पुणे : वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५० वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय अर्थतज्ज्ञ आणि इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स अर्थात आयसीआरआयईआरच्या अध्यक्षा पद्मभूषण डॉ. इशर जज् अहलुवालिया यांना ‘स्कॉलर ऑफ दी इयर अॅॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक परिषदेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. वाडिया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ. गिरीजा शंकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्मिता कुंदे याबरोबरच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डी. ए. राजपूत आदी या वेळी उपस्थित होते.
वाणिज्य, अर्थशास्त्र, वित्त, व्यवस्थापन व व्यावसायिक शिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीस दरवर्षी महाविद्यालयातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत पद्मभूषण डॉ. इशर जज् अहलुवालिया यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या वेळी डॉ. इशर जज् अहलुवालिया यांनी ‘भारतातील शहरीकरण - आव्हाने आणि संधी’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या गरजांचा विचार करून परिणामकारक नियोजन केल्यास व त्यांच्या विकासासाठी योग्य तो समन्वय साधल्यास शहरीकरणाच्या प्रश्नांवर मात करणे शक्य होईल, मात्र त्यासाठी राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.’
‘पुण्यामधील कचरा व्यवस्थापन हे भारतातील इतर शहरांच्या तुलनेने चांगले आहे. ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्याबरोबरच पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे भविष्यासाठी अत्यावश्यक आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नूलकर, डॉ. देवधर व डॉ.देवस्थळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
‘पुण्यातील वाणिज्य शाखेतील एक प्रतिथयश महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना १९६९ मध्ये झाली. वाणिज्य क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. महाविद्यालयात पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, महाविद्यालायाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाने अभ्यास, अभ्यासेतर आणि क्रीडाविषयक असे अनेक उपक्रम विद्यार्थी, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहेत’, अशी माहिती प्राचार्या डॉ. गिरीजा शंकर यांनी दिली.