Next
‘विंदा करंदीकर म्हणजे मराठी साहित्यिक रत्नांमधील कोहिनूर हिरा!’
विवेक सबनीस
Monday, May 14, 2018 | 11:34 AM
15 0 0
Share this story

दृकश्राव्य फितीसह विंदा करंदीकर यांच्यावर व्याख्यान देताना डॉ. माधवी वैद्य

पुणे :
‘मराठी साहित्यात कोकणाने मराठीला अनेक साहित्यिक रत्ने दिली आणि विंदा करंदीकर हे त्यातील कोहिनूर हिरा होते! त्यांनी मराठी भाषेला ‘ज्ञानपीठ’ तर मिळवून दिलेच; पण त्यांच्या साहित्याच्या इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीमधील अनुवादांनी अनेकांना प्रभावित केले आहे. तसेच सौंदर्यशास्त्रातील त्यांनी केलेले विश्लेषण हेही जागतिक कलामीमांसेतील एक क्रांतिकारक घटना आहे,’ असे प्रतिपादन मराठीच्या ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी नुकतेच पुण्यात केले. 

रसिक मित्र मंडळाच्या ‘एक कवी एक भाषा’ या कार्यक्रमाच्या ५५व्या पुष्पातून ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करदीकर यांच्या कवितांवर डॉ. वैद्य यांनी दृकश्राव्य फितीसह सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून विंदांच्या कन्या जयश्री काळे उपस्थित होत्या. मंडळाचे पदाधिकारी व प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांनी सर्वांचे स्वागत केले, तर सुरेशचंद्र सुरतवाला यांनी प्रास्ताविक केले. 

डॉ. माधवी वैद्य
डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘मराठीतील पहिले आधुनिक कवी समजल्या जाणाऱ्या केशवसुतांची विचारधारा व परंपरा पुढे नेताना विंदांनी त्यात उत्तम भर घालून पुढे नेली. त्यामुळेच त्यांच्या कवितेत परंपरा व नवता यांचा मेळ दिसतो. त्यात पाश्चिमात्यांमधील रोमँटिसिझम व पुरोगामित्व आणि दुसरीकडे ज्ञानेश्वर-तुकोबांची वाटही चोखाळलेली दिसते. कोकणाच्या लाल मातीचा, अथांग समुद्राचा आणि हिरवाईचा स्पर्श त्यांच्या कवितेला झाला आहे. तसेच सामाजिक विचार आणि वैचारिकतेने ती समृद्ध आहे.’  

‘विंदा आणि माझा धागा ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या दूरदर्शनवरील मालिकेच्या निमित्ताने जुळला व तो शेवटपर्यंत जोडला गेला,’ असे सांगून डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘कोणीही चांगले काम करताना दिसले, की ते त्याचे कौतुक करायचे. त्यामुळेच की काय पुण्याच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून बोलावण्यासाठी गेल्यावर माझ्याकडे पाहून त्यांनी होकार दिला. हा माझ्यासाठी एक व्यक्तिगत पण मोठा पुरस्कार होता. दुदैवाने ते उद्घाटनापूर्वीच गेले.’ 

‘विंदांना अनेक पुरस्कार मिळाले; पण ते त्यांनी सर्व जनतेच्या कामासाठी समर्पित केले. आपल्या मानधनातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना सढळ हातांनी मदत केली. सीनियर फुलब्राइट, सोव्हिएट लँड नेहरू पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, कबीर व कोणार्क आणि शेवटी ज्ञानपीठ पुरस्काराची रकम त्यांनी समाजासाठी मुक्त हस्ते खर्च केली. त्यासाठी ते आयोजकांकडे मानधनाचा लकडा लावत असत. यामागचे कारण कुणाला माहीत नसे. सत्यकथेत आपल्या कवितेशेजारी छापून आलेली विंदांची कविता वाचून खुद्द मर्ढेकर म्हणाले होते, की ‘या कवितेने माझ्या कवितेला लाजवले आहे, मर्ढेकर संपला!’ विंदांसाठी तो सर्वांत मोठा पुरस्कार होता. ज्या काळात मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्याबरोबर विंदांनी संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्यक्षेत्र अक्षरश: दणाणून सोडले होते, त्या काळात त्रयींची काव्यमैफल ही मराठी रसिकांसाठी आणि वाचकांसाठी मोठी पर्वणीच होती,’ अशी आठवण डॉ. वैद्य यांनी सांगितली. 

