Next
आर्थर कॉनन डॉयल
BOI
Tuesday, May 22, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

शेरलॉक होम्स, प्रोफेसर चॅलेंजर आणि सर नायजेल यांसारख्या अजरामर अफलातून व्यक्तिरेखा निर्माण करणारे महान लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांचा २२ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...... 
२२ मे १८५९ रोजी एडिंबरामध्ये जन्मलेले आर्थर कॉनन डॉयल हे शेरलॉक होम्स, प्रोफेसर चॅलेंजर आणि सर नायजेल यांसारख्या अजरामर व्यक्तिरेखांना जन्म देणारे अत्यंत लोकप्रिय आणि जगप्रसिद्ध लेखक! आपल्या लहानपणी अत्यंत प्रत्ययकारी गोष्टी सांगण्याच्या आईच्या कलेमुळे त्यांना गोष्टी ऐकण्याची आणि पुस्तकांची गोडी लागली होती.

मोठेपणी एडिंबरामधेच शिकून त्यांनी एम. डी. पदवी मिळवली. त्या वेळी ते डॉक्टर जोसेफ बेलच्या संपर्कात आले. डॉ. बेल यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती पाहून ते प्रचंड प्रभावित झाले आणि त्याचा वापर त्यांनी शेरलॉक होम्स या त्यांच्या मानसपुत्राची व्यक्तिरेखा साकारताना केला. 

‘ए स्टडी इन स्कार्लेट’ या १८८७ सालच्या कथेतून वाचकांच्या समोर पहिल्यांदा आलेल्या शेरलॉक होम्सने वाचकांवर इतकं विलक्षण गारूड केलं, की ते आज १३० वर्षांनंतरही उतरायला तयार नाही. ‘२२१ बी, बेकर स्ट्रीट, लंडन’ या शेरलॉक होम्सच्या पत्त्यावर तो खरोखर राहत होता का, हे पाहायला आजही हजारो पर्यटक भेट देतात इतकी त्याची मोहिनी! तर्कशास्त्र, टोकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि फॉरेन्सिक ज्ञानाच्या जोरावर आपल्या सहकाऱ्याला, डॉ. वॉटसनला घेऊन होम्सने एकेका गुन्ह्याची केलेली उकल आणि आपला प्रतिस्पर्धी प्रोफेसर मॉरीआर्टीच्या डावपेचांवर केलेली चित्तथरारक मात यांच्या हकीकती श्वास रोखून धरून वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शेरलॉक होम्सच्या कथा न वाचलेला असा माणूस दुर्मीळच! ए स्टडी इन स्कार्लेट, दी साइन ऑफ फोर, दी हाउंड ऑफ बॅस्करव्हील्स आणि दी व्हॅली ऑफ फीअर या कादंबऱ्या आणि अगणित कथांनी प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध केलंय. त्याच्या कथांवर अनेक सीरियल्स आणि सिनेमे बनले आहेत. 

डॉयल यांच्या लेखणीतून उतरलेली दुसरी जबरदस्त व्यक्तिरेखा म्हणजे प्रोफेसर चॅलेंजर! एक अत्यंत भडक माथ्याचा आणि आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा संशोधक. यांच्या शोधमोहिमा आपल्याला घेऊन जातात कधी ज्वालामुखीच्या पोटाखालच्या, भूगर्भात लपलेल्या ज्युरासिक काळातल्या प्राण्यांच्या दुनियेत, तर कधी पृथ्वीला अंतराळात फिरताना, एका विलक्षण विषारी वायुपटलातून जावं लागताना आलेल्या अनुभवातून, तर कधी चक्क अतींद्रिय अनुभवांशी सामना! दी लॉस्ट वर्ल्ड, दी पॉइझन बेल्ट, दी लँड ऑफ मिस्ट यांसारख्या कादंबऱ्यांमधून आणि व्हेन दी वर्ल्ड स्क्रीम्ड, दी डिसइन्टिग्रेशन मशीन यांसारख्या कथांमधून आपल्याला प्रोफेसर चॅलेंजर यांची साहसं वाचायला मिळतात.

डॉयल यांच्या लेखणीतून उतरलेली आणखी एक विलक्षण व्यक्तिरेखा म्हणजे सर नायजेल! १४व्या शतकाच्या मध्यावर जेव्हा ते शंभर वर्षं चालणारं युद्ध सुरू झालं, त्या काळात घडणारी कथा. सर नायजेल आणि दी व्हाइट कंपनी या दोन कादंबऱ्यांमधून त्याची कहाणी उलगडते. 

यांव्यतिरिक्त दी कमिंग ऑफ दी फेअरीज, रॉडनी स्टोन, दी मिस्टरी ऑफ क्लुम्बर, दी ट्रॅजेडी ऑफ दी कोरोस्को, दी स्टार्क मन्रो लेटर्स, अशी डॉयल यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.   

त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा नाइटहूड किताब मिळाला होता. 

सात जुलै १९३० रोजी त्यांचं क्रोबरोमध्ये निधन झालं. 

(शेरलॉक होम्सची मराठी पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search