Next
‘ज्ञानप्रबोधिनी’ला गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन शिक्षण सेवाव्रती राज्यस्तरीय पुरस्कार
पाच सप्टेंबरला वितरण होणार
BOI
Tuesday, August 28, 2018 | 05:52 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
येथील भारत शिक्षण मंडळातर्फे पहिला गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन शिक्षण सेवाव्रती राज्यस्तरीय पुरस्कार हरळी (जि. उस्मानाबाद) येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेला जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या पाच सप्टेंबरला अच्युतराव पटवर्धन यांचा स्मृतिदिन व शिक्षकदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पटवर्धन हायस्कूलमध्ये पाच सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

२८ ऑगस्ट २०१८ रोजी पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या वेळी पत्रकार परिषदेला मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, सहकार्यवाह विनय परांजपे, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर केळकर, सदस्य विलास केळकर, पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय वाघमारे, उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, वरिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्राचार्य नीलोफर बन्नीकोप आदी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना यंदापासून हा पुरस्कार दिला जाणार आहे. १९०२मध्ये पटवर्धन हायस्कूलची स्थापना झाली. या शाळेचे नाव गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांनी काटेकोर शिस्त, प्रामाणिकपणा, गुणवत्तेमुळे जगभरात पोहोचवले. त्यांचे शिष्य असलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले. महाराष्ट्र राज्याचे एकच बोर्ड असताना अच्युतरावांचे दोन विद्यार्थी राज्यात प्रथम चमकले. अच्युतरावांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या शैक्षणिक कार्याची स्मृती जतन करण्यासाठी भारत शिक्षण मंडळ यंदापासून पुरस्कार देणार आहे.

ज्ञानप्रबोधिनी संस्थेने उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील शिक्षण व ग्रामीण विकासामध्ये भरीव कामगिरी केली आहे. लातूरमध्ये भूकंप झाल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीने तिथे शेतीशाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना शेतीचे शिक्षण व शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण देऊन गावातच सक्षम बनवले. पाणी समस्या सोडवण्यासाठी सिंचन प्रकल्प राबवला. महिलांना रोजगार मिळवून दिला. आरोग्य यंत्रणा सुधारली. आसपासच्या २५ गावांचा चेहरामोहरा बदलून टाकला. ५० एकर जमिनीवर सात हजार फळझाडे बहरली. ही शिक्षणसंस्था महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल आहे. त्यामुळे या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती भारत शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली.

ग्रामीण महाराष्ट्रात क्रांती घडविणारी ‘ज्ञानप्रबोधिनी’
ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली एक सुप्रसिद्ध संस्था आहे. स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांच्या प्रेरणेतून १९६२ साली व्ही. व्ही. उर्फ अप्पा पेंडसे यांनी ज्ञानप्रबोधिनी संस्था स्थापन केली. पुण्याजवळील शिवगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये संस्थेने प्रशिक्षण आणि उत्पादन कार्यशाळा सुरू केली. संस्थेचे पुण्यात मुख्यालय आहे. १९९३ मध्ये लातूरला भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रबोधिनीच्या स्वयंसेवकांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील हरळी गावात पुनर्वसन कार्य करण्यासाठी धाव घेतली. एक वरिष्ठ संस्थापक दिवंगत डॉ. अण्णा ताम्हणकर यांनी पुनर्वसनाचे कार्य केले. ग्रामीण शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. या लहान बीजातून हरळी येथे संस्थेचे मोठे कार्य हरळी (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथे उभे राहिले आहे. नजीकच्या उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर या तीन जिल्ह्यांमधून विद्यार्थी येतात. संस्थेतर्फे कृषी पदविका विद्यालय चालवले जाते. व्यावहारिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नापीक जमिनीत कामगिरी देण्यात आली. तेव्हा ५० एकर जमिनीवर सात हजार फळझाडांची लागवड करण्यात आली. 

ही संस्था जवळपासच्या गावांमध्ये विकासाची कामेही करते. यात किशोरवयीन मुली आणि मुलींसाठी आरोग्य सुविधा केंद्र आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे, जीवनशैली प्रशिक्षण, स्थानिकांसाठी शेतजमीन विकास योजना आदींचा समावेश आहे. 

संस्थेची वेबसाइट : http://jpharali.org
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search