डॉ. माधवी वैद्य आणि विंदा यांच्या कन्या जयश्री काळेडॉ. वैद्य पुढे म्हणाल्या, ‘त्यांच्या कवितेत सामाजिक वास्तवाशी सहकंप होण्याची वृत्ती असल्यामुळेच विंदांना कोणताच मुखवटा धारण करावा लागला नाही. आपल्या विविध सामाजिक जाणिवांमधून त्यांनी विविध रूपांमधील शोषकांकडून होणारे शोषितांचे शोषण हे मार्क्सवादातील एक सूत्र मांडले. कवी अनिल व कुसुमाग्रजांचा मानवतावाद आणि मुक्तिबोधांचा साम्यवादही त्यांच्या कवितेतून उतरला आहे. शुद्ध शब्दोच्चार, आघातयुक्त लयदार वाचन ही त्यांच्या कवितावाचनाची वैशिष्ट्ये होती.’

‘विंदांना माधव जूलियन भेटले व त्यातून त्यांनी उत्तमोत्तम गझला लिहिल्या. ‘सारे तिथेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्रसूर्य सारे होते तिच्याच साठी’ ही साठीची गझल खूप गाजली. धोंड्या न्हावी, कावेरी, सरोजनवानगखाली, वडारीण बकी, तसेच पिशी मावशी अशी प्रभावी व्यक्तीचित्रे त्यांनी कवितेतून रंगवली,’ असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘प्रेमविषयक काव्याबरोबरच त्यांनी स्त्रियांच्या सर्व अवस्थांचे चित्रण कवितेतून केले. त्यात सखी, प्रेयसी, पत्नी, माता अशा अनेक नात्यांनी वेढलेल्या स्त्रीरूपाचं चिंतन आढळतं. फितुर जाहले तुजला अंबर, थोडी सुखी थोडी कष्टी अशा काही संवेदनशील कविताही त्यांनी लिहिल्या.’

‘बालकवितांचे दालन विंदांनी समृद्ध केले,’ असे सांगून डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘विंदांच्या मते बालकविता ही मुलांना आपल्यासाठी लिहिलेली आहे असे न वाटता जणू ती आपणच लिहिलेली आहे, असे वाटले पाहिजे. कम्प्युटरच्या नव्या जगात बालकवितेचं सौंदर्य नष्ट न होता विज्ञानाच्या प्रगतीमुळे काही नवीन वस्तू, साधने लोकजीवनात आली तर बालकवितेतूनही त्या गोष्टी दिसतील; पण बालकवितेचे खरे सौंदर्य हे मुलांच्या वृत्तीविशेषांशी संवाद साधण्यात आहे. राणीचा बाग, माकडाचे दुकान, भिमाचे जेवण, चिडवण्याचा मंत्र, सुटी मिळण्याचा मंत्र पहिल्या नंबराचा मंत्र, या त्यांच्या मिस्किल बालकविता स्वत: विंदांच्यावर केलेल्या चित्रणतून सादर झाल्या.’

‘स्वत:च्या अंत:प्रेरणेतून त्यांनी लिहिलेल्या कवितासंग्रहांमध्ये स्वेदगंगा (१९४९), विरूपिका (१९८१) आणि त्यानंतर वयाच्या ८५व्या वर्षी लिहिलेल्या ‘अष्टदर्शने’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘अष्टदर्शने’मधून त्यांनी विशुद्ध आनंदाबरोबरच चिंतनशील व मराठी संतांच्या अभंगाचा आकृतीबंध वापरून सात तत्त्वचिंतकांवर भाष्य केले. ‘मिसिसिपीमध्ये मिसळू दे गंगा’ ही त्यांनी लिहिलेली विश्वप्रार्थना विलक्षण आहे. ‘रक्तारक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे रक्त एका गोत्री’ या ओळी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत,’ असेही डॉ. वैद्य यांनी सांगितले. 

जयश्री काळेकार्यक्रमात विंदांच्या ध्वनीचित्रफितीतून त्यांनी सादर केलेल्या जरमा येते माझ्या घरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या माझ्या घरी, तू घरभर भिरभिरतेस तेव्हा, ही जनता अमर आहे, या कविता ऐकायला व पाहायला मिळाल्या. विंदांच्या कवितावाचनाची थेट आठवण व्हावी, अशा पद्धतीने त्यांच्या कन्या जयश्री काळे यांनी त्यांच्या अनेक कवितांचे प्रभावी वाचन केले आणि काही घरगुती आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, ‘माझे वडील विंदा ऊर्फ भाऊ यांच्यातील बालकविता लिहिण्याची प्रेरणा माझा सहा वर्षांचा धाकटा भाऊ उदय याच्यामुळे निर्माण झाली. लवकर बरे होण्यासाठी अंगारे-धुपारे यांच्याऐवजी उदयच्या आजारपणात त्याच्या मनातील अनामिक भीती घालवण्यासाठी विंदांनी अनेक बालगीते व कविता लिहिल्या. त्या म्हणून ते उदयला आजारपण व वाटत असणाऱ्या भीतीकडे दुर्लक्ष करायला लावीत. पुढे या साऱ्या कविता उदयच्याही तोंडपाठ झाल्या! त्यांच्या मुलांच्या भावविश्वाशी जोडल्या गेलेल्या या कवितांमध्ये मोठ्यांनाही वेगळा अर्थ सापडतो व मजा येते.’

