Next
पुण्यात डिजिटल थ्री-डी तारांगण
प्रेस रिलीज
Monday, February 12, 2018 | 04:05 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमधील खगोलशास्त्राच्या कुतुहलात वाढ व्हावी आणि त्यांना विश्वाच्या व्यापक पसाऱ्यातील काही उद्बोधक तथ्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या वतीने सहकारनगर येथील स्वर्गीय राजीव गांधी ई -लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक थ्री-डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित तारांगण उभारण्यात आले आहे. यामुळे पुणेकरांना आता खगोलविश्वाची सफर घडणार आहे. पुणे महानगरपालिकेचा हा प्रकल्प देशात आघाडीचा ठरणार आहे,’ असा विश्वास पुण्याचे माजी उपमहापौर व नगरसेवक आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.  

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘विज्ञान, तंत्रज्ञानाबाबत विशेष सजग असलेले दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे नाव या तारांगणाला देण्यात आले आहे. हे तारांगण संपूर्णपणे वातानुकूलित आहे. तारांगणाचा डोम सुमारे ९.५० मीटर व्यासाचा असून तो ‘एफआरपी’मध्ये तयार करण्यात आला आहे. १५ अंशांत पुढील बाजूस डोम बसविल्याने प्रेक्षकांना प्रत्यक्ष खगोलविश्वात असल्याची अनुभूती मिळते. अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक ‘फोर के रिझोल्युशनच्या थ्री-डी व्हिज्युलायझेशन डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि उच्च क्षमतेच्या ध्वनियंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. अवकाशात असलेल्या ग्रह-ताऱ्यांची रचना, त्यात घडणाऱ्या ग्रहणांसारख्या घटना याबाबत सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते; मात्र प्रत्यक्षात त्याबाबत फार माहिती नसते. ही माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासाठी या तारांगणाची उभारणी करण्यात आली आहे.’

‘प्रसिद्ध वास्तुविशारद आनंद उपळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची आसनक्षमता ५२ असून, खुर्च्या आवश्यक त्या कोनात पुढे-मागे होणाऱ्या असून, स्लीपिंग चेअर पद्धतीच्या आहेत. ‘फुल डोम प्रो’ या जगप्रसिद्ध रशियन उत्पादक कंपनीने सर्व्हर आणि सॉफ्टवेअर पुरविले आहे. सध्या या कंपनीने इंग्रजी माध्यमातील वीस फिल्म्स उपलब्ध करून दिल्या असून, मराठी आणि हिंदी माध्यमातूनही फिल्म्स दाखविणे सहज शक्य आहे. या तारांगणाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला आहे. देशात मोजकीच तारांगणे असून, पुण्यातील हे तारांगण अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे,’ असेही आबा बागुल यांनी सांगितले. 

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत बहुमूल्य योगदान देणारे शरद पवार, मनोहर जोशी, शिवाजीराव निलंगेकर-पाटील, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे,  अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल तारांगणाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहितीही आबा बागुल यांनी या वेळी दिली. 

(या तारांगणाची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link