सागर निकुंभे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bharat Jasani About 87 Days ago
Very interesting news.Chances are of 'Lucisism' in Peacocks.Only further studies will tell.More participation & efforts from Forest deppt expected.
0
0

Select Language
Share Link
 
Search