विंदांमधील दातृत्वाबदल बोलताना काळे म्हणाल्या, ‘वयाच्या सातव्या वर्षी भाऊ विठू आचार्याबरोबर शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले आणि तिथे वार लावून जेवण करत आपले शिक्षण पूर्ण केले. वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत त्यांनी परिस्थितीशी हा लढा दिला. त्याबद्दल त्यांच्या बोलण्यात कधीच कडवटपणा, तक्रारी किंवा नाराजीचा सूर नसे. साधेपणातून स्वत:च्या मर्यादित गरजा असल्यामुळेच पुरस्कारांमधील सर्व रकमा व स्वत:चे काही पैसे त्यात भर घालून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांसाठी देणगी म्हणून दिले. त्यात स्वत:चं नाव येणार नाही अशीच दक्षता घेतली. त्यांच्या मूळ गावी शाळेसाठी त्यांनी आपली दोन एकराची जमीन दिली. विंदांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शाळेतील लोकांनी मात्र हट्टाला पेटून ग्रंथालयाला विंदांचे नाव दिले.’ 

विंदांच्या शैलीत त्यांच्या कविता सादर करताना काळे यांनी ‘कर कर करा, मर मर मरा’ ही भारतीय स्त्रीचे स्थान यावरील प्रसिद्ध कविता सादर केली. तसेच ‘वृद्धापकाळ येता, श्रद्धा बनेल काठी, त्याला इलाज नाही,’ ही वृद्धापकाळावरील कविता, तसेच उपदेशाची गझलही रसिकांची वाहवा घेत सादर केली. या मातीचे नाते आयुष्यभर जपणाऱ्या विंदांची ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,’ ही लोकप्रिय कविताही त्यांनी म्हटली.   

काळे म्हणाल्या, ‘शालेय जीवनात असतानाच विंदा सुतारकाम शिकले. पुढे घरातील विजेच्या उपकरणांची दुरुस्ती, तसेच चपला-बूट दुरुस्तीचे कामही त्यांनी केले. भाजी चिरताना मला त्रास होऊ नये म्हणून घरातील भाजी कापायच्या विळीचा पाट त्यांनी स्वत: करून दिला. आईचा देव्हारा, घरातील टेबल व फडताळ त्यांनी स्वत: तयार केले होते. घरातील दूरदर्शन संचावरील चित्र अस्पष्ट दिसायला लागल्यावर साहित्य सहवास येथे राहात असताना चौथ्या मजल्यावरील गच्चीत कडेला धोकादायक ठिकाणी असणाऱ्या अँटेनाच्या दुरुस्तीचे कामही त्यांनी हट्टाने स्वत:च केले.’  

कृतार्थ जीवन जगलेल्या आपल्या पित्याबद्दल बोलताना काळे म्हणाल्या, ‘स्वकर्तव्यदक्ष असणाऱ्या भाऊंनी १९४१च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभागी होऊनही कधीच स्वातंत्र्यसैनिकाचे पेन्शन घेतले नाही. कारण ते देशासाठी आपले कर्तव्य होते, असे ते मानत. त्यागाचा अतिरेकही त्यांनी केला. एसआयईएस कॉलेजात इंग्रजीचे विभागप्रमुख असताना तात्पुरत्या जागेवर लागलेल्या विलास सारंग या हुशार तरुणाची नोकरी जाऊ नये, यासाठी स्वत:च्या पदाचाही त्यांनी राजीनामा दिला!’ 
‘आईबरोबरचा त्यांचा ६३ वर्षांचा संसार परस्परपूरक झाला. आपल्या या सहजीवनावर आधारित ‘गझल दोघांचा’ हे काव्यही त्यांनी लिहिले. जाताना मागे ठेवलेल्या आपल्या लेखनाबरोबरच या दोघांनी नेत्रदान व देहदान केले,’ अशी हृद्य आठवणही काळे यांनी नमूद केली. 

(‘विंदां’बद्दलचे लेख वाचण्यासाठी आणि त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचे व्हिडिओ पाहण्यासाठी https://goo.gl/MrcX3n येथे, तर ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ‘विंदां’ची पुस्तकं मागविण्यासाठी https://goo.gl/ytZe6f येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link